वाढत्या चोरीच्या प्रकरणांचा तपास लावण्यास पोलिसांना अडथळा

वाळपई : वाळपई (Valpoi, Goa) शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा (Cctv Camera) बसविण्याची मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे. गेल्या काही महिन्यांपासून वाळपई व ग्रामीण भागांमध्ये चोरीचे प्रकार वाढू लागले आहेत. शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसविल्यास चोरीच्या प्रकरणांवर नियंत्रण येऊ शकते.
नगरपालिकेने (Valpoi Muncipality) यासाठी पुढाकार घ्यावा व आरोग्यमंत्री (Health Minister) विश्वजीत राणे (Vishwajit Rane) यांनी याकडे विशेष लक्ष द्यावे, अशा मागणी नागरिकांनी केली आहे.
वाळपई ही तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असल्यामुळे या ठिकाणी सुरक्षिततेच्या बाबतीत गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. सध्या गोव्यामध्ये मोठ्या प्रमाणात चोरी, खून यासारखे प्रकार वाढू लागले आहेत.
त्यामुळे सरकारने सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे मात्र, शहरामध्ये अजून पर्यंत सीसीटीव्ही कॅमेराची सुविधा उपलब्ध झालेली नाही. याचा फायदा चोरटे घेऊ लागले आहेत.
याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा बसविल्यास नागरिकांना सुरक्षित पद्धतीने आपला व्यवहार करता येणार असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
१५ दिवसांपूर्वी टपाल कार्यालयामध्ये चोरी
दरम्यान, १५ दिवसांपूर्वी वाळपई येथील टपाल कार्यालयामध्ये चोरी झाली होती. अज्ञात चोरट्यांनी इमारतीच्या मागच्या बाजूने कार्यालयात प्रवेश केला व १ लाख रुपयांची रोकड लंपास केली. त्याचप्रमाणे या टपाल कार्यालयातील अनेक महत्त्वाचे दस्तऐवज चोरून नेले आहेत. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत.
यामुळे चोरट्याने याचा फायदा घेतला. वाळपई शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असते तर पोलिसांना तपास करण्यासाठी मदत झाली असती. सीसीटीव्ही कॅमेरा असल्यास त्याचा फायदा पोलिसांना होतो व चोरीचे प्रकार नियंत्रणात राहू शकतात असे पोलिसांचे म्हणणे आहे.
नगरपालिकेने पुढाकार घ्यावा
दरम्यान, वाळपई शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यासाठी नगरपालिकेने पुढाकार घ्यावा. यासाठी खासदार निधीच्या माध्यमातून सीसीटीव्ही कॅमेराची व्यवस्था केल्यास त्याचा फायदा व्यापाऱ्यांबरोबरच सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. वाळपई या ठिकाणी अनेक प्रकारची कार्यालये, बँक आहेत.
श्रीपाद नाईक यांच्याकडे सोपवला होता प्रस्ताव
प्राप्त माहितीनुसार जवळपास आठ वर्षांपूर्वी वाळपई शहरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्याचा प्रस्ताव उत्तर गोव्याचे खासदार तथा केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांचा सादर केला होता. या संदर्भात त्यांनी विशेष लक्ष द्यावे अशा प्रकारची मागणी केली होती. मात्र यासाठी अजून पर्यंत निधी मंजूर झालेला नाही. खासदारांनी याकडे विशेष लक्ष देण्याची मागणी होत आहे.
आरोग्यमंत्र्यांनी विशेष लक्ष देण्याची गरज
दरम्यान, वाळपई शहराच्या सुरक्षिततेच्या बाबतीत आरोग्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. वाढत्या चोरीच्या प्रकारांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. यापूर्वी भुईपाल या ठिकाणी अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा प्रकार घडला होता. एकूण घटनांचा विचार करून सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी होत आहे.