तरुणाचे तत्वज्ञान ऐकून पोलीसही चक्रावले!

कुशीनगर: उत्तर प्रदेशच्या कुशीनगर जिल्ह्यात एक अशी घटना समोर आली आहे, ज्यामुळे पोलीस, गावकरी आणि सोशल मीडिया युजर्स, सगळेच हसावे की रडावे अशा संभ्रमात पडले आहेत. येथे मध्यरात्री भिंत ओलांडून एका घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला गावकऱ्यांनी चोर समजून चोप दिला, पण पोलिसांनी त्याला पकडल्यावर त्याने जे उत्तर दिले, ते ऐकून पोलिसही खदखदून हसू लागले.
पहा व्हिडिओ
कुत्र्यामुळे सत्य बाहेर आले!
विशुनपुरा थाना क्षेत्रातील ठाढीभार गावात गुरुवारी मध्यरात्री १२.३० च्या सुमारास एक तरुण एका घराच्या मागील भिंतीवरून हळूच उडी मारून आत घुसण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी घरातील पाळीव कुत्रा 'शेरू' जागा झाला आणि त्याने जोरदार भुंकून सगळ्यांना सतर्क केले. गावकरी जमा झाले आणि चोर समजून त्या तरुणाला पकडले. पोलिसांना बोलावण्यात आले आणि त्यांनी तरुणाला विचारले, एवढ्या रात्री येथे कोणाच्या घरात चोरी करायला आला होतास का?"
यावर त्या तरुणाने एक क्षणही न थांबता उत्तर दिले-नाही साहेब, मी चोर नाही. मी तर 'सत्याच्या शोधात'घराबाहेर पडलो आहे. मी तत्त्वज्ञानी (Philosopher) आहे. रात्रीच्या एकांतातच सत्य समोर येते, म्हणून मी आलो. हे उत्तर ऐकून पोलीस आणि गावकरी सुरुवातीला एकमेकांकडे पाहत राहिले.
बॅगेत टॉर्च, बिस्किटे आणि तत्त्वज्ञानाची डायरी
पोलिसांनी या 'तत्त्वज्ञानी' तरुणाची तपासणी केली असता, त्याच्या बॅगमध्ये कोणतेही हत्यार किंवा कुलूप तोडण्याचे सामान सापडले नाही. त्याऐवजी, एक छोटी टॉर्च, पाण्याची बाटली, बिस्किटांचे दोन पुडे आणि एक मोठी डायरी सापडली. या डायरीत मोठ्या अक्षरात लिहिलेले होते, 'सत्य वह है जो अंधेरे में भी चमकता है' (सत्य ते आहे जे अंधारातही चमकते) आणि 'मनुष्य का अंतिम लक्ष्य सत्य की खोज है' (माणसाचे अंतिम ध्येय सत्याचा शोध आहे).
या तरुणाची ओळख दिनेश जयस्वाल (वय ३०) अशी झाली असून, तो दुदही गावातील आहे आणि वडिलांसोबत किराणा दुकान चालवतो. त्याने इंटरमीडिएटपर्यंत शिक्षण घेतले आहे.
मला पृथ्वीवर शांती हवी आहे!
पोलिसांनी अधिक विचारपूस केल्यावर दिनेश म्हणाला, "मी सत्याच्या शोधात घराबाहेर पडलो आणि चालत चालत पाच किलोमीटर दूर आलो. एवढ्या रात्री फिरण्याचे कारण विचारल्यावर त्याने दिलेले उत्तर अधिकच विनोदी होते. तो म्हणाला, मी चोर नाही साहेब, मला संपूर्ण पृथ्वीवर शांती हवी आहे!
पोलिसांना पाचारण करण्याआधी गावकऱ्यांनी दिनेशला चोर समजून चार-पाच थप्पड मारले होते. घरमालक संतापून म्हणाले, जर शेरूने वेळीच आवाज दिला नसता, तर या 'सत्यशोधकाने' आमच्या अलमारीतील सत्य (पैसे) शोधले असते! दुसऱ्याच्या अंगणात उडी मारणे हे कसले तत्त्वज्ञान आहे?
मानसिक स्थिती आणि 'निरंकार' विचारधारा
दिनेशचे वडील नरेश जयस्वाल यांनी सांगितले की, दिनेश इंटरपर्यंत शिकला असून, तो संत निरंकार विचारधारेने खूप प्रभावित आहे. तो अनेकदा न सांगता रात्री एकटाच फिरायला बाहेर पडतो. त्यांची मानसिक स्थिती पूर्णपणे स्थिर नसल्याचेही त्यांनी सांगितले. दिनेशचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात तो दुदही बाजारातील एका कॉस्मेटिक्सच्या दुकानात लोकांना 'सुखमय जीवन आणि मोक्षाचे ४ नियम' समजावून सांगताना दिसत आहे.
पोलीस म्हणाले: 'चोरीचा रेकॉर्ड नाही'
विशुनपुराचे थाना प्रभारी आनंद गुप्ता यांनी सांगितले की, तरुणाची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली आहे, त्याच्याविरुद्ध कोणताही गुन्हा दाखल नाही. बोलण्यावरून तो चोर वाटत नाही. तो मानसिकदृष्ट्या अस्वस्थ दिसत आहे. सध्या त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पालकांना बोलावले आहे. एकंदरीत, या 'सत्य शोधकाची' रात्रयात्रा पोलीस व्हॅनमध्ये संपली असली तरी, कुशीनगरच्या या बुद्धभूमीला एक नवीन आणि विनोदी किस्सा नक्कीच मिळाला आहे!