
म्हापसा : गोव्यातील (Goa) म्हापसा पोलीस स्थानक हद्दीत कुत्रा चावल्यानंतर (Dog bite) हुज्जत घालून दमदाटी करून धमकी दिल्याप्रकरणी एका वकिलाने (Advocate) अज्ञात कुत्र्याच्या मालकिणीविरुद्ध म्हापसा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अजून गुन्हा नोंदवलेला नाही.
यासंदर्भात अॅड. तेज खोर्जुवेकर यांनी ४ नोव्हेंबरला म्हापसा पोलीस स्थानकात (Goa Police) नोंदवलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, गेल्या महिन्याच्या ३१ ऑक्टोबरला वरील घटना घडली होती. त्या दिवशी दुपारी आपण तातो खानावळीजवळून चालत जात होतो.
त्यावेळी महिलेसोबत दोरीने न बांधलेला व तोंडपट्टीही नसलेला कुत्रा होता. तो अचानक आपल्यामागे आला व झडप घालून मांडीचा चावा घेतला.
त्यात आपण रक्तबंबाळ झालो व खोलवर जखम झाली. एवढे होऊनही महिला हुज्जत घालू लागली व दमदाटी करू लागली.
कुत्र्याच्या लसीकरणाबाबत माहिती न देता आपला प्रभाव वरपर्यंत असल्याचे सांगू लागली. ‘जे करायचे ते करा’ म्हणत धमकी देत जीए ०३ एएम ०६०४ क्रमांकाचे वाहन घेऊन निघून गेली. यासंदर्भात सर्व पुरावे आपण पोलिसांना सादर केले आहेत.
याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १२५, २९१ व ३५१ (२) अन्वये गुन्हा नोंदवून कारवाई करावी, अशी मागणी अॅड. तेज खोर्जुवेकर यांनी म्हापसा पोलीस स्थानकात केली आहे.