अंगात शंकर भगवान येतात, मुलींना बरे करू म्हणत भामट्याने साधला डाव

पुणे : शंकर बाबा (Shankar Baba) अंगात येतात, मुलींचे आजार दूर करणार अशी बतावणी करीत पुण्यातील (Pune) एका शिकलेल्या दांपत्याचे (Couple) तब्बल १४ कोटी रुपये हडप केल्याची घटना घडली आहे.
फसवणूक (cheating) झाल्याचे लक्षात आल्यावर पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली आहे. मात्र, तोपर्यंत हातचे बरेच काही गमावून बसावे लागले.
‘शंकर बाबा’ अंगात येतात व सर्व अडचणी सुटतील अशी बतावणी करून दांपत्याला जाळ्यात
ओढले. विदेशातील घर, मालमत्ता विकायला लावली. कर्ज काढायला लावले. मुली आजारमुक्त होतील या आशेने सर्व काही केले. मात्र, मुलींना गुण मिळत नसल्याचे दिसून येताच फसवणूक झाल्याचे या कुटुंबाच्या लक्षात आले व अखेर पोलीस स्थानकात धाव घेतली.
शेवटी पैशांची मागणी एवढी वाढली की, राहते घर विकण्यास सांगून दबाव वाढू लागला. हे अतीच होत असल्याचे दिसून येताच दांपत्याने पोलिसांकडे धाव घेतली.
यासंदर्भात पीडित कुटुंबाने पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन रितसर तक्रार दाखल केली. पीडित दांपत्य एका खाजगी कंपनी मध्ये कामाला आहे. या दोघांनाही दोन मुली असून, त्या दोघी व्याधग्रस्त आहेत. एका मुलीला अलुपेशीया नावाचा आजार आहे व कमी प्रमाणात केस येतात. दांपत्य अनेक ठिकाणी भजनाला जात असे. भजनाच्या कार्यक्रमात दोघांना दिपक जनार्दन खडके या इसमाशी ओळख झाली.
अंगात शंकर बाबा येत असल्याची बतावणी
नंतर दिपकला दांपत्याच्या मुली आजारी असल्याचे कळले. त्यांनी दांपत्याचा परिचय वेदिका कुणाल पंढरपूरकर व कुणाल पंढरपूरकर या दोघांशी करून दिला. ‘वेदिका शंकर बाबाची मुलगी असून, तिच्या अंगात शंकर बाबा येतात ते तुमच्या सर्व समस्या सोडवणार.’ मुलींचे आजार बरे करणार. तुम्ही कायमचे चिंतामुक्त होणार असल्याची बतावणी केली. नंतर खडके यांच्या दरबारात दांपत्याला वेदिका भेटली व अंगात शंकर बाबा आल्याची सांगून शंकर बाबा करतात तसे करून दाखवले. शंकर बाबा आपल्याशी बोलत असल्याचे सांगितले.
कोट्यावधी रुपयांची फसवणूक
नंतर फसवणुकीचे सत्र सुरू झाले. प्रथम दांपत्याकडे असलेले सर्व पैसे देण्यास सांगितले. मुलींच्या आजाराची लक्षणे गंभीर असून, दोष जास्त असल्याने आजारमुक्त होण्यास बराच वेळ लागेल असे सांगितले व दांपत्याचे कोट्यावधी रुपये हडप केले.
विदेशातील घरही विकण्यास भाग पाडले
वेदिका या महिलेने पुन्हा शंकर बाबा यांची हुबेहुब नक्कल करून घर, शेती विकून पैसे जमा करण्यास सांगून पुन्हा फसवणूक केली. मुली आजारमुक्त होणार या आशेने विदेशातील घरही विकले. अशा प्रकारे कोट्यावधी रुपये उकळले.
आणि कट उघड झाला
देविका या महिलेने दांपत्याला घरात सुपारी, नारळ व दगड या वस्तू घरात ठेवायला सांगितल्या. आता केवळ एकच पर्याय शिल्लक असल्याचे सांगून राहते घर विकायला सांगितले. मात्र, हे अतीच होत असल्याचे समजल्यावर व मुलीही आजारमुक्त होत नसल्याने दांपत्याने पोलिसांत तक्रार केली. मात्र, तोपर्यंत १३ ते १४ कोटी रुपये दांपत्य हातचे घालून बसल्याचे त्यांनीच दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.