मये झेडपीसाठी राधिका कळंगुटकर गोवा फॉरर्वडच्या उमेदवार

पक्षप्रमुख विजय सरदेसाई यांची घोषणा : विजयी करण्याचे आश्वासन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
08th November, 11:38 pm
मये झेडपीसाठी राधिका कळंगुटकर गोवा फॉरर्वडच्या उमेदवार

पणजी : गोवा फॉरवर्ड पक्षाने आगामी मये विधानसभा मतदारसंघातील जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी राधिका कळंगुटकर यांना उमेदवार म्हणून घोषित केले आहे. राधिका कळंगुटकर यांना निवडून आणण्यासाठी गोवा फॉरवर्ड पक्ष आत्तापासूनच कामाला लागेल, असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी सांगितले.
‍मये मतदारसंघातील झेडपी निवडणुकीच्या उमेदवाराबाबत कोणतीही गोष्ट लपवायची नाही, असे सरदेसाई यांनी स्पष्ट केले. मये मतदारसंघ हा महिलांसाठी राखीव झाला असल्यामुळे, राधिका कळंगुटकर यांना आम्ही आता पक्षात प्रवेश दिल्यावर उमेदवार निश्चित केले आहे. त्या गोवा फॉरवर्ड पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढवतील आणि त्यांच्या विजयासाठी आम्ही आत्तापासूनच तयारीला लागू, असे सरदेसाई म्हणाले. चोडण येथे होणाऱ्या आंदोलनात कळंगुटकर आणि गोवा फॉरवर्ड पक्ष सहभागी होतील, असेही त्यांनी सांगितले.
नोकरी घोटाळ्यावर सरदेसाईंचा मोठा आरोप
नोकरी घोटाळ्याबाबत पूजा नाईक यांनी केलेल्या आरोपांविषयी उत्तर देताना सरदेसाई यांनी भाजपच्या एका वरिष्ठ मंत्र्याचा या घोटाळ्यात सहभाग असल्याचा गंभीर आरोप केला. हा मंत्री कोण आहे, हे मुख्यमंत्र्यांना चांगले माहीत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सरदेसाई पुढे म्हणाले, सरकारमध्ये असे अनेक मंत्री आहेत ज्यांना मी वैयक्तिकरीत्या ओळखतो, जे कधीही पैसे घेऊन काम करणार नाहीत. पण, या मंत्र्याचे नाव माझ्या कानावर आल्यानंतर मला धक्का बसला. आरोप करणारी महिला या मंत्र्याच्या कार्यालयात काम करत होती. सरदेसाई यांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केले की, मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा आपला मंत्री दोषी असल्याचे मान्य करावे, त्यानंतर मी त्या मंत्र्याचे नाव घेईन.ही महिला आता तिचे १७ कोटी रुपये वसूल करून देण्याची मागणी करत आहे. पण, यापूर्वी या महिलेने अनेक लोकांना पैसे घेऊन कामाला लावले आहे. फक्त तिचे १७ कोटी रुपये वसूल करून शांत बसू नका, तर तिने कोणाकडून पैसे घेऊन कामाला लावले, याचीही चौकशी करा, अशी मागणी सरदेसाई यांनी केली.

राजेश कळंगुटकर यांचा गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश
आम आदमी पक्षाचे (आप) नेते आणि उमेदवार राहिलेले राजेश कळंगुटकर यांनी पक्षाला रामराम ठोकल्यानंतर, त्यांनी आपली पत्नी राधिका कळंगुटकर आणि समर्थकांसह गोवा फॉरवर्ड पक्षात प्रवेश केला. गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई यांनी नारळ आणि शाल देऊन त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी गोवा फॉरवर्ड पक्षाचे विधानसभा निवडणुकीचे उमेदवार संतोषकुमार सावंत, उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष दीपक कळंगुटकर आणि इतर नेते उपस्थित होते.

हेही वाचा