काणकोणात पर्तगाळी मठात ५५०व्या महोत्सवानिमित्त श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना

मठामध्ये अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे काम हाती

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
08th November, 11:36 pm
काणकोणात पर्तगाळी मठात ५५०व्या महोत्सवानिमित्त श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना

पर्तगाळी येथे शिखर कलाशाचे पूजन करताना पर्तगाळ मठाधीश श्रीमद विधाधीशतीर्थ महाराज.(अशोककुमार देसाई)

पैंगीण :‍ काणकोण तालुक्यातील श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाच्या ५५० व्या सार्ध पंचशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे काम या ठिकाणी हाती घेण्यात आले आहे. शुक्रवार, दि. ७ नोव्हेंबर रोजी मठातील नूतन जीर्णोद्धार केलेल्या मंदिरात श्रीराम मूर्तीप्रतिष्ठापना आणि शिखर कलश प्रतिष्ठा सोहळा झाला. श्रीमद् विद्याधीशतीर्थ स्वामी महाराजांच्या हस्ते विधिवत पूजा आणि अन्य धार्मिक विधीनुसार हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी मठ समितीचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपो, पल्लवी धेंपो, उपाध्यक्ष आर. आर. कामथ, शिवानंद साळगावकर, पीडब्ल्यूडी मंत्री दिगंबर कामत, योगेश कामत आणि मोठ्या संख्येने मठाचे अन्य अनुयायी उपस्थित होते.
दरम्यान, येथे उभारलेल्या आराध्य दैवत श्री वीर विठ्ठल मंदिराचे उद्घाटन सोमवार, दि. १० रोजी दुपारी ११ वाजता होणार आहे. त्याचप्रमाणे नूतन वैदिक संकुल, इंदिराकांत भवन आणि गोशाळेचे उद्घाटनही स्वामीजींच्या हस्ते होणार आहे.
या महोत्सवाचा एक भाग म्हणून, दि. २६ नोव्हेंबर रोजी पर्तगाळी मठात श्रीराम दिग्विजय रथ यात्रेचे आगमन होणार आहे आणि २७ नोव्हेंबर ते ७ डिसेंबरपर्यंत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदींच्या हस्ते भव्य मूर्तीचे अनावरण
मठाच्या प्राकारात ७७ फूट उंचीच्या प्रभू श्री रामचंद्रांच्या भव्य अशा मूर्तीची उभारणी करण्याचे काम सुरू असून, या मूर्तीचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २८ नोव्हेंबर रोजी होणार आहे. या दृष्टीने मठात जोरदार तयारी सुरू आहे.      

हेही वाचा