जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी आरक्षणाची अधिसूचना जारी, तर दुहेरी खुनाने खळबळ

पणजी : जनजीवनात व्यत्यय आणणाऱ्या पावसाने अखेर या आठवड्यात विसावा घेतला. बांबोळी येथील अपघातात दोघांचा मृत्यू, मोरजी येथील वृद्धाचा संशयास्पद मृत्यू, साळगावात व्यावसायिकासह कामगाराचा निर्घृण खून अशा दु:खदायक घटना घडल्या. तर, जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी आरक्षणाची अधिसूचना जारी करण्यात आली. या आठवड्यातील घडामोडींचा घेतलेला आढावा.
रविवार

रेती उपसा वादातून गोळीबार : दोघा पोलिसांसह ५ जणांना अटक
उगवे-जैतीर (पेडणे) येथे तेरेखोल नदीत बेकायदा रेती उपसा करणाऱ्या बिहारमधील रामरिशी रामराज पासवान आणि लालबहादूर गोड या दोन कामगारांवर बंदुकीने गोळीबार करून जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी पेडणे पोलिसांनी पाच स्थानिक आरोपींना अटक केली. अटक केलेल्या आरोपींमध्ये दोघा पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, शस्त्र कायद्यांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिर्णमधील युवकाचा खून : तिघांना पोलीस कोठडी
पिर्ण, बार्देश येथील कपिल चौधरी या युवकाच्या खून प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघा संशयितांना न्यायालयाने आठ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. या खून प्रकरणी पोलिसांनी गुरुदत्त लवंदे (कांदोळी), डायसन डोमिंगोस कुतिन्हो (कळंगुट) आणि सूरज जोतीश ठाकूर (कांदोळी) या तिघांना यापूर्वी अटक केली होती.
अखेर पावसाची विश्रांती
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शेतीचे मोठे नुकसान करणाऱ्या आणि जनजीवनात व्यत्यय आणणाऱ्या पावसाने अखेर रविवारी विसावा घेतला. रविवार दुपारपासूनच सूर्यकिरणांचे दर्शन होऊन कडक ऊन पडल्यामुळे, यंदाची देव दिवाळी म्हणजेच तुळशीच्या लग्नाचा मंगलमय कार्यक्रम कोणत्याही मोठ्या अडचणीशिवाय साजरा करणे शक्य झाले.
सोमवार
भुईपाल-सत्तरी येथील घराला आग
भुईपाल येथील सरकारी प्राथमिक विद्यालयाजवळ असलेल्या भारत गणेश वेर्णेकर यांच्या घराला अचानक आग लागून प्रचंड नुकसान झाले. या आगीत त्यांची स्कूटर आणि घरातील टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीनसारखे किमती सामान जळून खाक झाले असून, या कुटुंबाला मोठा आर्थिक फटका बसला आहे.

कार गेली थेट पाण्यात
सारमानस पिळगाव येथील सारमानस फेरीधक्क्यावर धारबांदोडा या फेरीबोटमधून रिव्हर्स गियरमध्ये गाडी बाहेर काढत असताना गाडी अचानक बंद पडल्याने चालकाचा गाडीवरील ताबा गेला. तसेच ब्रेकही लागू शकले नाही. परिणामी सदर फोर्ड फिगो ही कार थेट सारमानस फेरीधक्क्याच्या बाजूलाच पाण्यामध्ये गेली. सदर कारमध्ये असलेल्या पिळगाव येथीलच एका युवकाला धारबांदोडा फेरीबोटवरील खलाशी शुभम फडते यांनी गाडीतून बाहेर काढून त्याचे प्राण वाचविले.
मंगळवार

बांबोळी येथील अपघातात दोघांचा मृत्यू
पणजी ते मडगाव राष्ट्रीय महामार्गावरील बांबोळी येथे नियाझ रेस्टॉरंटजवळील उतरणीवर सोमवारी मध्यरात्री टँकर आणि ‘रेंट अ कॅब’चा भीषण अपघात झाला. या अपघातात कारचा चक्काचूर झाला, तर टँकर रस्त्याशेजारील खड्ड्यात पडला. कारमधील सेपक टाक्रॉ असोसिएशनचे अध्यक्ष योगेंद्र सिंग व खेळाडू अंकित कुमार बलियान या दोघांचा जागीच मृत्यू झाला. जुने गोवा पोलिसांनी टँकरचालक राहुल सरवदे याच्याविरोधात गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.
बनावट अनुभव प्रमाणपत्र सादर करून मिळविली नोकरी
वाहतूक खात्यात २०१० मध्ये बनावट अनुभव प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळविल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पणजी पोलिसांनी साहाय्यक मोटार वाहन निरीक्षक दत्तप्रसाद गणेश नाईक (मडकई -फोंडा) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कपिल चौधरीच्या खूनप्रकरणी चौघा संशयितांना पोलिसांकडून अटक
पिर्ण-बार्देश येथील कपिल चौधरी या युवकाच्या खूनप्रकरणी रवीश्वर नाईक (गिरी), विठ्ठल तुयेकर (कांदोळी), विनायक कांबळे (कळंगुट) व ॲक्विनो परेरा या चार जणांना कोलवाळ पोलिसांनी अटक केली. या प्रकरणात आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे.
बालिकेच्या खूनप्रकरणी तिसऱ्या संशयिताला अटक
मूळ कर्नाटक येथील पण गेल्या काहीच दिवसांपूर्वी डिचोली तालुक्यातील म्हावळिंगे येथे आपल्या पतीला सोडून २.७ वर्षीय चिमुरडी व प्रियकरासह आलेल्या एका महिलेने आपल्याच मुलीचा जीव प्रियकाराच्या सहकार्याने घेतल्याचे उघड झाले होते. मात्र, अधिक तपासात या खुनाचा मास्टर माईंड असलेल्या चित्रदुर्ग कर्नाटक येथील कलेश गंगा धारप्पा (२१) याला डिचोली पोलिसांनी कर्नाटक पोलीस टीमच्या सहकार्याने अटक करून डिचोलीत आणले.
बुधवार
राज्यात ‘एनएसए’ लागू
राज्यात मागील काही महिन्यांत कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या अनेक घटना घडल्या. ऑगस्टमध्ये मुंगूल टोळीयुद्ध, सप्टेंबरमध्ये रामा काणकोणकर यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. या व इतर घटनांची दखल घेऊन राज्यात राष्ट्रीय सुरक्षा कायदा (एनएसए) तीन महिन्यांसाठी लागू करण्यात आला आहे.

मोरजी येथील वृद्धाचा संशयास्पद मृत्यू
वरचावाडा मोरजी येथील उमाकांत खोत (६४) या वृद्धाचा संशयास्पद मृत्यू झाला. जमिनीच्या वादातून बिगर गोमंतकीयांकडून त्यांचा खून झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी तपास सुरू असल्याचे सांगून शवचिकित्सा अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे, असे सांगितले.
बागा, हडफडेतील आस्थापनांत झळकले ‘पाकिस्तान झिंदाबाद’
बागा आणि हडफडे येथील दोन आस्थापनांच्या एलईडी बोर्डवर ‘पाकिस्तान झिंदाबाद’ लिहिलेले आढळल्याने खळबळ उडाली. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली. घटनेची माहिती मिळताच तातडीने कारवाई करत दोन्ही एलईडी बोर्ड त्वरित बंद केले. हणजूण पोलिसांनी पाच, तर कळंगूट पोलिसांनी चार, अशा एकूण नऊ जणांना अटक केली.
गुरुवार
साळगावात व्यावसायिकासह कामगाराचा निर्घृण खून
साळगावात घडलेल्या दुहेरी खुनाच्या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मुड्डोवाडा-साळगाव भागात रिचर्ड डिमेलो (गिरी - बार्देश) याच्यासह अभिषेक गुप्ता (इंदोर, मध्य प्रदेश) यांचा निर्घृण खून करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून, या दुहेरी हत्येत डिमेलो याचा फरार कामगार जगन्नाथ याच्यावर पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.
मोरजी येथील खून प्रकरणी तिघा संशयितांना अटक
मोरजी वरचावाडा येथील ज्येष्ठ नागरिक उमाकांत खोत यांच्या खून प्रकरणी मांद्रे पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली आहे. लोकेश पुत्तास्वामी (५३, बंगळुरू), रोहित कुमार प्रजापती (२०, झारखंड) आणि विजी सुप्पन (३६, तामिळनाडू) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणाशी संबंधित मोरजीतील सर्वे क्र. १५६/३ चा जमीन मालक अशोक कुमार नेदुरुमली याचा शोध जारी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
निवडणूक ड्यूटीवर गैरहजर राहणे सहाय्यक अभियंत्याला भोवले
उत्तर गोवा उपजिल्हाधिकारी आणि वीज खात्यातील एका सहाय्यक अभियंत्यामध्ये उद्भवलेल्या वादामुळे मोठा संघर्ष उभा राहिला आहे. निवडणूक ड्युटीवर (बीएलओ सुपरवायझर) हजर न राहिल्याने उपजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वीज अभियंत्याला थेट ताब्यात घेण्यात आले आहे.
शुक्रवार
जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी आरक्षणाची अधिसूचना जारी
गोव्यात १३ डिसेंबर रोजी होणाऱ्या जिल्हा पंचायत निवडणुकीसाठीच्या आरक्षणाची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पारंपरिक मतदारसंघ आरक्षित झाल्यामुळे विद्यमान ८० टक्के सदस्यांचे पुन्हा निवडणूक लढविण्याचे स्वप्न भंगले आहे. उत्तर गोव्यातील २५ पैकी १५, तर दक्षिण गोव्यातील २५ पैकी १७ मतदारसंघ महिला, एससी, एसटी वा ओबीसींसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. यामुळे एकूण ५० मतदारसंघांपैकी एकूण ३२ मतदारसंघ राखीव झाले आहेत.
कॅसिनो, रिअल इस्टेट व्यावसायिकांवर बांबोळी, दोनापावलात ईडीचे छापे
सक्तवसुली संचालनालयाच्या दिल्ली विभागाकडून गोव्यातील कॅसिनो आणि रिअल इस्टेटशी निगडित कंपनीच्या मालकांवर बांबोळी, दोनापावलासह दिल्ली आणि इतर राज्यांत छापे टाकण्यात आले. शुक्रवारी पहाटे पासून सुरू केलेले छापे रात्री उशिरापर्यंत सुरू होते. ‘फेमा’ कायद्याअंतर्गत करण्यात आलेल्या या कारवाईने कंपनीशी निगडित कॅसिनो आणि रिअल इस्टेट उद्योग क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
आयआरबी काॅन्स्टेबलविरुद्ध गुन्हा
बनावट जन्म प्रमाणपत्र सादर करून गोवा पोलीस खात्याच्या भारतीय राखीव दलात (आयआरबी) पोलीस काॅन्स्टेबल पद मिळविल्याबद्दल पणजी पोलिसांनी अरुण सलमान येद्यानापौडी (मूळ आंध्र प्रदेश, रा. चिंबल) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शनिवार
वादग्रस्त ‘मरीना प्रकल्प’ आता मुरगाव बंदरात स्थलांतरित!
गोव्यातील वादग्रस्त असलेला मरीना प्रकल्प आता मुरगाव बंदर प्राधिकरणाकडे (एमपीए) स्थलांतरित करण्यात आला आहे. एमपीएच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाचे जेटी टर्मिनल पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात असून, हा संपूर्ण प्रकल्प पुढील वर्षी पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
पोळे-लोलयेतील दत्तक मुलाची 'अपना घर'मध्ये रवानगी
गोवा-कर्नाटक सीमेवरील पोळे-लोलये गावात दत्तक मुलाला अमानुष मारहाण केल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार २ नोव्हेंबर रोजी समोर आला होता. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या चार वर्षीय बालकावर गोवा वैद्यकीय महाविद्यालयातून (गोमेकॉ) शस्त्रक्रिया आणि उपचार करण्यात आले. बाल कल्याण समितीच्या निर्देशानुसार, आता या बालकाला पुढील काळजीसाठी काणकोण पोलिसांनी 'अपना घर' या निवारागृहात पाठवले आहे.
लक्षवेधी
तिसवाडी तालुक्यातील एका ७२ वर्षीय निवृत्त व्यक्तीला राज्यातील सर्वांत मोठ्या ऑनलाईन गुंतवणूक घोटाळ्यात ४.७४ कोटी रुपये गमावले लागले होते. या प्रकरणी गोवा पोलिसांच्या सायबर विभागाने अविष्कर देविदास सुराडकर (जालना -महाराष्ट्र) याला अटक केली.
मडगावात तीन वर्षीय मुलगा खेळता खेळता घराजवळील विहिरीत पडला. त्याला तत्काळ इस्पितळात नेले, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अभिषेक मलिक (३) असे या मुलाचे नाव आहे. मडगाव पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून प्रकरण नोंद केले आहे.
नावेली येथील एडबर्ग परेरा मारहाण प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मिंगेल वाझ व अजय झिंगली या दोघांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांना राखीव दलात पाठवण्यात आले आहे. तसेच सदर प्रकरण पुढील तपासासाठी गुन्हे शाखेकडे देण्यात आले आहे.
असोळणा येथून बेतूलच्या दिशेने जात असताना वेळ्ळी येथे दुचाकीचा स्वयंअपघात झाला. जखमी दुचाकीचालक साईश कोळवेकर (२५, वेळळी) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.