गोव्यासह देशभरात छापे : ‘फेमा’ नियमांचे उल्लंघन

पणजी : हवालामार्फत दुबईमध्ये मालमत्ता खरेदी केल्याच्या प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने गोव्यातील कॅसिनो आणि रिअल इस्टेट क्षेत्राशी संबंधित कंपनीच्या मालकांवर मोठी कारवाई केली आहे. दिल्ली मुख्यालयातून मिळालेल्या निर्देशांनुसार ही धडक कारवाई दिल्ली, बांबोळी, दोनापावला आणि इतर राज्यांतील ठिकाणांवर कारवाई करण्यात आली. शुक्रवारी पहाटे सुरू झालेले हे छापासत्र शनिवारी सायंकाळी संपले.
सक्तवसुली संचालनालयाच्या सूत्रांनुसार, अनेक भारतीय नागरिकांनी अलीकडच्या काळात दुबईमध्ये मोठ्या प्रमाणात मालमत्ता खरेदी केल्याचे समोर आले आहे. या व्यवहारांसाठी काही गुंतवणूकदारांनी हवाला निधीचा वापर केल्याची माहिती मिळाल्यानंतर ईडीने प्राथमिक चौकशी सुरू केली होती. चौकशीत या तक्रारींमध्ये तथ्य आढळल्यानंतर ईडीने पुढील पाऊल उचलत देशभरात समन्वयित छापेमारी सुरू केली.
त्यानुसार, ईडीच्या दिल्ली विभागाने गोव्यासह दिल्ली व इतर राज्यातील कंपन्यांसह त्यांच्या मालक भागीदारांच्या ठिकाणांवर शुक्रवारी पहाटे पासून छापासत्र सुरू केले. गोव्यातील नोंदणीकृत आणि पाटो परिसरात कार्यालय असलेल्या एका कॅसिनो आणि रिअल इस्टेटशी निगडित कंपनीच्या मालकाच्या दोनापावला परिसरात छापा टाकण्यात आला. ही कारवाई ईडीने परकीय चलन व्यवस्थापन कायदा (फेमा) कायद्याअंतर्गत सुरू केली आहे. छापा दरम्यान ईडीने मोठ्या प्रमाणात विदेशी चलनांसह दस्तऐवज आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केल्याची माहिती समोर येत आहे.
हवाला ऑपरेटर्सवर मोठी कारवाई
दुबईमध्ये भारतीयांनी ठेवलेल्या बेहिशोबी मालमत्तेच्या गुंतवणूक संदर्भात ईडीने हवाला ऑपरेटर्सवर मोठी कारवाई सुरू केली आहे. परकीय चलन व्यवस्थापन कायदा (फेमा) च्या तरतुदीनुसार एकाच वेळी अनेक ठिकाणी छापे टाकले. फेमा नियमांचे उल्लंघन करून संबंधितांनी पैसे भारताबाहेर हस्तांतरित केले आणि नंतर दुबईमध्ये मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरल्याचा संशय ईडीने व्यक्त केला आहे.
गुंतवणूक केलेल्यांची यादी तयार
हवालामार्फत दुबईतील रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केलेल्या भारतीय नागरिकांची यादी ईडीने तयार केली आहे. या व्यक्तींना ईडीकडून समन्स बजावले जाणार आहे. यानंतर त्यांना चौकशीसाठी दिल्लीतील ईडी मुख्यालयात बोलावण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.