सामना संपला. रात्रीचे बारा वाजून गेले होते... लोकल ट्रेन कधीच तिच्या वेळेवर निघून गेली होती. पण आता हरमनप्रीतला त्याची पर्वा नव्हती. ती आता रेल्वे क्लार्क म्हणून नाही, तर भारताची कर्णधार म्हणून उभी होती!

गेल्या रविवारी भारताच्या महिला क्रिकेट संघाने इतिहास रचला. जवळजवळ ५० वर्षांनंतर, आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सुरुवात केल्यावर त्यांनी आपला पहिला विश्वचषक जिंकला. हा विजय केवळ एक 'सामना' नव्हता, तर तो होता अनेक दशकांच्या संघर्षाचा, त्यागाचा आणि दुर्लक्षित स्वप्नांचा उत्कट अविष्कार! साखळी सामन्यांतील सलग पराभवानंतर या महिलांनी अजिंक्य ऑस्ट्रेलियाला हरवले आणि दक्षिण आफ्रिकेला नमवून इतिहास रचला. मैदानावर दिसणारी त्यांची ही जिद्द त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचीच प्रतिबिंबे होती.
या संघातील अनेक खेळाडू भारतातील छोट्या शहरांमधून आणि अगदी सामान्य कुटुंबांतल्या. ज्यांनी त्यांच्या स्वप्नांवर विश्वास ठेवला. या अशा स्त्रिया आहेत, ज्यांचे करिअर गावाच्या गल्लीत क्रिकेट खेळताना घडले. स्त्री म्हणून त्यांच्या महत्त्वाकांक्षेवर अनेकदा शंका घेण्यात आली. पण जेव्हा थांबणे सोपे होते, तेव्हा त्या पुढे सरकत राहिल्या; आणि याचमुळे त्यांचा हा विजय आज इतका प्रबळ वाटतो. याच संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ही अश्या सामान्य स्त्रीयांपैकीच एक. तुमच्या आमच्यासारखीच!
मुकाम पोस्ट मुंबई... हे शहर अपार स्वप्नांचे ओझे घेऊन धावते. याच शहराच्या गर्दीत काही वर्षांपूर्वी एक मुलगी तिची स्वप्नं जगण्यासाठी धडपडत होती, हरमनप्रीत कौर. पंजाबमधील आपले ंघर, आपले हक्काचे कुटुंब सोडून आलेल्या या मुलीच्या डोळ्यांत एकच ध्येय होते: भारतीय संघासाठी खेळणे!
मुंबईत तिचे रोजचे आयुष्य एखाद्या कठोर परीक्षेसारखे होते. पहाटे डोळे उघडायचे तेच मैदानावर, दमवणारा सराव करण्यासाठी. अंगावरचा घाम वाळायच्या आत, तिला रेल्वेच्या कार्यालयात क्लार्कची जबाबदारी सांभाळायची असे. दिवसभर कागदपत्रांमध्ये मन रमवल्यानंतर, पुन्हा संध्याकाळी त्याच क्रिकेटच्या मैदानाची ओढ! तिचे दुपारचे जेवणही मुंबईच्या लोकल ट्रेनमध्येच व्हायचे. यावेळी एक मोठी चिंता तिच्या मनात असायची, ‘आज शेवटची लोकल ट्रेन वेळेत गाठायला हवी!’
सराव संपायला उशीर झाला, ट्रेन चुकली... तर काय? तर रात्रीच्या अंधारात, एकटीने, ९० मिनिटे चालत घरी जाणे! तिच्या त्या चालण्यात केवळ शरीराचा थकवा नव्हता, तर मनाची भीती आणि येणाऱ्या उद्याची चिंता होती. पण हीच लोकलची धावपळ आणि चालत घरी जाण्याचा तो वेळ, तिच्या स्वप्नांना अधिक मजबूत बनवत गेला. हरमनने तिच्या संघर्षाला कधीही तक्रार म्हणून पाहिले नाही, तर ती एक शक्ती बनली! आणि मग तो क्षण आला... त्याच मुंबई शहरात... पण आता हरमनची कहाणी बदलली होती! सामना संपला. रात्रीचे बारा वाजून गेले होते... लोकल ट्रेन कधीच तिच्या वेळेवर निघून गेली होती. पण आता हरमनप्रीतला त्याची पर्वा नव्हती. ती आता रेल्वे क्लार्क म्हणून नाही, तर भारताची कर्णधार म्हणून उभी होती! दक्षिण आफ्रिकेला हरवून जेव्हा तिने आपला पहिला-वहिला विश्वचषक उंचवला, तेव्हा तो आनंदोत्सव गगनाला भिडला. सुमारे ४०,००० चाहत्यांची गर्जना! फटाक्यांची आतषबाजी! व्यासपीठावर उभी राहून ट्रॉफी स्वीकारताना, तिच्या मनात नक्कीच त्या जुन्या लोकल ट्रेनचा आवाज घुमला असेल.
हा विजय म्हणजे केवळ एक क्रिकेट सामना जिंकणे नव्हते, तर स्त्रीच्या जिद्दीचा, एकाकी संघर्षाचा आणि कधीही हार न मानणाऱ्या तिच्या आत्मविश्वासाचा विजय होता! तो क्षण प्रत्येक भारतीय मुलीला, प्रत्येक स्वप्न पाहणाऱ्या स्त्रीला सांगत होता: तुमच्या आयुष्यातील लोकल ट्रेन चुकली तरी चालेल, पण तुमचे ध्येय कधीही चुकवू नका!

- स्नेहा सुतार