पर्थमधील सुंदर बागा: माझा अनुभव

पश्चिम ऑस्ट्रेलियातील पर्थ शहर निसर्ग आणि आधुनिकतेचा सुरेख संगम आहे. नॉर्थब्रिज पियाझा अर्बन गार्डन आणि ऐतिहासिक किंग्ज पार्क अँड बॉटॅनिक गार्डनच्या भेटीतून शहराचे हिरवेगार आणि टिकाऊ सौंदर्य अनुभवण्याची संधी मिळाली.

Story: दुर्बीण |
07th November, 10:24 pm
पर्थमधील सुंदर बागा: माझा अनुभव

पश्चिम ऑस्ट्रेलियातील पर्थ हे खूप सुंदर आणि स्वच्छ शहर आहे. शहरात जिकडे तिकडे झाडे, फुले आणि नीटनेटक्या बागा दिसतात. निसर्ग आणि आधुनिक जीवन यांचे सुंदर नाते येथे जपलेले आहे. मी माझ्या प्रवासात दोन खास ठिकाणांना भेट दिली, नॉर्थब्रिज पियाझा अर्बन गार्डन आणि प्रसिद्ध किंग्ज पार्क अँड बॉटॅनिक गार्डन. या दोन्ही ठिकाणी मला शहराच्या हिरवळीत मिसळलेला शांतपणा आणि सौंदर्य अनुभवायला मिळाले.

नॉर्थब्रिज पियाझा अर्बन गार्डन हे शहराच्या वरच्या भागात असलेले एक छोटे पण सुंदर बागेचे ठिकाण आहे. हा छतावर बनवलेला बगीचा आहे, जिथून संपूर्ण शहर दिसते. बागेच्या मधोमध एक लाकडी पूल आहे जो दोन हिरव्या भागांना जोडतो. एका बाजूला पालक, कोबी, लेट्यूस अशा भाज्या तर दुसऱ्या बाजूला तुळस, मिंट, रोजमेरी यांसारख्या सुगंधी औषधी वनस्पती दिसतात.

प्रत्येक झाडाजवळ एक छोटा फलक लावलेला आहे, ज्यावर त्याचे नाव, शास्त्रीय नाव आणि उपयोग लिहिलेले आहेत. पाहताना शिकायला आणि समजायला दोन्ही बाबतीत आनंद वाटतो. बागेत पाण्याची व्यवस्था सौरऊर्जेवर चालणाऱ्या प्रणालीने केली आहे. स्थानिक नागरिक आणि विद्यार्थी मिळून ही बाग सांभाळतात. त्यामुळे हे ठिकाण केवळ सुंदर नाही तर टिकाऊ जीवनशैलीचे उत्तम उदाहरण आहे.

यानंतर मी पर्थमधील प्रसिद्ध आणि विशाल उद्यान, किंग्ज पार्क आणि बॉटॅनिक गार्डन पाहायला गेले. हे जगातील सर्वात मोठ्या शहरातील बागांपैकी एक आहे. वरच्या टेकडीवर वसलेले हे उद्यान खाली असलेल्या स्वान नदीकडे पाहते. बागेत चालताना नदीचे शांत पाणी, उडणारे काळे हंस आणि रंगीबेरंगी फुले पाहून मन प्रसन्न झाले.

येथील स्वान गार्डन वॉक अतिशय मनमोहक आहे. चालताना फुलांचा सुवास, झाडांची सावली आणि वाऱ्याचा मंद झोका मनाला शांती देतो. बागेच्या मधोमध एक सुंदर फेडरेशन वॉकवे ब्रिज आहे. त्यावरून चालताना उंच युकेलिप्टस झाडांच्या फांद्या डोक्यावर झुकलेल्या दिसतात. काही ठिकाणी झाडांजवळ माहिती देणारे फलक आहेत, ज्यावर स्थानिक आदिवासी लोकांच्या कथा आणि झाडांबद्दलची माहिती दिली आहे.

या बागेतील सर्वात आकर्षक आणि भावनिक ठिकाण म्हणजे गिजा जु‍मुलु (Gija Jumulu) नावाचं मोठे झाड. हे झाड म्हणजे बाओब (Boab) प्रजातीचं असून सुमारे ७५० वर्षांहून जुने आहे. हे झाड मूळचे किम्बर्ले भागातील आहे आणि ते २००८ साली काळजीपूर्वक पर्थच्या किंग्ज पार्कमध्ये आणले गेले. हे झाड पाहताना निसर्गाची ताकद आणि इतिहास दोन्ही जाणवतात. मी या झाडाजवळ फोटो काढला. माझ्या प्रवासातील तो सर्वात खास क्षण होता.

किंग्ज पार्कमध्ये आणखीही अनेक प्रजातींची झाडे आहेत: मारी (Marri), जर्रा (Jarrah) आणि विविधरंगी फुलांच्या झुडपी वनस्पती. लोक येथे सकाळी फिरायला, व्यायाम करायला किंवा पिकनिकसाठी येतात. मुले झाडांच्या सावलीत खेळतात, तर वयोवृद्ध लोक शांतपणे बेंचवर बसून नदीचे सौंदर्य पाहतात.

या दोन्ही बागांमधील एक गोष्ट मला विशेष जाणवली आणि ती म्हणजे येथे प्रत्येक झाडाचे नाव आणि माहिती व्यवस्थित दिलेली आहे. त्यामुळे ही बाग फक्त फिरण्यासाठी नाही, तर शिकण्यासाठीही एक छान जागा आहे.

पर्थसारख्या शहरात अशा बागा पाहून मला वाटले, शहराचा विकास आणि निसर्गसंवर्धन दोन्ही एकत्र चालू शकतात. अशा प्रकारच्या शहरी बागा, हिरवळीचे रस्ते आणि छतावरील गार्डन ही कल्पना आपल्याकडे गोव्यातही राबवली तर किती सुंदर होईल!

किंग्ज पार्कमधील गिजा जु‍मुलु झाडासमोर उभं राहून मी निसर्गाशी जोडलेपणाचा आनंद अनुभवला. त्या क्षणी मला वाटले, प्रत्येक झाड, प्रत्येक बाग आपल्याला काहीतरी शिकवते. पर्थची बाग म्हणजे निसर्ग आणि माणूस यांचे सुंदर नाते जपणारी जिवंत शाळा आहे.


- डॉ. सुजाता दाबोळकर