साहाय्यक मोटार वाहन निरीक्षकाला अंतरिम दिलासा

बनावट अनुभव प्रमाणपत्र प्रकरण

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago
साहाय्यक मोटार वाहन निरीक्षकाला अंतरिम दिलासा

पणजी : वाहतूक खात्यात २०१० मध्ये बनावट अनुभव प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळविल्याच्या प्रकरणात न्यायालयाने साहाय्यक मोटार वाहन निरीक्षक दत्तप्रसाद गणेश नाईक याला अटक न करण्याचा अंतरिम दिलासा दिला आहे. न्यायालयाने त्याला २० हजार रुपयांची हमी देणे, तपास अधिकाऱ्याला सहकार्य करणे व इतर अटींवर अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. याबाबतचा आदेश म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश द्विज्पल पाटकर यांनी दिला.

या प्रकरणी वाहतूक खात्याचे उपसंचालक नॅन्सी फर्नांडिस यांनी तक्रार दाखल केली. त्यानुसार, साहाय्यक मोटार वाहन निरीक्षक दत्तप्रसाद गणेश नाईक यांनी मेरशी येथील खाप्रो गॅरेजमधून एक वर्षाचे अनुभव प्रमाणपत्र १६ डिसेंबर २०१० रोजी खात्यात सादर केले. त्या प्रमाणपत्राची व इतर प्रक्रिया पूर्ण करून नाईक यांना खात्यात साहाय्यक मोटार वाहन निरीक्षकपदी नियुक्त करण्यात आले. याच दरम्यान नाईक यांनी बनावट अनुभव प्रमाणपत्र सादर केल्याची माहिती खात्याला मिळाली. त्यानुसार, पणजी पोलीस स्थानकात तक्रार नोंद करण्यात आली. याची दखल घेऊन पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रश्मिका कवळेकर यांनी दत्तप्रसाद गणेश नाईक यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला.

या प्रकरणी नाईक यांनी मेरशी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. त्यानुसार, गुरुवारी म्हापसा येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश द्विज्पल पाटकर यांनी सुनावणी घेतली. त्यावेळी न्यायालयाने दोन्ही बाजू एेकून घेतल्यानंतर अटकपूर्व जामिनावर निर्णय होईपर्यंत अटक न करण्याचा अंतरिम दिलासा देण्याचा आदेश जारी केला. तसेच नाईक याला २० हजार रुपयांची हमी देणे, तपास अधिकाऱ्याला सहकार्य करणे, साक्षीदारांवर दबाव न टाकणे व इतर अटी घालण्यात आल्या. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी १७ नोव्हेंबर रोजी ठेवली आहे. 

हेही वाचा