गोव्यात दहा महिन्यांत १,९४२ अपघातांत २१३ जणांचा मृत्यू

पणजी : राज्यात (Goa) मागील दहा महिन्यांत अपघातसत्र (accidents) सुरूच असून १,९४२ अपघातांत २१३ जणांचा मृत्यू (accidental death) झाला आहे. त्यातील २३ मृत्यू पणजी ते आगशीपर्यंतच्या (Panjim to Agacaim) राष्ट्रीय महामार्गावर (highway) झाले आहेत. म्हणजेच दर महिन्याला राज्यात २० जणांचा अपघाती बळी जात आहे, तर पणजी ते आगशी दरम्यानच्या भागात दर महिन्याला दोघे जीव गमावत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
बांबोळी येथे नियाझ रेस्टॉरंटजवळील उतरणीवर सोमवारी मध्यरात्री टँकर आणि ‘रेंट अ कॅब’च्या (rent a cab) भीषण अपघातात दोघे ठार झाले. या पार्श्वभूमीवर राज्यातील अपघाती मृत्यूंचा आढावा घेतला असता, मागील दहा महिन्यांत राज्यात १,९४२ अपघातांत २१३ जणांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे. त्यातील २३ मृत्यू पणजी ते आगशीपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गावर झाले आहेत. याच भागात शिरदोण (Siridao) येथील उतरणीवर २१ ऑक्टोबर रोजी पहाटे स्वयंअपघात झाला होता. त्यात हरिगोविंद पी. (२२, कोलम-केरळ) आणि विष्णू जयप्रकाश (२१, कन्नुर-केरळ) या नौदलाच्या अग्निवीर कॅडेट युवकांचा मृत्यू झाला होता.

राज्यात १ जानेवारी ते ३ नोव्हेंबर या कालावधीत २०२४ च्या तुलनेत अपघात (२६६/१२.०४ टक्के) आणि अपघाती मृत्यू (२९/११.९८ टक्के) कमी झाले आहेत. दर महिन्याला सरासरी १९४ अपघात, तर २० जणांचा अपघाती मृत्यू होत असल्याचे समोर आले आहे. मागील काही महिन्यांत राज्यातील अपघातांत आणि मृत्यूंत झपाट्याने वाढ होत असल्याचेही दिसून आले आहे. याशिवाय विचित्र पद्धतीचे भयानक अपघात होत आहेत.

१९३ अपघातांत २४५ जण गंभीर जखमी
राज्यात वरील कालावधीत २१३ मृत्यूंशिवाय १९३ अपघातांत २४५ जण गंभीर जखमी झाले, तर ३५० अपघातांत ५६६ जण किरकोळ जखमी झाले आहेत. याशिवाय १,१९३ अपघातांत वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. वरील कालावधीत २०२४ मध्ये राज्यात २,२०८ अपघात झाले होते. त्यांतील २३० भीषण अपघातांत २४२ जणांचा बळी गेला होता. त्यावेळी १५२ अपघातांत २१७ जणांना गंभीर, तर ४०८ अपघातांत ६५० जणांना किरकोळ दुखापती झाल्या होत्या. शिवाय १,४१३ वाहनांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे २०२५ मध्ये २०२४च्या तुलनेत २६६ अपघात, तर अपघाती मृत्यूही २९ कमी झाले आहेत.