पणजी पोलिसांकडून साहाय्यक मोटार वाहन निरीक्षकाविरोधात गुन्हा दाखल

पणजी : वाहतूक खात्यात २०१० मध्ये बनावट अनुभव प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळविल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पणजी पोलिसांनी साहाय्यक मोटार वाहन निरीक्षक दत्तप्रसाद गणेश नाईक (मडकई -फोंडा) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पणजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी वाहतूक खात्याचे उपसंचालक नॅन्सी फर्नांडिस यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, साहाय्यक मोटार वाहन निरीक्षक दत्तप्रसाद गणेश नाईक यांनी मेरशी येथील खाप्रो गॅरेजमधून एक वर्षाचे अनुभव प्रमाणपत्र १६ डिसेंबर २०१० रोजी खात्यात सादर केले. त्या प्रमाणपत्राची व इतर प्रक्रिया पूर्ण करून नाईक यांना खात्यात साहाय्यक मोटार वाहन निरीक्षकपदी नियुक्त करण्यात आले. याच दरम्यान नाईक यांनी बनावट अनुभव प्रमाणपत्र सादर केल्याची माहिती खात्याला मिळाली. त्यानुसार, खात्याअंतर्गत प्राथमिक चौकशी केली असता, सदर प्रमाणपत्र बनावट असल्याचे समोर आले. पणजी पोलीस स्थानकात तक्रार नोंद करण्यात आली. याची दखल घेऊन पोलीस निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रश्मिका कवळेकर यांनी दत्तप्रसाद गणेश नाईक यांच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला.
याच दरम्यान पोलिसांनी नाईक यांना नोटीस बजावून चौकशीस हजर राहण्यास सांगितले आहे.