लग्नासाठी परदेशातून गोव्यात आलेल्या युवकाचा दुचाकीच्या स्वयंअपघातात मृत्यू

सुरावली येथील घटना : दुचाकीची संरक्षक भिंतीला धडक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
05th November, 11:18 pm
लग्नासाठी परदेशातून गोव्यात आलेल्या युवकाचा दुचाकीच्या स्वयंअपघातात मृत्यू

मडगाव : लग्न करण्यासाठी परदेशातून गोव्यात आलेल्या युवकाचा दुचाकीच्या स्वयंअपघातात मृत्यू झाल्याची घटना सुरावली येथे घडली. पेडा-बाणावली येथील लिओ फर्नांडिस (३८) हा सुरावली येथून बाणावलीच्या दिशेने जात असताना सुरावली रेल्वे गेट क्रॉसिंगनजीक दुचाकीवरील ताबा सुटला व दुचाकी संरक्षक भिंतीवर आदळली. यात जखमी लिओ याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोलवा पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून प्रकरण नोंद केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३ नोव्हेंबर रोजी २ वाजण्याच्या सुमारास अपघाताची घटना घडली. लिओ फर्नांडिस हा आणखी एका व्यक्तीसोबत दुचाकीवरुन सुरावली येथून बाणावलीच्या दिशेने जात होता. यावेळी लिओ फर्नांडिस गाडी चालवत होता. दुचाकी सुरावली येथील रेल्वे क्रॉसिंग गेटकडे आली असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटला व गाडी नजीकच्या संरक्षक भिंतीवर जाऊन आदळली. यात लिओ फर्नांडिस याला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी मडगावातील एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याची उत्तरीय तपासणी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात करण्यात आली व मृतदेह अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला.

या प्रकरणी कोलवा पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू म्हणून प्रकरण नोंद केले. पोलीस उपनिरीक्षक वर्षदा नाईक पुढील तपास करीत आहेत.

डिसेंबरमध्ये होते लग्न

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लिओ फर्नांडिस हा परदेशात कामाला होता तसेच सध्या सुटीवर गोव्यात आला होता. डिसेंबर महिन्यात त्याचे लग्न ठरवण्यात आले होते. मात्र, त्याआधीच लिओ याचा अपघाती मृत्यू झाला. 

हेही वाचा