गोवा सीमावर्ती भागातील १२ कोटींच्या घोटाळाप्रकरणी बाबासाहेब कोळेकरला अटक

घरबसल्या अगरबत्ती पॅकिंगच्या नावाखाली गंडा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
39 mins ago
गोवा सीमावर्ती भागातील १२ कोटींच्या घोटाळाप्रकरणी बाबासाहेब कोळेकरला अटक

बेळगाव : खानापूर, बेळगाव शहर परिसर तसेच गोवा सीमेवरील गावांमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या तब्बल १२ कोटींच्या अगरबत्ती जॉब घोटाळ्यात शहापूर पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी बाबासाहेब लक्ष्मण कोळेकर याला अटक केली आहे. कोळेकर याने ‘अजय पाटील’ या बनावट नावाने बी. एम. ग्रुप महिला गृह उद्योग संघ या संस्थेच्या नावाखाली हजारो महिलांची फसवणूक केली होती. घरबसल्या अगरबत्ती पॅकिंगचे काम देण्याचे आश्वासन देत त्याने महिलांकडून प्रत्येकी २,५०० ते ५,००० इतकी रक्कम ‘वर्क आयडी’ तयार करण्यासाठी घेतली. तसेच इतर महिलांना भरती केल्यास जास्त उत्पन्न मिळेल असे सांगत चेन मार्केटिंगसारखी यंत्रणा उभी केली होती. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील जलोळी गावचा रहिवासी असलेला आणि सध्या पुण्यात वास्तव्यास असलेला हा आरोपी गेल्या महिन्याभरापासून बेळगावातील महिलांकडून कोट्यवधी रुपये गोळा करून फरार झाला होता.

सुरुवातीला ही योजना खरी वाटावी अशी रचना करण्यात आली होती. कोळेकरने बेळगावात कार्यालय भाड्याने घेतले, घराघरांत अगरबत्ती पॅकिंगचे साहित्य पाठवले आणि स्थानिक ऑटोचालकांची नेमणूक वितरणासाठी केली. परंतु काही दिवसांनी देयके थांबली आणि कार्यालय बंद आढळल्यावर शेकडो महिलांना आपली फसवणूक झाल्याचे समजले. बहुतांश पीडित महिला गृहिणी आणि स्वयं-सहायता गटांच्या सदस्य होत्या. ‘माझ्या पतीच्या निधनानंतर मुलांना सांभाळण्यासाठी ५,००० गुंतवले, पण सर्व काही गमावले,’ असे पीडित महिला लक्ष्मी आनंद कांबळे यांनी सांगितले. आता आम्हाला फक्त न्याय हवा आहे, ऑटोचालक गोविंद लामाणी यांनीही सांगितले, त्याने आमच्या ऑटोची नेमणूक माल पोहोचवण्यासाठी केली, पण कधीच पैसे दिले नाहीत. माझ्या बायकोनेही या योजनेत २०,००० गमावले, असे त्याने सांगितले. 

२५ ऑक्टोबर २०२५ रोजी लक्ष्मी कांबळे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीच्या आधारे सखोल चौकशी करून शहापूर पोलिसांनी पोलीस निरीक्षक एस. एस. सीमाणी यांच्या मार्गदर्शनाखाली ४ नोव्हेंबर रोजी कोळेकरला अटक केली. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक माणिकांत पुजारी, एस. एन. बसवा, सीसीबीचे मनोज भजनत्री तसेच तांत्रिक पथकातील एस. एम. गुड्डादिगोल, श्रीधर तलवार, अजित शिपूरे आणि रमेश अक्की यांच्या समन्वयाने पार पडली. त्यांच्या या कामगिरीचे बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी कौतुक केले. ही मोठी कामगिरी असून नागरिकांनी अशा अप्रमाणित घरबसल्या नोकरी योजनांपासून सावध रहावे, असे त्यांनी सांगितले. या प्रकरणातील फसवलेली रक्कम शोधण्याचे आणि इतर संबंधित व्यक्तींचा मागोवा घेण्याचे काम सुरू आहे.


हेही वाचा