भटकळ पोलिसांच्या हाती घबाड : मुंबईहून मंगळुरूकडे जाणाऱ्या खासगी बसवर कारवाई

जोयडा : मुंबई-मंगळूर या मार्गावर धावणाऱ्या एका खासगी बसमधून भटकळ पोलिसांनी सोने आणि रोकडचा मोठा साठा जप्त केला. रात्रीच्या गस्तीदरम्यान बसची तपासणी करताना पोलिसांना एका सूटकेसमधून तब्बल ४०१ ग्रॅम वजनाच्या ३२ सोन्याच्या बांगड्या आणि ५० लाख रुपये रोकड मिळाली.
ही सूटकेस पाहता साधी ‘स्वीट बॉक्स’ पॅकिंगसारखी वाटत होती; पण आत ‘सोन्याच्या बांगड्या व रोकड ’ होती.
अनोळखी व्यक्तीने दिली होती सूटकेस
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत एका अनोळखी व्यक्तीने बसचालकाला ही सूटकेस देत ‘मंगळूर बसस्थानकात आमचे लोक येऊन घेतील’ असे सांगितले होते. चालकाने ती बसमध्ये ठेवली, पण भटकळमध्ये पोलिसांच्या तपासात सगळा प्रकार उघड झाला.
पोलिसांकडून कसून चौकशी सुरू
सध्या भटकळ पोलिसांनी सोने आणि रोकड दोन्ही ताब्यात घेतली असून, या सूटकेसचा खरा मालक कोण, याचा शोध सुरू आहे. बस चालकाचीही चौकशी चालू असून प्रकरणात काळा पैसा किंवा सोने तस्करीचा मागोवा घेतला जात आहे.
एवढ्या मोठ्या रकमेची सुटकेस अनोळखीकडे दिली कशी?
वाढत्या चोरी आणि दरोड्याच्या जमान्यात एका बसचालकाकडे एवढी मोठी रोकड व कॅश असलेली सुटकेस कशी दिली, खरेच या संदर्भात त्या बस चालकाला काहीच माहिती नव्हते का? की चालकच सुटकेसचा मुख्य वाहतूकधार आहे, याचा तपास पोलीस करीत आहेत.