आगशी पोलिसांकडून मोटारसायकलस्वारावर गुन्हा दाखल

पणजी : गोवा वेल्हा येथील पेट्रोल पंपजवळ सोमवारी सकाळी यामाहा मोटारसायकल आणि हिरो होंडा अॅक्टिव्हामध्ये झालेल्या अपघातात नेवरा येथील संगीता नाईक (७१) यांचे उपचारादरम्यान गोमेकाॅत निधन झाले. या प्रकरणी आगशी पोलिसांनी यामाहा मोटार सायकल चालक मोहम्मद झैद शेख (२१, आगशी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
आगशी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार दि. ३ रोजी सकाळी ११.३५ वाजता गोवा वेल्हा येथील इंडियन आॅईल पेट्रो पंपजवळ यामाहा मोटार सायकल आणि अॅक्टिव्हामध्ये अपघात झाला. दोन्ही वाहने शिरदोनहून गोवा वेल्हाच्या दिशेने जात होती. त्यावेळी पेट्रोल पंपच्या समोर पोहचताच अॅक्टिव्हा दुचाकी चालक साजू नाईक (७८, नेवरा) यांच्या दुचाकीत पेट्रोल भरण्याचे असल्याने वळण घेतले. त्याचवेळी त्यांच्या मागाहून येणाऱ्या यामाहा मोटार सायकल चालक मोहम्मद झैद शेख याने आपली दिशा सोडून वळण घेणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात अॅक्टिव्हा दुचाकी चालक साजू नाईक आणि दुचाकीवर मागे बसलेली त्यांची पत्नी संगीता नाईक (७१) दोघे खाली पडले आणि गंभीर जखमी झाले. त्या दोघांसह यामाहा चालक मोहम्मद झैद शेख याला बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यानंतर प्राथमिक उपचार करून शेख याला घरी पाठविण्यात आले. तर, दुचाकीवर मागे बसलेली संगीता नाईक यांचे उपचारादरम्यान निधन झाले.
या प्रकरणी आगशी पोलीस स्थानकाचे निरीक्षक अनंत गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विनित कुर्टीकर यांनी अपघाताचा पंचनामा केला. पोलिसांनी पेट्रोल पंप परिसरात असलेल्या सीसीटीव्हीची चाचणी केल्यानंतर मोहम्मद झैद शेख याच्या निष्काळजी आणि बेफीकीरपणामुळे अपघात झाला. अपघातात संगीता नाईक हिचा मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी मोहम्मद झैद शेख याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.