‘टाईम ऑफ दी डे’ नुसार वीज दराची रचना
पणजी : गोवा वीज खात्याने आता वीज वापराच्या वेळेनुसार (टाईम ऑफ दी डे - टीओडी) वीज दरांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. या बदलांना संयुक्त वीज नियामक आयोगाने (जेईआरसी) नुकतीच मंजुरी दिली असून, १ नोव्हेंबरपासून याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. या नवीन नियमांमुळे ग्राहकांना वीज बचतीसाठी प्रोत्साहन मिळणार आहे.
टाईम ऑफ डे नुसार विजेचा कमी वापर होणाऱ्या तासात नेहमीच्या दरापेक्षा २० टक्के कमी दराने वीज मिळणार आहे. तर सर्वाधिक वापर असणाऱ्या (पीक अवर) नेहमीच्या दरापेक्षा २० टक्के अधिक दर द्यावे लागणार आहेत. यानुसार सकाळी ९ ते संध्याकाळी ५ पर्यंत सध्या लागू असणाऱ्या दराच्या ८० टक्के दर आकारले जातील. संध्याकाळी ५ ते पहाटे १ पर्यंत नेहमीच्या दराच्या १२० टक्के दर द्यावे लागतील. तर पहाटे १ ते सकाळी ९ पर्यंत नेहमी एवढेच म्हणजे १०० टक्के दर आकारले जातील.
दोन वर्षांच्या अभ्यासानंतर निर्णय
वीज खात्याने आयोगाला वीज दरवाढ प्रस्ताव देताना सोबत टाईम ऑफ दी डेचा प्रस्ताव देखील मांडला होता. खात्याने मागील दोन वर्षांचा वीज वापराचा आढावा घेतला होता. सर्वाधिक वीज वापर कोणत्या वेळेत होतो याची माहिती जमा करण्यात आली होती. यानुसार ठराविक वेळेसाठी ठराविक दर आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. खात्याने उन्हाळा तसेच पर्यटन हंगाम व पावसाळा आणि हिवाळ्यासाठी वेगवेगळे टाईम ऑफ दी डे दर प्रस्तावित केले होते.
खात्याने चोवीस तासांचे चार टप्पे करून विजेच्या मागणीनुसार ९० ते १४० टक्के टाईम ऑफ दी डेदर प्रस्तावित होते. मात्र आयोगाने हंगामी तसेच चार टप्प्यांच्या या प्रस्तावाला मंजुरी दिली नाही. त्याऐवजी बाराही महिने चोवीस तासातील तीन टप्प्यांना मंजुरी दिली आहे. कृषी ग्राहकांना टाईम ऑफ दी डे दर लागू असणार नाहीत. टाईम ऑफ दी डे दर आर्थिक वर्ष २०२५-२६ ते २०२९-३० पर्यंत लागू असणार आहेत. याशिवाय आयोगाने खात्याने प्रस्तावित केलेल्या नवीन वीज ग्राहक श्रेणीना मान्यता दिली आहे.
कोणाला लागू होणार नवा नियम?
* उच्च आणि अति उच्च दाब ग्राहक श्रेणीतील औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना १ नोव्हेंबरपासून 'टाईम ऑफ दी डे' दर बंधनकारक असणार आहेत.
* कमी दाबाच्या घरगुती ग्राहकांना त्यांच्या घरी डिजिटल मीटर बसवल्यानंतर ‘टीओडी’ दर लागू होतील.
* वीज खात्यातर्फे डिजिटल मीटर बसवण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून कृषी ग्राहकांना मात्र हे दर लागू नसतील.