राज्यात रेल्वे अपघातात महिन्याला ४ जणांचा मृत्यू

‘एनसीआरबी’चा धक्कादायक अहवाल : २०२१ ते २०२३ या तीन वर्षांत १४६ जण दगावले

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago
राज्यात रेल्वे अपघातात महिन्याला ४ जणांचा मृत्यू

पणजी : राज्यात २०२१ ते २०२३ दरम्यान रेल्वे अपघातात १४६ जणांचा मृत्यू झाला होता. याचाच अर्थ वर्षाला सरासरी ४८, तर महिन्याला सरासरी ४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये प्रामुख्याने रुळावरून चालताना रेल्वेची धडक बसल्याने अथवा चालत्या रेल्वेतून पडल्याने झालेल्या मृत्यूंचे प्रमाण सर्वाधिक आहे.
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (एनसीआरबी) 'भारतातील अपघाती मृत्यू आणि आत्महत्या' या अहवालांतून ही माहिती समोर आली आहे. एनसीआरबीच्या अहवालानुसार, राज्यात २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये रेल्वे अपघातात मृत्यूंचे प्रमाण वाढले होते.
२०२३ मध्ये ते पुन्हा कमी झाले. वर्ष २०२१ मध्ये राज्यात रेल्वे अपघाताच्या ४९ घटनांची नोंद झाली. यामध्ये ४९ जणांचा मृत्यू झाला होता. यातील एक मृत्यू यांत्रिकी चुकांमुळे झाला होता. २०२२ मध्ये ही संख्या वाढली. त्यावर्षी ५४ घटनात ५४ जणांचा मृत्यू झाला होता. २०२३ मध्ये रेल्वे अपघाताच्या एकूण ४४ घटनांमध्ये २ जण जखमी झाले होते. तर ४३ जणांचा मृत्यू झाला होता.
संपूर्ण देशाचा विचार करता २०२१ मध्ये रेल्वे अपघातात १६ हजार ४३१ जणांचा मृत्यू झाला होता. सर्वाधिक ११ हजार ३६ मृत्यू (६८ टक्के) रुळावरून चालताना रेल्वेची धडक बसल्याने झाले होते. राज्य निहाय पाहता महाराष्ट्रात सर्वाधिक २,५३५ जणांचा मृत्यू झाला होता. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश येथेही मृत्यूंचे प्रमाण अधिक होते. तर कर्नाटक, हिमाचल प्रदेश येथे हे प्रमाण कमी होते. २०२२ मध्ये मध्ये रेल्वे अपघातात २० हजार ७९२ जणांचा तर २०२३ मध्ये २१ हजार ८०३ जणांचा मृत्यू झाला होता.




हेही वाचा