बदली आदेशाचे पालन न केल्यास पोलीस विभाग प्रमुखावर कारवाई

५७९ जण रडारवर : आदेशानंतरही न गेल्याने बिनतारी संदेश


22nd October, 11:37 pm
बदली आदेशाचे पालन न केल्यास पोलीस विभाग प्रमुखावर कारवाई

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : पोलीस स्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार पोलीस खात्याने मागील पाच वर्षांत अनेक कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या. मात्र अधिकारी आणि कर्मचारी मिळून ५७९ जण अद्याप नवीन जागी रूजू झालेले नाहीत. त्यामुळे उपमहानिरीक्षकांच्या आदेशानुसार, कर्मचाऱ्यांना मुक्त न केल्यास संबंधित पोलीस स्थानक किंवा विभागाच्या प्रमुखावर खात्याअंतर्गत कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबतचा बिनतारी संदेश पोलीस मुख्यालयाच्या अधीक्षकांनी जारी केला आहे.
खात्याने अनेक वर्षे एकाच ठिकाणी कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची यादी मागवली होती. त्यातून अनेक जण पाच वर्षांहून अधिक काळ एकाच ठिकाणी असल्याचे स्पष्ट झाले. काही कर्मचाऱ्यांनी नवीन ठिकाणी रूजू न होता, पुन्हा त्याच ठिकाणी बदली करून घेतल्याचे समोर आले. कर्मचाऱ्यांनी आपल्या सोयीनुसार बदली करून घेण्यासाठी राजकीय वजन वापरल्याचे उघड झाले. जानेवारी २०२५ च्या अखेरीस मोठ्या संख्येने बदलीसाठी अर्ज आले होते. याला वरिष्ठांनी आक्षेप घेतला. यापूर्वी बदली झालेले किती जण नवीन ठिकाणी रूजू झाले, याची यादी मागवली. फेब्रुवारी २०२५ मध्ये पुन्हा यादी मागवली असता, सुमारे २३० जण नवीन जागी रूजू झाले नसल्याचे दिसून आले. याची दखल घेऊन कर्मचाऱ्यांना मुक्त करण्याचे, तसेच नवीन जागी रूजू न झाल्यास वेतन ने देण्याचे बिनतारी आदेश जारी केले होते. तरीदेखील अद्याप ७३ कर्मचाऱ्यांनी जुनी जागा सोडलेली नाही.
२०२५ मध्ये पोलीस स्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार अनेक कर्मचाऱ्यांची बदली केली. त्यातील ५०६ जण अद्याप नवीन ठिकाणी रूजू झालेले नाहीत. या संदर्भात खात्याने १५ आणि १९ सप्टेंबर रोजी बिनतारी संदेश जारी करून कर्मचाऱ्यांना मुक्त करण्याचे आदेश दिले. असे असतानाही अद्यापही सुमारे ५७९ कर्मचारी त्याच ठिकाणी आहेत. मुख्यालयाचे पोलीस उपमहानिरीक्षक अजय कृष्णन शर्मा यांच्या आदेशानुसार, मुख्यालयाचे अधीक्षक धर्मेश आंगले यांनी बिनतारी संदेश जारी करून सर्व अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना मुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. तसे न केल्यास संबंधित पोलीस स्थानक, तसेच विभागाच्या प्रमुखावर खात्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
पाच वर्षांत ७३ जणांकडून आदेशाचे पालन नाही
२०२० ते २०२५ मध्ये बदली झालेले ७३ पोलीस कर्मचारी नवीन ठिकाणी रूजू झाले नाहीत. त्यात ५ उपनिरीक्षक, ७ साहाय्यक उपनिरीक्षक, २० हवालदार, ३९ काॅन्स्टेबल आणि इतर २ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
वर्षभरात ५०६ जणांनी सोडली नाही जागा
२०२५ मध्ये बदली केलेल्या कर्मचाऱ्यांपैकी ५०६ जण नवीन ठिकाणी रुजू झाले नाहीत. त्यात ३ पोलीस निरीक्षक, २४ उपनिरीक्षक, ३९ साहाय्यक उपनिरीक्षक, ६० हवालदार, ३८० काॅन्स्टेबल व इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
पुन्हा मूळ जागा मिळणार नाही, ही भीती
काही पोलीस अधिकारी व कर्मचारी मागील अनेक वर्षे एकाच ठिकाणी आहेत. त्यांच्या बदलीचे फक्त आदेश जारी झाले. त्यांनी नवीन ठिकाणी रूजू होणे आवश्यक आहे. मात्र तेथे गेल्यानंतर संबंधित अधिकारी पुन्हा मूळ जागी रूजू होण्यास अडथळा निर्माण करू शकतील, या भीतीपोटी काही कर्मचारी आदेशाचे पालन करत नाहीत, अशी माहिती पोलीस मुख्यालयातील सूत्रांनी दिली.