गोव्यातील म्युच्युअल फंड गुंतवणुकीत एका महिन्यात ६४० कोटींची वाढ

एएमएफआयच्या अहवालातून स्पष्ट : देशभरातून ९८ लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक


22nd October, 11:27 pm
गोव्यातील म्युच्युअल फंड गुंतवणुकीत एका महिन्यात ६४० कोटींची वाढ

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत गोव्यातून होणाऱ्या म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीत वाढ झाली होती. ऑगस्ट महिन्यात अमेरिकेने लादलेल्या आयात शुल्क (टॅरीफ) वाढमुळे गुंतवणुकीत काहीशी घट झाली. मात्र सप्टेंबरमध्ये गुंतवणुकीत पुन्हा वाढ झाली आहे. ऑगस्ट २०२५ अखेरपर्यंत गोव्यातून म्युच्युअल फंडमध्ये ४० हजार ३६० कोटी रुपये गुंतवण्यात आले होते. सप्टेंबर २०२५ अखेरीस त्यात ६४० कोटी रुपयांची वाढ होऊन ती ४१ हजार कोटी रुपये झाली आहे. एएमएफआय या संस्थेने जारी केलेल्या अहवालातून ही माहिती मिळाली आहे.
‘एएमएफआय’ संस्थेने जारी केलेल्या अहवालानुसार, गोव्यातील सप्टेंबर महिन्यात म्युच्युअल फंडमधील प्रतिव्यक्ती गुंतवणूकदेखील वाढली आहे. ऑगस्ट २०२५ अखेरीस गोव्यात प्रतिव्यक्ती २ लाख ५७ हजार ३०० रुपये म्युच्युअल फंडमध्ये गुंतवण्यात आले होते. सप्टेंबर २०२५ अखेरीस त्यात वाढ होऊन ती प्रतिव्यक्ती २ लाख ६० हजार ५३० रुपये झाली आहे. गोव्यातील प्रतिव्यक्ती गुंतवणूक ही देशात सर्वाधिक होती. या यादीत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी आहे. महाराष्ट्रातून प्रतिव्यक्ती २ लाख ४९ हजार ५१० रुपये म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले गेले आहेत. केंद्र शासित प्रदेशांत दिल्लीतील प्रतिव्यक्ती गुंतवणूक २ लाख ९३ हजार ९१० रुपये आहे.
सर्वाधिक ३०,२५९ कोटी ग्रोथ/इक्विटी स्कीममध्ये
अहवालानुसार, सप्टेंबर २०२५ अखेरपर्यंतच्या आकडेवारीनुसार गोव्यातील एकूण गुंतवणुकीपैकी सर्वाधिक ३० हजार २५९ कोटी रुपये ग्रोथ/इक्विटी स्कीममध्ये गुंतवण्यात आले आहेत. ४ हजार ७०८ कोटी रुपये डेबिट ओरिएंटेड स्कीममध्ये, १ हजार ६८५ कोटी रुपये लिक्विड स्कीममध्ये, ३ हजार ६७२ कोटी रुपये बॅलन्स स्कीममध्ये, तर २५४ कोटी रुपये गोल्ड एक्सचेंज ट्रेड फंडमध्ये गुंतवले आहेत. संपूर्ण देशाचा विचार करता सप्टेंबर २०२५ अखेरीस म्युच्युअल फंडमध्ये सुमारे ९८ लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवण्यात आले आहेत.