‘वन नेशन, वन रेशन’ योजनेमध्ये वाढती नोंद
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गोव्यातील सार्वजनिक धान्य वितरण प्रणालीचा लाभ घेणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील नागरिकांचा सर्वाधिक सहभाग आहे, अशी माहिती नागरी पुरवठा खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सुमारे ११९ रेशनकार्डधारक गोव्यातून रेशन घेत आहेत. यामध्ये सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील लाभार्थ्यांचा वाटा तब्बल २७ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. ६९ जणांनी दक्षिण गोव्यातून, तर ५० जणांनी उत्तर गोव्यातून रेशन घेतले आहे. महाराष्ट्रातील २६ जिल्ह्यांतील नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे नोंदणीवरून स्पष्ट झाले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वाधिक १८ कार्डधारक असून, १५ कार्डधारक कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. सोलापूर जिल्हा ९ कार्डधारकांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. रत्नागिरी आणि वडाळा (मुंबई) येथील प्रत्येकी ७, बुलढाणा, कांदिवली, पुणे, सांगली, सातारा आणि ठाणे येथील प्रत्येकी ५ कार्डधारकांनी गोव्यातून रेशन घेतले आहे. अकोला, बीड आणि नांदेड येथील प्रत्येकी ४, अंधेरी, जळगाव, लातूर आणि नागपूर येथील प्रत्येकी ३, धाराशिव आणि पालघर येथील प्रत्येकी २, तर अहमदनगर, अमरावती, हिंगोली, नाशिक, परळ आणि यवतमाळ येथील प्रत्येकी एका कार्डधारकाने योजनेचा लाभ घेतला आहे.