समितीचे अध्यक्ष सुभाष शिरोडकर : समितीची पुढील बैठक १९ नोव्हेंबरला
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : राज्यात महाविद्यालये एकत्र करून क्लस्टर विद्यापीठ स्थापन करण्याविषयी चिकित्सा समिती महाविद्यालयांचे प्राचार्य, तसेच व्यवस्थापनाच्या सूचना ऐकून निर्णय घेईल. पुढील बैठकीला प्राचार्य, व्यवस्थापनाचे सदस्य आणि अन्य तज्ज्ञांची उपस्थिती असेल, अशी माहिती चिकित्सा समितीचे अध्यक्ष तथा जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली. विद्यापीठ कायदा दुरुस्ती विधेयकावरील चिकित्सा समितीची पहिली बैठक बुधवारी झाली.
विद्यापीठ दुरुस्ती विधेयकाच्या चिकित्सा समितीच्या बैठकीत सदस्य आमदारांनी चांगल्या सूचना मांडल्या. सर्व सूचनांची नोंद ठेवली आहे. क्लस्टर विद्यापीठ झाले तर गोवा विद्यापीठावर कोणता परिणाम होईल ? महाविद्यालयांवर काय परिणाम होतील, याविषयी आमदारांनी विचार मांडले. क्लस्टर विद्यापीठ झाले नाही तर काय परिणाम होईल, यावरही चर्चा करण्यात आली. प्राचार्य, महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे सदस्य यांच्यासमवेत बैठक होईल. चिकित्सा समितीच्या पुढील बैठकीला प्राचार्य आणि अन्य संबंधितांची उपस्थिती असेल. त्यांच्याकडून समिती माहिती जाणून घेईल, असे चिकित्सा समितीचे अध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी सांगितले. पुढील बैठक १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
दोन, तीन महाविद्यालये एकत्र करून क्लस्टर विद्यापीठ स्थापन करण्यासाठी सरकारने विद्यापीठ दुरुस्ती विधेयक सभागृहात सादर केले. पावसाळी अधिवेशनात शिक्षणमंत्री या नात्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हे विधेयक सभागृहात मांडले. विरोधी आमदारांनी विरोध केल्याने विधेयक चिकित्सा समितीकडे पाठवण्याचा निर्णय झाला. जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर हे चिकित्सा समितीचे अध्यक्ष आहेत. आमदार विजय सरदेसाई, अालेक्स सिक्वेरा, कृष्णा साळकर, अॅड. कार्लुस फेरेरा, वीरेश बोरकर, देविया राणे, नीलेश काब्राल हे चिकित्सा समितीचे सदस्य आहेत. सभागृहात सर्व विरोधी आमदारांनी विधेयकाला विरोध करून विधेयक चिकित्सा समितीकडे पाठवण्याची मागणी केली होती.
गोवा विद्यापीठाला बसणार फटका : विजय सरदेसाई
क्लस्टर विद्यापीठ विधेयकाचा सखोल अभ्यास होण्याची गरज आहे. क्लस्टर विद्यापीठ स्थापन झाले तर गोवा विद्यापीठाला फटका बसणार आहे. राज्यातील शिक्षणाची पद्धत बदलेल. प्राचार्य व शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांसोबत चर्चा व्हावी, अशी मागणी केल्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी बैठकीनंतर सांगितले. हा शिक्षणाचा विषय आहे. तज्ज्ञांसोबत चर्चा करून आणि त्यांना विश्वासात घेऊन या विधेयकावर निर्णय झाला पाहिजे, असेही विजय सरदेसाई यावेळी म्हणाले.
बैठकीत आमदारांकडून चांगल्या सूचना
चिकित्सा समितीच्या बैठकीत सदस्य आमदारांनी चांगल्या सूचना मांडल्या. आता पुढील बैठक प्राचार्य, महाविद्यालय व्यवस्थापन समितीचे सदस्य यांच्यासमवेत होईल. त्यांच्याकडून समिती माहिती जाणून घेईल, असे चिकित्सा समितीचे अध्यक्ष सुभाष शिरोडकर यांनी सांगितले. पुढील बैठक १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे.