फोंडा पोटनिवडणुकीत भाजपच्या निर्णयाला मगोचा पाठिंबा : सुदिन ढवळीकर

रात्रभर दारू दारू पिऊन धिंगाणा घालणारेच नरकासुर !


22nd October, 11:29 pm
फोंडा पोटनिवडणुकीत भाजपच्या निर्णयाला मगोचा पाठिंबा : सुदिन ढवळीकर

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांच्या निधनामुळे फोंडा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीत मगो पक्ष भाजपच्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा देणार आहे, अशी घोषणा वीजमंत्री तथा मगोचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी केली. पर्वरी मंत्रालयाबाहेर पत्रकारांशी बोलताना ढवळीकर यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले.
फोंड्याचे आमदार तथा कृषिमंत्री रवी नाईक यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनामुळे या मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. याठिकाणी सहा महिन्यांत पोटनिवडणूक होणार आहे. भाजपकडून या जागेसाठी मोर्चेबांधणी करण्यात येत असतानाच विरोधकही या जागेवर उमेदवार उभा करण्याच्या तयारीत आहेत. सुदिन ढवळीकर यांनी विरोधी पक्षांच्या संभाव्य एकजुटीवरही प्रश्नचिन्ह उभे केले. नुकतेच दिवाळीपूर्वी फातोर्डातील एका कार्यक्रमात काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि आरजी या पक्षांचे नेते एकत्र दिसले होते. त्यामुळे विरोधकांच्या ऐक्याची चर्चा सुरू झाली. यावर ढवळीकर म्हणाले की, विरोधी पक्षातील नेत्यांनी यापूर्वी अनेक पक्ष बदललेले आहेत. अशा स्थितीत ते कदापि एकत्र येऊ शकत नाहीत. विरोधक एकसंध राहणे अशक्य आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
रवी नाईक यांच्या पुत्राला पाठिंबा
रवी नाईक यांचे पुत्र रितेश नाईक यांना उमेदवारी देण्याची मागणी होत आहे. या मागणीला मगो पक्षाने पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान, डॉ. केतन भाटीकर यांच्याबद्दल ढवळीकर यांनी स्पष्ट केले की, जो मगो पक्षात आहे, त्याला पक्षाचा निर्णय मान्य करावाच लागेल. मगोची भाजपबरोबर युती असल्याने फोंडा पोटनिवडणुकीत भाजपला पाठिंबा असेल.

रात्रभर दारू पिऊन जे कोण धिंगाणा घालतात, तेच खरे नरकासुर आहेत. भाजपच्या आमदारांना नरकासुर म्हणता येणार नाही. नरकासुर दहनाची प्रथा बंद करण्याची मागणी मी पूर्वीपासून करत आहे. 

- सुदिन ढवळीकर, वीजमंत्री