अलविदा ‘पात्रांव’

कृषीमंत्री रवी नाईक यांचे हृदयविकाराने निधन : शासकीय इतमामात अंत्यसंस्कार : अंत्ययात्रेला हजारोंची उपस्थिती


15th October, 11:43 pm
अलविदा ‘पात्रांव’

रवी नाईक यांना अंतिम निरोप देताना शोकाकूल झालेला जनसागर. (नारायण पिसुर्लेकर)
प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : गोव्याचे ज्येष्ठ नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान कृषी मंत्री रवी नाईक (७९) यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. बुधवारी सायंकाळी नाईक कुटुंबियांच्या खासगी जागेत त्यांच्या पार्थिवावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी उपस्थित होते. रवी यांचे पुत्र रितेश यांनी मुखाग्नी दिला.
रवी नाईक यांना मंगळवारी रात्री हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने फोंड्यातील सावईकर नर्सिंग होममध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली. रात्रीपासूनच त्यांचे चाहते त्यांच्या घरासमोर जमू लागले होते. बुधवारी दिवसभर खडपाबांध येथील घरी त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी गर्दी झाली होती. सायंकाळी निघालेल्या अंत्ययात्रेत हजारो लोकांनी सहभागी होऊन साश्रूनयनांनी त्यांना निरोप दिला.
त्यांच्या अचानक जाण्याने गोव्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनाने एक अनुभवी आणि लोकप्रिय नेता हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. गोव्यातील राजकारणात ४० वर्षांहून अधिक काळ त्यांनी मुख्यमंत्री, मंत्री, विरोधी पक्षनेते, आमदार अशी पदे भूषविली आहेत. भंडारी समाजाचा आधारवड म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. गुंडांसाठी कठोर असले तरी त्यांची जनतेशी जवळीक होती. समाजाच्या विकासासाठी त्यांचे अमूल्य योगदान आहे. सामान्य कुटुंबातून येऊन सर्वोच्च राजकीय पदांपर्यंत ते पोहोचले होते. मोठी पदांची जबाबदारी त्यांनी सांभाळली असली तरी जनतेपासून ते कधीच दूर गेले नाहीत.
त्यांच्या निधनाबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा, आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी दुःख व्यक्त केले आहे. खडपाबांध येथील निवासस्थानी जाऊन भाजपचे राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, सभापती डॉ. गणेश गावकर, उपसभापती जोशुआ डिसोझा, मंत्री मॉविन गुदिन्हो, बाबूश मॉन्सेरात, आमदार गोविंद गावडे, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, संकल्प आमोणकर, नीलेश काब्राल, प्रवीण आर्लेकर, डॉ. चंद्रकांत शेट्ये, दाजी साळकर, प्रेमेंद्र शेट, संकल्प आमोणकर, माजी खासदार अॅड. नरेंद्र सावईकर, भाजपचे नेते उत्पल पर्रीकर, मगोचे आमदार सुदिन ढवळीकर, काँग्रेसचे आमदार अॅड. कार्लुस फेरेरा, खासदार विरियातो फर्नांडिस, प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, आपचे आमदार व्हेंझी व्हिएगस, आरजीपीचे वीरेश बोरकर, गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई, माजी मंत्री प्रतापसिंग राणे, चर्चिल आलेमाव, लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले व कुटुंबियांचे सांत्वन केले.
तीन दिवस दुखवटा
माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा सरकारी दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. याविषयीचा सरकारी आदेश काढण्यात आला आहे. नाईक यांना आदरांजली म्हणून सर्व राज्य सरकारी, स्थानिक संस्थांचे कार्यक्रम, उपक्रम तीन दिवस होणार नाहीत. राज्यातील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आले.
सर्वसामान्यांच्या विचार करून नवीन खात्यांची निर्मिती
रवी नाईक यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर नगरसेवक ते मुख्यमंत्री अशी मोठी झेप घेतली. खासदार, सभापती ही पदेही त्यांनी भूषविली आहेत. सरकारी कार्यप्रणाली सुलभ करण्याच्या हेतूने त्यांनी नवीन खात्यांची निर्मिती केली. सर्वसामान्य नागरिकांना सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून त्यांनी कला संस्कृती खाते, ओबीसी आयुक्तालय सुरू केले. सर्वसामान्य नागरिकांचा विचार करून ते प्रत्येक निर्णय घेत होते.
फोंडा मतदारसंघासाठी लवकरच पोटनिवडणूक
रवी नाईक यांच्या निधनामुळे फोंडा मतदारसंघातील विधानसभेची जागा रिक्त झाली असून पुढील काही महिन्यांत तिथे पोटनिवडणूक होणार आहे. नाईक यांचे दोन्ही पुत्र रॉय आणि रितेश हे फोंड्याचे नगरसेवक आहेत. भाजप यापैकी कोणाला रवीचा वारसदार म्हणून उमेदवारी देतो, ते पहावे लागेल. दरम्यान, नाईक यांच्या निधनाने मंत्रिमंडळात एक जागा रिक्त झाली असून त्या जागी कोणाची वर्णी लागू शकते, तेही पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल. फोंडा विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाल्याची अधिसूचना विधानसभा सचिवालयाने जारी केली. निवडणूक आयोगालाही याविषयी कळविण्यात आले आहे. सहा महिन्यांत फोंड्यात पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे.


या मान्यवरांनी घेतले अंत्यदर्शन
पुसापती अशोक गजपती राजू (राज्यपाल)
डॉ. प्रमोद सावंत (मुख्यमंत्री)
सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी (तपोभूमी)
श्रीपाद नाईक (केंद्रीय राज्यमंत्री)
दामू नाईक (भाजप प्रदेशाध्यक्ष)
माणिकराव ठाकरे (काँग्रेस गोवा प्रभारी)
आतिशी मार्लेना (आप गोवा प्रभारी)