वैद्यकीय तपासणीतून उघडकीस
म्हापसा : येथील उत्तर गोवा जिल्हा इस्पितळाच्या स्वच्छतागृहात सापडलेला तो पूर्ण वाढ न झालेला मृत गर्भ (भ्रूण) सहा महिन्यांचा असून त्याचे लिंग स्त्री असल्याचे वैद्यकीय तपासणीतून उघडकीस आले आहे.
मंगळवार, ३० सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सदर गर्भ इस्पितळाच्या बाह्यरूग्ण विभाग जवळील स्वच्छतागृहात सापडला होता. गर्भपात झाल्याने सदर सहा महिन्यांचा वाढ न झालेला गर्भ तिथेच टाकून महिलेने पळ काढला होता.
बुधवार, १ ऑक्टोबर रोजी गोमेकॉत या गर्भाची वैद्यकीय तपासणी केली.
पोलिसांना हा गर्भ कुणाचा हे अद्याप समजू शकलेले नाही. मंगळवारी ३० रोजी इस्पितळाच्या स्त्रीरोगशास्त्र ओपीडीमध्ये जवळपास १६० महिला रुग्ण तपासणीसाठी आल्या होत्या. या सर्व रुग्णांची पडताळणी करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. यातूनच काहीतरी उलगडा होईल, अशी आशा पोलिसांना आहे. इस्पितळाच्या सीसीटीव्ही फुटेजमधून पोलिसांना ठोस माहिती मिळू शकलेली नाही. त्यामुळे या भ्रूण प्रकरणाचे गूढ वाढले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक निखील पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.
सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी
इस्पितळात यापूर्वी चोर्या व इतर गुन्ह्यांचे प्रकार घडलेले आहेत. रात्रीच्यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांची पर्स चोरणे, इस्पितळाच्या पार्किंगमधून वाहने चोरीस जाणे, कर्मचार्यांकडून रूग्णांच्या नातेवाईकांवर अत्याचार असे गुन्हे घडले आहेत. या पार्श्वभूमीवर इस्पितळात आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत, अशी विनंती वारंवार पोलिसांनी पत्र पाठवून इस्पितळ व्यवस्थापनाकडे केली आहे.