करंझाळे येथील युवकाला अटक
पणजी : सोशल मीडियावर पूर्वाश्रमीच्या मैत्रिणीचे फोटो व्हायरल करून बदनामी केल्या प्रकरणात सायबर विभागाने मोहम्मद साधीम (२३, करंझाळे) याला अटक केली. त्याला पणजी प्रथमवर्ग न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी ठोठावली.
गोवा पोलिसांच्या सायबर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तिसवाडी तालुक्यातील एक महिलेने तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, तक्रारदार आणि संशयितामध्ये मैत्री होती. त्यानंतर तिने त्याच्यापासून फारकत घेतली. याचा बदला म्हणून संशयिताने सोशल मीडियावर बनावट खाते उघडून तक्रारदार महिलेचे फोटो प्रसारित केल्याचे तक्रारीत म्हटले होते. याची दखल घेऊन सायबर विभागाने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
याच दरम्यान अधीक्षक राहुल गुप्ता, सहाय्यक अधीक्षक बी. व्ही. श्रीदेवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक अनिल पोळेकर, नवीन नाईक, कॉन्स्टेबल विनय आमोणकर आणि अक्षय वेर्लेकर व इतर पथकाने संशयिताचा मडगाव आणि पणजी परिसरात शोध घेतला. याच दरम्यान संशयित त्याच्या करंझाळे येथील घरात असल्याचे समजताच पथकाने संशयित मोहम्मद साधीम याच्या मुसक्या आवळला. त्यानंतर संशयिताला सायबर विभागात आणून अटक केली. अटक करण्यात आलेल्या संशयिताला मेरशी येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलीस कोठडी ठोठावली.