म्हापसा पोलिसांकडून महिलेविरुद्ध गुन्हा
म्हापसा : येथील उत्तर गोवा जिल्हा इस्पितळाच्या स्वच्छतागृहात अर्भाचे अवशेष टाकण्यात आले. स्वच्छतेवेळी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना मंगळवार, दि. ३० रोजी सकाळी १० वा. सुमारास उघडकीस आली. इस्पितळाच्या बाह्यरूग्ण विभागाच्या परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहाची सफाई करत असताना कामगारांना अर्भाचे अवशेष सापडले. सदर कामगारांनी हा प्रकार इस्पितळाचे वैद्यकीय अधीक्षक आणि डॉक्टरांच्या कानी घातला.
डॉक्टरांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता पूर्ण न वाढ झालेला हा गर्भ असल्याचे स्पष्ट झाले. अकाली प्रसुती झाल्यामुळे संशयित महिलेने तो टाकला असावा, असा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला. त्यानंतर म्हापसा पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा केला. पोलिसांनी ठसेतज्ज्ञ व श्वान पथकाचा वापर केला. त्यानंतर नवजात अर्भकाला पुढील तपासणीसाठी गोमेकॉत पाठवण्यात आले.
अकाली प्रसुती झाल्यावर अर्भाचे अवशेष बेवारस स्थितीत टाकल्याप्रकरणी पोलिसांनी संशयित महिलेविरुद्ध गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
इस्पितळातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी
हा प्रकार उघडकीस येताच इस्पितळाच्या अधिकाऱ्यांनी संशयित महिलेचा शोध घेण्यासाठी इस्पितळातील सीसीटीव्ही फुटेज तपासली, मात्र त्यामध्ये संशयास्पद काहीच सापडले नाही. मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या अगोदर अर्भक स्वच्छतागृहात टाकण्यात आले होते. त्यामुळे रात्रीपासून सकाळ पर्यंतच्या सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करण्यात आली.