मंत्री हळर्णकरांवर अपमानजनक टिप्पणी; मनोज परबसह आरजीपी कार्यकर्त्यांवर गुन्हा

चौकशी अधिकाऱ्यांकडून जबाब नोंद

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
01st October, 12:15 am
मंत्री हळर्णकरांवर अपमानजनक टिप्पणी; मनोज परबसह आरजीपी कार्यकर्त्यांवर गुन्हा

म्हापसा : पीर्ण येथे जीएसटी उत्सव कार्यक्रमावेळी मंत्री नीळकंठ हळर्णकर व त्यांच्या समर्थकांप्रति अपमानजनक टिप्पणी करणे, लोकांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे, गावातील शांतता आणि सौहार्द बिघडवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली आरजीपीचे प्रमुख मनोज परब यांच्यासह पक्षाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हा नोंद केलेल्यांमध्ये सुबोध कांदोळकर (थिवी), सिप्रियानो परेरा (थिवी), अंकुश पार्सेकर (थिवी), सीताराम सातार्डेकर (कामुर्ली), संजय देसाई (नादोडा), रोहन कळंगुटकर (नेरूल) व इतर अज्ञात आरजीपी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

ही घटना दि. २६ रोजी घडली होती. पोलिसांनी दि. २९ रोजी गुन्हा नोंद केला आहे. बेकायदेशीरपणे जमाव करुन लोकांना चिथावणे, लोकांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे पीर्ण गावाची शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणे व मंत्री हळर्णकर आणि त्यांच्या समर्थकांवर अपमानजनक टिप्पणी केल्याप्रकरणी भा.न्या.सं.च्या १८९(२), १९१(२), ३५२, ३५१(३), १९२,१९६(१) व १९० या कलमान्वये हा गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी संशयितांना दि. ३० रोजी सकाळी १० वा. पोलीस स्थानकात हजर राहण्याची नोटीस बजावली होती. त्यानुसार सर्व संशयित स्थानकात हजर झाले असता चौकशी अधिकाऱ्यांनी त्यांचा जबाब नोंद करून घेतला.

पत्रकारांशी बोलताना मनोज परब म्हणाले की, आम्ही लोकप्रतिनिधींना केवळ प्रश्न विचारले. यापूर्वी आम्हा आरजीपी कार्यकर्त्यांवर अनेक खोटे गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु न्यायालयातून आम्हाला न्याय मिळाला आहे. त्यामुळे आमदारांनी आरजीपीला कायद्याची भीती दाखवू नये. मेळावली आंदोलनात आरजीपीने आयआयटीचा विषय उचलून धरला. तेव्हाही आरजीपीचा आवाज कोणालाही बंद करता आला नव्हता.

सरकारने थिवीतील अनेक गावांमधील रस्ते रुंदीकरणाचा घाट घातला आहे. पीर्ण गावातील रस्त्यांजवळ असलेल्या अनेक बांधकामांना पंचायतीने नोटीसा बजावल्या आहेत. ही दुकाने व आस्थापने पाडली जाणार असल्याने लोकांमध्ये भीती आहे. याविषयी ग्रामसभा घेऊन या रस्ता रुंदीकरणाविषयी आमदारांनी लोकांना माहिती द्यावी, ही आमची रास्त मागणी आहे. मात्र, आमदार ग्रामसभेला हजर राहत नाहीत, त्यामुळे ते गावात आल्यावर आम्ही त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला होता, असे परब म्हणाले.

विरोधकांची एकजूट महत्त्वाची

गोमंतकीयांचे हित व विरोधकांची एकजूट महत्त्वाची आहे. आम्ही गोमंतकीयांसाठी वावरतोय. सोमवारी मोपातील टॅक्सीकरांच्या आंदोलनावेळी मी आणि गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई एकत्र होतो. कारण हा मुद्दा स्थानिकांचा होता. त्यात राजकारण नव्हते, असे परब म्हणाले.

हा भाजपकडून राजकीय सूड : युरी आलेमाव

आरजीपी प्रमुख मनोज परब यांच्यावर दाखल केलेला गुन्हा हा भाजप सरकारकडून सूडबुद्धीने केलेला राजकीय डाव आहे. प्रत्येक टप्प्यावर त्यांचे पितळ उघडे पाडले जात असल्याने हतबल झालेल्या भाजप सरकारकडून पोलीस तसेच इतर शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून विरोधकांना धमकावले जात आहे. भाजपकडून होणाऱ्या या स्वस्त दर्जाच्या राजकारणाचा मी तीव्र निषेध करतो आणि छळाला सामोरे जाणाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.