कर्ज दिलेल्या सावकारांकडून शिवोलीतील युवकाला धमकी

पीडिताच्या वडिलांची हणजूण पोलिसांकडे हस्तक्षेपाची मागणी

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
01st October, 11:33 pm
कर्ज दिलेल्या सावकारांकडून शिवोलीतील युवकाला धमकी

म्हापसा : व्यवसायासाठी कर्ज दिलेल्या सावकारांकडून शिवोलीतील युवकाला धमकीसत्र सुरू आहे. सावकारांकडून चाललेल्या या छळ प्रकरणामध्ये हस्तक्षेप करावा व आपल्या मुलाला वाचवावे, अशी मागणी युवकाच्या वडिलांनी हणजूण पोलिसांकडे तक्रारीद्वारे केली आहे. विशेष म्हणजे युवकाला वस्तू तारण ठेवून कर्ज देणार्‍यांमध्ये दोघा पोलिसांचाही समावेश आहे.

शिवोली येथील फिर्यादी हनुमंत शिरोडकर यांचा मुलगा सूरज याचा कार भाड्याने द्यायचा व्यवसाय आहे. या व्यवसायासाठी त्याने विविध व्यक्तींकडून ४६ लाख ८५ हजार रुपये कर्ज घेतले होते. कर्ज घेतेवेळी सुरक्षा म्हणून त्याने कार, स्कूटर या वाहनांसह इतर वस्तू आणि कोरे धनादेश दिले होते.

मुलगा चांगला व्यवसाय करत होता आणि नियमितपणे कर्जाचे हफ्ते फेडत होता. परंतु अलिकडे अचानक व्यवसाय मंदीमुळे वेळेवर कर्ज फेडण्यास असमर्थ ठरला. दुर्दैवाने, सूरजची परिस्थिती समजून घेण्याऐवजी, या सावकारांनी कर्ज न फेडल्यास गंभीर परिणामाच्या धमक्या देण्यास सुरूवात केली.

सततच्या छळामुळे माझा मुलगा भीतीच्या छायेत असून अनेक दिवसांपासून घरी परतलेला नाही. मानसिकदृष्ट्याही तो अस्वस्थ आहे. या छळामुळे तो त्याचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्यावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. छळामुळे त्याची आर्थिक स्थिती आणखी बिकट होत आहे. आम्हाला त्याच्या सुरक्षिततेची आणि मानसिक आरोग्याची खूप काळजी आहे. दबावाखाली तो स्वतःला किंवा धमकी देणारे लोक त्याला शारीरिक इजा पोहोचवू शकतात, असे या तक्रारीत शिरोडकर यांनी नमुद केले आहे.

माझ्या मुलाला अशा धमक्या आणि छळापासून वाचवण्यासाठी आवश्यक ती कारवाई करावी, माझ्या मुलाचा शांततेने व्यवसाय पुन्हा सुरू झाल्यावर आम्ही प्रामाणिकपणे सर्व थकबाकी परतफेड करण्यास वचनबद्ध आहोत. पोलिसांच्या तत्काळ हस्तक्षेपामुळे सूरजचे जीवन तर सुरक्षित राहील शिवाय संकटातून सावरण्यास आणि जबाबदार्‍या पार पाडण्यास मदत होईल, अशी विनंती शिरोडकर यांनी हणजूण पोलीस निरीक्षकांकडे केली आहे. या तक्रारीच्या प्रत पोलीस महासंचालक व उत्तर गोवा पोलीस अधीक्षकांना पाठवल्या आहेत. 

हेही वाचा