कळंगुटमध्ये आगीमुळे २ लाखांचे नुकसान
म्हापसा : तिवायवाडा कळंगुट येथे गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत एक झोपडीवजा खोली जळून भस्मसात झाली. या दुर्घटनेत सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी टळली.
ही घटना रविवारी दुपारी १.२० वाजण्याच्या सुमारास घडली. व्हॅलेंतिना फर्नांडिस यांच्या मालकीच्या मालमत्तेमध्ये त्यांनी पत्र्यांची झोपडीवजा खोली उभारून त्यात दोन कुटुंब भाडेकरू म्हणून ठेवली होती.
दुर्घटनेच्यावेळी हे भाडेकरू खोली बाहेर होते. या बंद खोलीमध्ये अचानक आग लागली व गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. पाणी व फोमच्या सहाय्याने या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. तोपर्यंत सर्व साहित्यासह खोली जळून खाक झाली होती. मात्र, त्यापूर्वी खोलीतील एक भरलेला गॅस सिलिंडर बाहेर काढण्यात दलाच्या जवानांना यश आले. आगीत खोलीतील फ्रीज, कपडे, भांडी, कडधान्य जळून राख झाले.
पिळर्ण अग्निशमन स्थानकाचे हवालदार रामा नाईक, जितेंद्र बली, राजेश पिळणकर, राजकिरण पेडणेकर, साईश च्यारी व श्रीकांत सावंत यांनी आगीवर नियंत्रण मिळवले.