संशयितासोबत स्वत:हून पळून गेल्याचे युवतीकडून मान्य; अपहरणप्रकरणी तीन वर्षांची शिक्षा रद्द

बार्देश तालुक्यातील २०१५ मधील घटना

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
01st October, 12:18 am
संशयितासोबत स्वत:हून पळून गेल्याचे युवतीकडून मान्य; अपहरणप्रकरणी तीन वर्षांची शिक्षा रद्द

पणजी : बार्देश तालुक्यातील १७ वर्षीय मुलीने संशयितासोबत पळून जाण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेतल्याचे समोर आले आहे. याची दखल घेत गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने ३० वर्षीय संशयित युवकाला अपहरणप्रकरणी दिलेला तीन वर्षांचा कारावास रद्द करून निर्दोष सुटका केली आहे. याबाबतचा आदेश न्या. श्रीराम सिरसाट यांनी दिला आहे.

या प्रकरणी १७ वर्षीय पीडित मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीची दखल घेऊन म्हापसा पोलिसांनी फेब्रुवारी २०१५ मध्ये गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार, पीडित मुलगी १७ फेब्रुवारी २०१५ रोजी सायंकाळी ४ ते ७.४५ दरम्यान बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता, पीडित मुलगी आणि संशयित मुंबईत सापडले. पोलिसांनी युवकाला १९ फेब्रुवारी २०१५ रोजी अटक केली. त्याच्यावर युवतीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर न्यायालयाने २६ फेब्रुवारी २०१५ रोजी युवकाला सशर्त जामीन मंजूर केला. या प्रकरणी पोलिसांनी तपास पूर्ण करून पाॅक्सो व जलदगती न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. याची दखल घेऊन न्यायालयाने सुनावणी घेतली असता, पीडित मुलीचा जबाब तसेच वैद्यकीय अहवालाची दखल घेऊन संशयित युवकाला लैंगिक अत्याचार प्रकरणी पुरावे नसल्यामुळे निर्दोष सुटका केली होती.

तर युवतीचे अपहरण केल्या प्रकरणी न्यायालयाने संशयित युवकाला ३ जानेवारी २०२३ रोजी तीन वर्षाचा सश्रम कारावास आणि ५० हजार रुपयाचा दंडाची शिक्षा दिली होती. या शिक्षेला संशयित युवकाने गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देत शिक्षा रद्द करण्याची मागणी केली. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली असता, संशयितातर्फे अॅड. विभव आमोणकर यांनी युक्तिवाद मांडला. त्यात त्यांनी पीडित मुलीने दिलेल्या जबाबाची कनिष्ठ न्यायालयाने दखल घेतली नसल्याचा दावा केला. तसेच या संदर्भातील जबाब त्यांनी न्यायालयात सादर केला.

युवतीचे अपहरण केले नसल्याचा युक्तीवाद संशयिताच्या वकिलांनी न्यायालयात मांडला.

या प्रकरणी न्यायालयाने दोन्ही बाजू एेकून घेतल्यानंतर संशयित युवकाची अपहरण प्रकरणी निर्दोष सुटका केली.

युवतीचे अपहरण केलेल नसल्याचा युक्तीवाद

पीडित युवती आणि संशयित युवकाची फेसबूक या सोशल मीडियावर २०१३ मध्ये ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. याला तिच्या घरच्यांचा विरोध असल्यामुळे तिने संशयिताला बोलावून घेत घरातून पळ काढल्याचा जबाब दिला होता. त्यामुळे संशयिताने तिचे अपहरण केले नसल्याचा युक्तीवाद संशयिताच्या वकिलांनी न्यायालयात मांडला.