भक्तांच्या मांदियाळीत दर्याची धीरगंभीर गाज आणि माडांच्या चुडतांच्या सळसळत्या सानिध्यातील मोरजीची मोरजाई. शांत वत्सलतेचे प्रतीक बनून भाविकांना दिव्यत्वाची प्रचिती देते, तर खडतर वाट चालून जात दूर एकांतात, कातळाच्या प्रदेशातील काळोख्या गुंफेत स्थिरावलेली मोरजाई रहस्यमय गुढत्वाच्या वलयात मनात प्रश्नांची आवर्तने निर्माण करीत होती…
गगनबावडा घाटातून आम्हाला बोरबेट येथे जायचे होते. निमित्त होते मोरजाई मंदिर बघण्याचे. एरव्ही गोव्यात पेडणे तालुक्यातील मोरजी गावात मोरजाईचे मंदिर आहे. चमचमणारा समुद्रकिनारा, आकाशाला गवसणी घालणाऱ्या नारळाची उंचच उंच झाडे, त्यांच्याशी निगडित असलेली इथल्या लोकमानसाची एकंदरीत जीवनशैली. या गावाला देवी मोरजाईचा वरदहस्त लाभलेला आहे. घाटमाथ्यावरून आलेली सात भावंडे सात वाटांनी मार्गस्थ झाली. लईराई मोठी; शिरगावच्या भूमीत स्थिरावली. धगधगत्या होमकुंडात तावून सुलाखून बाहेर पडणारे तिचे भक्तगण फक्त गोव्यातच नाहीत, तर कर्नाटक, महाराष्ट्र राज्याच्याही सीमा पार करून सर्वत्र विखुरलेले आहेत. मिलाग्रीस म्हापसा येथे स्थिरावली, तर त्याही पुढे सुमुद्राच्या ओढीने मोरजाई मोरजी येथे लोकांची अधिष्ठात्री बनली. त्यांचा एकुलता एक भाऊ खेतोबा, इतर बहिणी; प्रत्येकाने स्वतःचे एक वेगळे, वैशिष्ट्यपूर्ण स्थान अधोरेखित करून लोकमानसात अढळपद प्राप्त केलेले आहे. अभूतपूर्व उत्साहात या लोकदैवतांचे सण-उत्सव आपल्या गोव्याच्या भूमीत साजरे केले जात आहेत.
मोरजाई या नावातच कलात्मकता आढळून येते. मोरजी गावचा परिसर अतिशय सुंदर. देश-विदेशातील पर्यटकांना या मातीने भुरळ घातले नाही तर नवलच मानावे लागेल. अशी ही मोरजीची मोरजाई. तिचा विशेष उत्सव म्हणजेच कळस उत्सव. काही वर्षांचा कालावधी गेल्यावर हा उत्सव साजरा केला जातो. सभोवताली अनेक छोटी मोठी मंदिरे आहेत. मोरजाईचे मंदिर त्याच्या विशिष्ट शैलीमुळे ठळकपणे नजरेत भरते. देवी मोरजाईने लोकमनात आढळ स्थान प्राप्त केलेले आहे. अशी ही देवी भक्तांच्या हाकेला ‘ओ’ देणारी. भक्तांना तत्परतेने पावणारी. माहीत होतं की मोरजाई ही मोरजीचीच परंतु गगनबावडा येथील बोरबेट या गावात उंचावर देवी मोरजाईचे मंदिर आहे. गोव्यातील मोरजीची मोरजाई आणि बोरबेटची मोरजाई यामध्ये काही साम्य आहे का? असा विचार मनात आला आणि मग गगनबावडा घाटाचे विहंगम दृश्य मनात साठवून आम्ही बोरबेटच्या दिशेने निघालो.
बोरबेट या मुख्य गावात पोहोचलो तेव्हा दुपार कलली होती. दिवस अजून काही तासातच मावळतीकडे झुकणार होता. वेळ संध्याकाळचीच होती. गावात पोहोचलो. पायथ्याशी तुरळक घरे काहीशी निवांत पहुडलेली. तुरळक बाया डोकीवर पदर घेत ओसरीवर बसलेल्या. पांढरी टोपी, सदरा, लेहंगा या पारंपरिक वेशभूषेत असलेले गावातीलच जाणकार त्या तशा खडबडीत रस्त्यावर सायकलवर रेलून गप्पांत रंगलेले. मध्येच पानांची पिचकारी मारीत, तोंड पुसत त्यांचे बोलणे सुरूच होते. अनोळखी गाडी गावात आलेली पाहून त्यांचे डोळे विस्फारले होते. सगळेजण कुतूहलाने गाडीकडे बघत होते. आम्ही मोरजाईच्या मंदिराविषयी विचारले असता त्यांनी ते खूप उंचावर आहे, तिथपर्यंत गाडी जात नाही, पायऱ्या चढून तुम्हाला चालतच प्रवास करावा लागेल अशी इत्यंभूत माहिती दिली. जंगलातून एक रस्ता जातो. परंतु तो कच्चा आहे. खाच-खळग्यांचा. आताच पाऊस पडून गेलेला आहे त्यामुळे सारवलेला नसेल. तुमची गाडी त्या वाटेने जाऊ शकणार नाही. आणखी रस्ता नाही. तुम्हाला चालतच जावे लागणार. मनात विचार आला, काही वेळात तिन्हीसांज होणार मग अशावेळी अनोळखी जागेवर जाण्यास थोडी भीती होतीच. घाई घाई करावी लागणार. एवढ्या लांबून आलो होतो खास मोरजाईच्या भेटीसाठी मग असे अर्धवट सोडून चालणार नव्हते.
गाडी वळवली. मंदिराकडे जाण्यासाठीच्या वाटेवरची खुण म्हणून पहिली पायरी, त्यावरची कमान दिसली. दगडी पायऱ्या. सुरुवात तरी नीटनेटकी होती. मनोमन देवीचे नाव घेत चालायला सुरुवात केली. अशा किती पायऱ्या चढून गेलो ते कळलेच नाही. तास-दीड तासाच्या चढणीनंतर समोर दिसले ते डोळ्यातही न सामावणारे विस्तीर्ण पठार. दूर दूर पर्यंत पाहताना जणू आकाश खाली वाकून आल्याचा भास होत होता. हिरवे कुरण, सोनसळी गवताने भरून गेलेले. कातळ शिल्पे असलेली पठारे यापूर्वी बघितली होती. इथं तर हे पठार चक्क लहान मोठ्या, अगदीच छोट्या आकार प्रकारांच्या दगडांनी भरलेले होते. ‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा.’ ओळी मनात गुंजू लागल्या.
जवळपास एक हजार पायऱ्या चढून आम्ही वर आलो होतो. मध्ये मध्ये काही अंतरावर सरळ वाट; त्यामुळे पायऱ्यांचा अंदाज येत नव्हता. पठारावर पोहोचताच वाऱ्याच्या लहरींनी आमचे स्वागत केले. छोटी दगडी आकर्षक कमान. दूर उभे असलेले गुंफेतले मंदिर दिसले. त्या सर्व कातळ-काळ्या दगडांच्या मांदियाळीत ती एक मोठी शिळाच होती. दोन कमानीतून प्रवेश केला की मंदिराच्या आवारात पोहोचायला होते. एका कमानीपासून दुसऱ्या कमानीपर्यंतचे अंतर तसे बरेच होते. पुढे प्रत्यक्ष आवारात चढून कमानीतून आत गेल्यावर दरवाजातून लक्ष वेधून घेतात ती तिथेच ओळीने मांडून ठेवलेली शेकडो पाषाणे. प्रांगणात डाव्या बाजूला दीपमाळ, तर उजव्या बाजूला मोठे कातीव दगड. त्यावर मूर्त्या. संपूर्ण परिसर भरभक्कम दगडी कुंपणाने वेढलेला. मंदिर म्हणजे एक गुंफाच होती. उजवीकडे देवी मोरजाईची मूर्ती, तर तिच्या अगदी समोर डाव्या बाजूला कौल प्रसाद घेणे चालू होते. गडद हिरव्या रंगांच्या साडीत मोठ्या रेखीव डोळ्यांची मोरजाईचे चैतन्य त्या गुंफेत फाकले होते. बाहेर गुंफेच्या वरच्या भागातून नजर मारताना पाच सरळसोट उभी थडगी दिसली. तिथेच एका झाडाला खिळे ठोकलेले होते. काळ्या बाहुल्याची काळी जादू तिथे त्या परिसरात गुढत्व निर्माण करीत होती. शीतल वारा, खोल दऱ्या, मावळतीकडे जाणारा सूर्य, लाल पिवळ्या रंगाने तुडुंबलेली संध्याकाळ...
वर चढताना जाणवलेला सारा क्षीण आता कुठल्याकुठे नाहीसा झाला होता. जांभ्या दगडात कोरलेली ही गुंफा बदामी चालुक्याच्या कालखंडातील असावी असा संशोधकांचा कयास आहे. मंदिरात येणारे-जाणारे फारसे दिसले नाहीत. लोकवस्तीपासून दूर, डोंगर-दऱ्या आणि पठारांच्या सान्निध्यात गूढरम्यतेचा साक्षात्कार घडविणारे हे मंदिर होते. भक्तांच्या मांदियाळीत दर्याची धीरगंभीर गाज आणि माडांच्या चुडतांच्या सळसळत्या सानिध्यातील मोरजीची मोरजाई. शांत वत्सलतेचे प्रतीक बनून भाविकांना दिव्यत्वाची प्रचिती देते, तर खडतर वाट चालून जात दूर एकांतात, कातळाच्या प्रदेशातील काळोख्या गुंफेत स्थिरावलेली मोरजाई रहस्यमय गुढत्वाच्या वलयात मनात प्रश्नांची आवर्तने निर्माण करीत होती...
पौर्णिमा केरकर
(लेखिका लोकसाहित्याच्या अभ्यासक,
कवयित्री आणि शिक्षिका आहेत.)