वायनाड – एक अविस्मरणीय ठिकाण

मानवी क्रियाकलापांमुळे ज्या क्षेत्रांना पर्यावरणीय, जैविक, सांस्कृतिक किंवा ऐतिहासिक पातळीवर हानी होण्याचा धोका असतो अशा क्षेत्रांना पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हटले जाते. जैवविविधता, पर्यावरणीय स्थिरता आणि नैसर्गिक संसाधनांचे रक्षण करण्यासाठी ही क्षेत्र महत्त्वाची मानली जातात.

Story: साद निसर्गाची |
28th September, 12:06 am
वायनाड – एक अविस्मरणीय ठिकाण

२०२४ साली उत्तर केरळमधील वायनाड हे ठिकाण नैसर्गिक आपत्तीमुळे बरेच चर्चेत आले होते. पर्यावरणीय दृष्टीने संवेदनशील असलेला हा भाग मानवनिर्मित संकटांमुळे धोकादायक बनलेला आहे. २०२४ मध्ये झालेल्या भूस्खलनामुळे २५४ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. ७ जण जखमी तर ११८ जण बेपत्ता झाले होते. हा भाग पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील मानला जातो. मानवी क्रियाकलापांमुळे ज्या क्षेत्रांना पर्यावरणीय, जैविक, सांस्कृतिक किंवा ऐतिहासिक पातळीवर हानी होण्याचा धोका असतो अशा क्षेत्रांना पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हटले जाते. जैवविविधता, पर्यावरणीय स्थिरता आणि नैसर्गिक संसाधनांचे रक्षण करण्यासाठी ही क्षेत्र महत्त्वाची मानली जातात. 

हा पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील भाग अनुभवण्यासाठी आम्ही कालिकतला (कोझिकोड) उतरलो. धर्मप्रसार करण्याच्या उद्देशाने आशिया खंडात प्रवेश केलेला वास्को-द-गामा १४९८ साली समुद्रमार्गे पहिल्यांदा भारतात जेथे येऊन उतरला ते ठिकाण म्हणजे कालिकत. येथून त्यांनी मसाल्यांचा व्यापार सुरू केला व  या शहराला "मसाल्यांचे शहर" म्हणून ओळखले जाऊ लागले. कालिकतला दक्षिण आशियातील सर्वात मोठे व्यापारी केंद्र मानले जात असे. ‘मसाल्यांचा राजा’ म्हणून ओळखली जाणारी काळी मिरी व ‘मसाल्यांची राणी’ म्हणून ओळखली जाणारी वेलची चीन, पूर्व आफ्रिका, अरबस्तान पर्शियासारख्या देशांमध्ये निर्यात केली जायची. काळी मिरी, वेलची, लवंगा, दालचिनी, जायफळ, आले आणि हळद यासारख्या विविध प्रकारच्या मसाल्यांच्या निर्यातीमुळे केरळला ‘भारताचे मसाल्यांचे राज्य’ म्हणून ओळखले जाऊ लागले. 

आमचा मुख्य उद्देश होता वायनाड गाठणे. हे ठिकाण कालिकटपासून अंदाजे ११० किमीच्या अंतरावर आहे. वायनाड हे केरळ-तामिळनाडू सीमेवरील शहर. ह्या शहराचा संपूर्ण भूभाग वन्यक्षेत्राने व्यापलेला आहे. आम्ही सर्वात अगोदर वायनाडमधील पूकोडे सरोवर पाहण्यासाठी वळलो. पूकोडे हे समुद्रसपाटीपासून ७७० मीटर उंचीवर सदाहरित जंगले आणि पर्वत उतारांमध्ये वसलेले एक नैसर्गिक गोड्या पाण्याचे सरोवर आहे. सरोवराची खासियत म्हणजे हे भारताच्या नकाशाच्या आकाराचे आहे. नंतर आम्ही वायनाड वन्यजीव अभयारण्य पहिले. वायनाड वन्यजीव अभयारण्य (मूथंगा रेंज) हे केरळमधील वन्यजीव संरक्षित क्षेत्र आहे. हे अभयारण्य आशियाई हत्ती, वाघ, बिबटे, गौर, सांबर, जंगली डुक्कर, अस्वल आणि विविध प्रकारचे हरण आणि पक्ष्यांसाठी ओळखले जाते. हा नीलगिरी बायोस्फीअर रिझर्व्हचा भाग असून, कर्नाटक आणि तमिळनाडूतील व्याघ्र राखीव क्षेत्रांशी जोडलेला आहे. वायनाडमधील आणखीन एक प्रसिद्ध ठिकाण म्हणजे बाणासुरा धरण. आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे धरण बाणासुरा हे धरण भारतातील मातीने बांधलेले सर्वात मोठे एकमेव धरण आहे. एडक्कल गुहा, सूचीपपार धबधबा, कुरवाद्वीप ही वायनाडमधील आणखीन काही प्रसिद्ध ठिकाणे.

आम्ही भूस्खलन झालेल्या केरळच्या मेपपडी पंचायतीला भेट दिली. मेपपडी हे नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध असे ठिकाण. हे ठिकाण एकल पिकांसाठी केलेल्या जंगलतोडीमुळे व हवामान बदलामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे धोकादायक बनले असे येथील नागरिकांचे मत. चहा आणि कॉफीच्या लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात जंगलतोड केल्याने, मातीला धरून ठेवणारी खोल मुळे असलेली मोठी स्थानिक झाडे नष्ट झाली. यामुळे मातीच्या वरच्या स्तराची धूप झाली व जमिनीची मुसळधार पाऊस सहन करण्याची क्षमता कमी झाली. रेषीय पायाभूत सुविधा आणि बांधकाम उपक्रमांच्या विस्तारामुळे, नैसर्गिक निचरा पद्धतींमध्ये व्यत्यय आला आणि डोंगर उतारांची स्थिरता धोक्यात आली. मानवी क्रियाकलापांमुळे आपत्ती निर्माण करणारे वातावरण निर्माण झाले. मानवनिर्मित हवामान बदलामुळे ह्या पट्ट्यात पाऊस अधिक तीव्र होत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. मानवी क्रियाकलापांमुळे आपत्ती निर्माण करणारे वातावरण निर्माण होऊन झालेल्या हवामान बदलामुळे ह्या पट्ट्यात पाऊस अधिक तीव्र होत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.


- स्त्रिग्धरा नाईक

(लेखिका विद्युत अभियांत्रिकीच्या 

प्राध्यापिका आहेत.)