गोवा हे भारताचे ‘पर्यटन राज्य’ म्हणून ओळखले जाते. येथे येणाऱ्या पर्यटकांचा पहिला अनुभव सुखद असायला हवा. पण खड्डेमय रस्त्यांमुळे त्यांची पहिली छाप नकारात्मक पडते. अपघात, आरोग्याच्या समस्या, प्रदूषण आणि आर्थिक तोटा यामुळे खड्डेमय रस्त्यांची समस्या ही केवळ स्थानिक नाही तर संपूर्ण राज्याच्या विकासाला रोखणारी आहे.
गोवा हे भारतातील लहान, पण अत्यंत महत्त्वाचे राज्य आहे. समुद्रकिनारे, ऐतिहासिक वास्तू, हिरवाई, किल्ले आणि पर्यटन उद्योग यामुळे या राज्याचे नाव देशातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे. परंतु या सौंदर्यामध्ये आणि प्रगतीमध्ये गालबोट लावणारी एक ज्वलंत समस्या म्हणजे खड्डेमय रस्ते.
आज गोव्याच्या प्रत्येक नागरिकाला आणि पर्यटकाला ही समस्या जाणवते. प्रवास करताना रस्त्यावरच्या खड्ड्यांमुळे होणारे हाल केवळ त्रासदायकच नसून धोकादायकही आहेत. त्यामुळे गोव्याचा विकास आणि त्याची प्रतिमा दोन्ही प्रश्नचिन्हाखाली येतात.
गोवा हे किनारी राज्य असल्यामुळे येथे जून ते सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस पडतो. या पावसामुळे रस्त्यांवरील डांबर वाहून जाते. जर रस्त्यांचे बांधकाम दर्जेदार केलेले नसेल, तर पावसाच्या काही दिवसांतच ते उखडून मोठमोठे खड्डे तयार होतात. हे खड्डे अनेक ठिकाणी एवढे खोल असतात की त्यात दोन चाकी गाडी पूर्णपणे अडकून बसते. काही ठिकाणी तर पावसाचे पाणी खड्ड्यात साचल्याने तो खड्डा किती खोल आहे हेच दिसून येत नाही आणि अपघात घडतात. ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था तर अजूनच वाईट असते. गावोगावच्या रस्त्यांवर खड्ड्यांचा एवढा पसरलेला पट्टा असतो की त्याला रस्ता म्हणावा की खड्ड्यांची माळ, असा प्रश्न पडतो.
खड्डयांमुळे होणारे अपघात हे गोव्याच्या जनजीवनाला मोठा धोका आहेत. दोन चाकीवरून शाळेत जाणारी मुले, कामावर जाणारे युवक, बाजारात जाणाऱ्या महिला किंवा वृद्ध लोक सगळ्यांनाच धोका असतो. अनेक वेळा अपघात एवढे गंभीर होतात की मृत्यूसुद्धा ओढवतो. रात्रीच्या वेळी किंवा पावसाळ्यात खड्डे स्पष्टपणे न दिसल्याने गाड्या त्यात घसरतात, धडकतात किंवा पलटी होतात. रुग्णवाहिका वेळेवर पोहोचत नाही, कारण रस्त्यांची अवस्था खराब असते. या सर्वांचा परिणाम म्हणजे लोकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण होणे.
गोव्याची ओळख जागतिक पातळीवर मुख्यतः पर्यटनामुळे आहे. दरवर्षी लाखो परदेशी व देशी पर्यटक गोव्यात येतात. ते समुद्रकिनारे, निसर्ग, सांस्कृतिक वारसा अनुभवायला येतात. परंतु विमानतळावरून किंवा रेल्वे स्थानकातून शहरात जाताना त्यांना सर्वप्रथम खड्डेमय रस्त्यांचा अनुभव येतो. काही पर्यटक सोशल मीडियावर या रस्त्यांचे फोटो आणि व्हिडिओ टाकून नाराजी व्यक्त करतात. त्यामुळे गोव्याची प्रतिमा मलिन होते. पर्यटक पुन्हा यायची इच्छा दाखवत नाहीत. यामुळे पर्यटन उद्योगावर आणि त्यातून उदरनिर्वाह करणाऱ्या हजारो लोकांवर नकारात्मक परिणाम होतो. खड्डयांमुळे पावसाचे पाणी रस्त्यावर साचते. या साचलेल्या पाण्यात डासांची पैदास होते आणि मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनिया यांसारखे रोग वाढतात. तसेच सतत वाहनांची खड्ड्यातील धडका, आवाज आणि धुळीमुळे प्रदूषण वाढते. याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होतो. शिवाय वाहतूक मंदावल्यामुळे इंधनाचा अपव्यय होतो, धूर वायुप्रदूषण वाढवतो आणि वातावरणातील कार्बन उत्सर्जनही जास्त होते. अशा प्रकारे खड्डेमय रस्त्यांचा परिणाम केवळ प्रवासापुरता मर्यादित राहत नाही, तर तो आरोग्य आणि पर्यावरणालाही घातक ठरतो.
दरवर्षी रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी जाहीर होतो. पण प्रत्यक्षात रस्त्यांची अवस्था सुधारत नाही. याचे प्रमुख कारण म्हणजे दर्जाहीन साहित्याचा वापर, कामे वेळेवर न करणे आणि ठेकेदार व अधिकाऱ्यांची निष्काळजी वृत्ती. काही वेळा पावसाळ्यातच रस्ते खणून दुरुस्ती सुरू केली जाते. त्यामुळे काम टिकतच नाही. तात्पुरते उपाय म्हणून माती टाकून किंवा दगड भरून खड्डे बुजवले जातात, पण दोन दिवसांत ते पुन्हा उघडतात. यामुळे नागरिकांचा सरकारवरील विश्वास कमी होत चालला आहे. “कर वसूल करणारे सरकार, पण रस्त्यांसारखी मूलभूत सोय न देणारे सरकार” अशी लोकांमध्ये टीका होऊ लागली आहे. खड्ड्यांच्या समस्येबाबत अनेकदा न्यायालयीन हस्तक्षेप झालेला आहे. जनहित याचिका दाखल करून नागरिकांनी प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. उच्च न्यायालयाने काही वेळा प्रशासनाला कठोर आदेश दिले आहेत. सोशल मीडियावर ‘पॉटहोल चॅलेंज’, ‘नो रोड नो टॅक्स’ अशा मोहिमा राबवल्या गेल्या. नागरिकांनी स्वतः पैसे गोळा करून रस्त्यांवर खडी टाकल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. हे चित्र प्रशासनाच्या अपयशाचे द्योतक आहे.
या समस्येवर उपाययोजना म्हणजे रस्ते बांधकामासाठी उच्च दर्जाचे डांबर, सिमेंट काँक्रीट व आधुनिक तंत्रज्ञान वापरले पाहिजे. पावसाळ्याच्या आधी सर्व रस्त्यांची तपासणी करून खड्डे दुरुस्त केले पाहिजेत.
ठेकेदार, अभियंते व अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून निकृष्ट काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. डिजिटल तक्रार व्यवस्था मोबाईल एप्सद्वारे नागरिकांना खड्ड्यांची माहिती देण्याची सुविधा द्यावी. पंचायत व स्थानिक संस्था यांच्या सहभागातून रस्त्यांची निगा राखली पाहिजे.
नागरिकांनीसुद्धा फक्त सरकारवर दोष न देता स्वतःची जबाबदारी ओळखली पाहिजे. वाहतुकीचे नियम पाळणे, अनावश्यक खोदकाम टाळणे, रस्त्यांच्या समस्यांबाबत जागरूकता निर्माण करणे ही कामे नागरिकांनी केली पाहिजेत. सोशल मीडियावर केवळ टीका करण्याऐवजी स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत प्रशासनावर योग्य दबाव आणला पाहिजे. गोवा हे भारताचे ‘पर्यटन राज्य’ म्हणून ओळखले जाते. येथे येणाऱ्या पर्यटकांचा पहिला अनुभव सुखद असायला हवा. पण खड्डेमय रस्त्यांमुळे त्यांची पहिली छाप नकारात्मक पडते. अपघात, आरोग्याच्या समस्या, प्रदूषण आणि आर्थिक तोटा यामुळे खड्डेमय रस्त्यांची समस्या ही केवळ स्थानिक नाही तर संपूर्ण राज्याच्या विकासाला रोखणारी आहे. सुंदर समुद्रकिनारे, हिरवाई आणि सांस्कृतिक वारसा यांसोबत सुरक्षित आणि दर्जेदार रस्ते हेच गोव्याच्या प्रगतीचे खरे प्रतीक ठरतील. सरकार, प्रशासन आणि जनता यांनी मिळून प्रयत्न केल्यास “खड्डेमुक्त गोवा” ही संकल्पना नक्कीच साकार होईल.
-समीप नार्वेकर
(लेखक गोवन वार्ताचे प्रतिनिधी आहेत.)