दरवर्षी पाच दिवस मुक्काम असणारा बाप्पा यंदा सात दिवस मुक्काम करून राहिला. मला सुट्टी मिळत नव्हती हे निमित्त पण मला वाटतं ही बाप्पाचीच इच्छा असावी. सात दिवस स्वारी गणपतीसकट सातवे आसमानपर होती.
माझा मुलगा, राजाराम उर्फ प्रभव आत्ता आत्ता दीड-पावणे दोन वर्षांचा झाला आहे आणि यंदा बाप्पा म्हणजे काय हे त्याला कळायला लागलं. गेल्यावर्षी लहान होता त्यामुळे फक्त "पाsss-पाव" (नमस्कार) एवढाच कळायचं पण यावर्षी चतुर्थीच्या अगदी आठ-दहा दिवस आधीच स्वारीची तयारी सुरु झालेली. माझ्या मावशीची मुलगी सना, बडबडगीत स्पर्धेत भाग घेण्यासाठी सराव करायची आणि तो सराव साहेबांच्या कानातून मनात घुसला आणि सुरु झाली रोजची मैफल. "बोदक आया बाप्पा... किती किती नाये" आम्हाला सुरुवातीला समजेना कारण हे गाणं ‘गुरु शिष्य’ परंपरेनं मावशीकडे शिकलं गेलेलं. नंतर संशोधनातून समजलं की ते "मोदकवाल्या बाप्पा तुझी किती किती नावे, तुझ्या बारा नावांचे स्तोत्र रोज गावे" हे गाणं होतं.
असो, पुढे करंज्या करताना पीठ उडवणे, बाबाने रंगवलेली भिंत पुन्हा पेन किंवा ब्रश घेऊन रंगवणे, अशी बाप्पा भक्ती सुरु झाली. आणि चतुर्थी अगदी उद्यावर येऊन थांबली. आदल्या दिवशीच बाप्पा घरात आला आणि समारंभ सुरु झाला त्याला रात्रीचा “माम?” (जेवलात का?) हे विचारून. गणपतीही बिचारा भांबावलेला कारण असा प्रश्न अनेक वर्षांनी या कुटुंबात कोणी तरी विचारलेला. गप्प बसला. माटोळी बांधताना ‘अँपन’ (सफरचंद) पळवणे, काकडी पळवणे असे प्रकार सुरु झाले त्यामुळे सजावट करणं काही सोपं नव्हतं. रात्री पावणेबारा वाजता सुरु करून सकाळी सहा वाजता सजावट संपवून मी झोपलो व पुन्हा साडेसहाला उठून आंघोळ बिंघोळ करून बाप्पांना आसनावर बसवलं व साहेब उठले आणि बाहेर येऊन त्याचं "हा......" झालं कारण बाप्पा हॉलमधून चक्क देव्हाऱ्यात बसला होता व सजावट पण संपलेली (माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच).
आंघोळ करून नवा कोरा ‘पापुत’ (कपडे/कुर्ता) घालून साहेब तयार होत असताना ‘भज्जी काका’ आले. प्राण प्रतिष्ठापना व पूजा सुरु होती पण साहेबांच्या मनात प्राण प्रतिष्ठापना व पूजा कधीच झाली होती, दहाची नोट आणून भज्जी काकानां देऊन नमस्कार करून जाईपर्यंत मी अभिषेकच करत होतो. पूजा झाली, चहापाणी झालं आणि ‘चौकशा’ सुरु झाल्या. बाप्पा खातो काय?, तिथेच का बसलाय? बरंच काही... नाकी नऊ येईपर्यंत.
झालं, मग हळूहळू मैत्री वाढली तसं घरातून बाहेर पडताना बाप्पाला ऑर्डर्स जायच्या "मत्ती कलू अका.. मम्मा त्लास अका.. ऊग्गी बछ.. बोदक का.. दूदू पी" ("मस्ती करू नको.. मम्माला त्रास नको.. ऊग्गी बस.. मोदक खा.. दूदू पी") गणपती आता गालातल्या गालात हसत होता. शेजारच्या चार दोन गणपतीनाही हीच ऑर्डर.
दरवर्षी पाच दिवस मुक्काम असणारा बाप्पा यंदा सात दिवस मुक्काम करून राहिला. मला सुट्टी मिळत नव्हती हे निमित्त पण मला वाटतं ही बाप्पाचीच इच्छा असावी. सात दिवस स्वारी गणपतीसकट सातवे आसमानपर होती. कधी माझ्या मामाकडे, कधी स्वतःच्या मामाकडे व इतर नातेवाईकांच्या गणपतींचेही दर्शन घेतले पण पाय बाहेर टिकत नव्हता, कुठेही नेला तरी "घाआ" (घरा) हाच जप चाललेला. एरवी लवकर झोपणारा हा जरा जास्त जागायचा, म्हणजे दोन वेळा रात्रीच्या भजनात माझ्या मांडीवर बसून तबलाही वाजवला. गणपती आता हृदयाच्या तालावर नाचत होता. दिसला नाही पण भासला मात्र नक्की.
सातवा दिवस उजाडला आणि आईने प्रश्न विचारला, "बाप्पाला जाऊदे ना घरी?" सखोल विचारांती उत्तर आलं "हय" (हो). नंतर आलेल्या पाहुण्यांनी हेच विचारलं तर मात्र उत्तर अनेकदा नकारात्मक आलं.
त्यादिवशी संध्याकाळी मावशीकडे गेलो, मामाकडे गेलो तिथेही विसर्जनाचा माहोल होता, जमके एन्जॉय केलं आणि घरी आलो. डोळ्यात झोप होती तरी सुद्धा बाप्पा आता जाणार माहीत होतं म्हणून जागाच राहिला. सालाबाद प्रमाणे रात्री सव्वा दहा वाजता बाप्पा आसनावरून उठला, उंबरठ्यावर आला आणि साहेबांच्या डोळ्यांच्या उंबरठ्यावर पाणी आलं. एरवी सात दिवस मोठ्याने येणारं "मोय्या" आता मंदावलं होतं. पण येत होतं नक्की. गणपती साहेबांच्या मालकीच्या (मामाची असली तरी ती गाडी साहेबांचीच आहे) स्विफ्टमध्ये विराजमान झाला आणि एका सुरात "गणपती बाप्पा मोरया" असा नाद झाला. साहेब त्यात सहभागी झाले.
बाप्पा निघाला तसा मात्र बांध हळूहळू फुटू लागला. अधूनमधून डुलक्या येत होत्या पण मन मात्र बाप्पाचा नाद आणि सोबत सोडत नव्हतं. गणपती मात्र उदास नजरेनं माझ्या खांद्यावर बसलेल्या साहेबाला बघत होता. गाडी पुढे जात होती तसा हात वर जाऊन कापरा आवाज वाढत होता "आव" (थांब)... "दाय मामा आव" "दाय मामा आव" (मामा गाडी थांबव)... पण गणपती जातच राहिला... नंतर अश्रूभरल्या डोळ्यांनी आणि कापऱ्या आवाजात पुन्हा ऑर्डर गेली "मत्ती कलू अका.. मम्मा त्लास अका.. ऊग्गी बछ.. बोदक का.. दूदू पी" ("मस्ती करू नको.. मम्माला त्रास नको.. ऊग्गी बस.. मोदक खा.. दूदू पी") आता मात्र गणपतीच्या डोळ्यांत पाणी होतं.
रात्र जास्त झाल्याने आणि फटाक्यांच्या धुरामुळे त्रास होईल म्हणून मग साहेब मम्मासोबत बाप्पाला "टाटा बाय" करून घरी निघाले. देवाचा आशीर्वादाचा हात आता मैत्रीच्या नात्याने बाय करत होता आणि मला देव काय असतो ह्याची जाणीव करून देत होता.
सगळे बाप्पा नदीपाशी आले आणि सार्वजनिक सांगणं, आरत्या झाल्या. आम्ही पाण्यात उतरलो. गणपतीचा पाय उचलत नव्हता अगदी उचलून घेऊन गेलो, अंतःकरण भरून आलेलं माझ्यासकट गणपतीचंही. आणि बाप्पाला आम्ही निरोप दिला सांगितलं की चल, पण पुढच्या वर्षी लवकर ये. बाप्पा पाण्यात जाऊन रडला की नाही हे मात्र समजलं नाही पण साहेब मात्र रडले. जेव्हा साहेबाना विचारलं की बाप्पा का गेला घरी? तर उत्तर येतं "मम्मा दुदु... बाप्पा घआ... दाय मामा भूममम...." आम्ही जड पावलांनी परतलो... आंघोळ करून जेवलो... साहेबराव झोपले होते... मीही बेडवर पडलो... झोप येत नव्हती तर कानात इअरफोन घातले आणि ऐकू लागलो... सूर निरागस हो गणपती सूर निरागस हो....
परेश नाईक
मांद्रे-गोवा
७९७२५५०३३२