चित्रपटाच्या नावात ‘दशावतार’ आहे म्हणून दशावतारी कलाक्षेत्राला समजून घेण्यासाठी कोणी या चित्रपटाकडे पाहत असेल, तर ते योग्य नाही. केवळ कलेच्या, व्यासंगाच्या बाबतीतच सुसंपन्न नव्हे, तर मनाचा मोठेपणा दाखविण्याच्या बाबतीतही दशावतारी कलाकार, दशावतारी कंपन्यांचे मालक-चालक नेहमी पुढे असतात. दशावतारी कला क्षेत्राचा परीघ शब्दांत सामावणारा मुळीच नाही. तरीही चित्रपटावरून ‘दशावतार’ गाठणाऱ्यांसाठी हा शाब्दिक प्रपंच...
प्रेक्षकांनी खचाखच भरलेला मंदिराचा सभामंडप. ‘भीष्म प्रतिज्ञा’ हा दशावतारी नाट्यप्रयोग ऐन रंगात आलेला. कलाकारांकडून उच्चरवात वाद-प्रतिवाद होत होते. समोरच्या कलाकाराने दुर्योधनाच्या भूमिकेतील कलाकाराला ‘तुम्ही शंभर बंधू’ अशा आशयाचा संवाद ऐकवला. त्यावर दुर्योधनाची भूमिका करणाऱ्या कलाकाराने, ‘आम्ही शंभर बंधू ना, मग ऐक आम्हा शंभर बंधूंची नावे...’ असे म्हणून नावे सांगायला सुरुवात केली. पुढची दोन मिनिटे पिन ड्रॉप सायलेन्समध्ये फक्त त्या कलाकाराचा आवाज घुमत राहिला, एकेका कौरव पुत्राचे नाव समोर येऊ लागले. प्रेक्षक कानात प्राण आणून कलाकाराला मुखोद्गत असलेला हा पाैराणिक ठेवा मनात साठवत राहिले. ९९ नावे बिनचूक सांगितल्यानंतर अखेरच्या कौरवाचे नाव सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला. हा कलाकार म्हणजे नटवर्य लक्ष्मण उर्फ पप्पू नांदोसकर. (हा व्हिडिओ यूट्यूबवर उपलब्ध आहे. जिज्ञासूंना तिथे खात्री करता येईल.)
हा प्रसंग आठवण्याचे कारण म्हणजे, हल्लीच प्रदर्शित झालेला आणि प्रेक्षकांना सिनेमागृहाकडे खेचून नेणारा ‘दशावतार’ हा मराठी चित्रपट. एका सिनमध्ये शकुनीने धृतराष्ट्राला ‘तुम्हाला तुमच्या शंभर पुत्रांची नावे तरी आठवतात का?’ असा प्रश्न केला. धृतराष्ट्र झालेले दिलीप प्रभावळकर (चित्रपटातील नाव बाबुली मेस्त्री) बाकड्यावर उभे राहतात आणि पप्पू नांदोसकरांच्या थाटात एकेका पुत्राचे नाव सांगू लागतात. क्षणभर वाटले की, आता ते सर्व नावे एका दमात सांगून टाकतील आणि टाळ्यांच्या कडकडाटाचा सिन इथे ‘रिक्रिएट’ होईल. पण कसले काय? मुलांची नावे सांगता सांगता प्रभावळकरांचा धृतराष्ट्र मध्येच ‘माधव’ असे म्हणतो आणि प्रेक्षक हसतात. कारण इथे कौरवपुत्राचे नाव घेण्याऐवजी त्यांना प्रेक्षकांत त्यांचा माधव नावाचा मुलगा दिसतो, त्यामुळे ते त्याचे नाव घेतात आणि पडद्यावरील तसेच थिएटरमधील प्रेक्षकांत हास्याची लकेर उमटते. सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी हा विनोदी प्रसंग. पण आम्हा दशावतारी कलाकार आणि कलाप्रेमींसाठी हा प्रसंग रसभंग करणारा ठरला. या प्रसंगात शकुनी धृतराष्ट्राला म्हणतो, ‘मी बसायला आलो नाही, पुसायला आलो आहे.’ प्रेक्षक हसतात. धृतराष्ट्र म्हणतो, ‘पुसायला इथे अनेक लोक आहेत.’ पुन्हा लाेक हसतात. हास्यनिर्मितीसाठी दशावतारी नाटकात एखादे विनोदी पात्र घुसवले जाते. मात्र इथे सुरुवातीलाच दशावताराचे हास्यास्पद चित्रण झाल्याची सल सलत राहते.
कारण ज्यांना दशावतारी कला माहीत नाही किंवा या कलेची तोंडओळख आहे, अशांना दशावतार ही अशा हास्यास्पद नाट्यप्रयोगांची कला असावी, असे वाटू शकते. त्यामुळे दशावतार किती गंभीरपणे आणि व्यासंगाने परिपूर्ण ज्ञानाच्या प्रदर्शनाने सादर केला जातो, याचे आकलन करून घेणे क्रमप्राप्त आहे.
एका नाट्यप्रयोगात दोन नाट्यकलाकार अभ्यासपूर्ण संभाषण करत होते. एकमेकाला शब्दांच्या कात्रीत पकडून प्रेक्षकांकडून टाळ्या मिळवत होते. खरे तर इथे कथासूत्रानुसार काही मिनिटे संभाषण करून युद्ध करायचे आणि एका कलाकाराने माघारी जायचे इतकेच नाट्य अपेक्षित होते. मात्र दर्दी प्रेक्षकांमध्ये आपल्या ज्ञानाचे प्रदर्शन करण्याची सोडेल तो दशावतारी कसला? वाकयुद्ध थांबत नसल्याचे बघून एकाने थोडीशी नरमाई दाखवत अखेरीस युद्धाचे आव्हान दिले. पण समोरील कलाकार परिपूर्ण तयारीनिशी आला होता. ‘तू मला युद्ध करायला सांगतोयस. पण त्याआधी युद्धाचे प्रकार सांग आणि युद्धाच्या कुठल्या प्रकारात तू माझ्याशी युद्ध करणार आहेस तेही सांग.’ काही क्षण तो कलाकारही गडबडला. हीच संधी साधून त्या कलाकाराने त्याला कोंडीत पकडला. ‘याचा अर्थ तुला युद्धाचे प्रकार माहीत नाहीत. आता ऐक,’ असे म्हणून युद्धाचे पुराणोक्त प्रकार कथन केले. साहजिकच प्रेक्षकांतून टाळ्यांचा गजर झाला. असे प्रसंग असंख्य वेळा घडले, घडत राहतील. एकमेकांच्या अभ्यासू वृत्तीचा आदर ठेवून प्रेक्षकांपर्यंत जास्तीतजास्त ज्ञान पोहोचविण्याचा आणि त्या माध्यमातून आपल्या व्यासंगाचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न असतो. यात अलीकडेच ‘दशानन’ ही रावणाच्या ज्येष्ठ बंधूची भूमिका अजरामर करणारे बाबा मयेकर, दत्तप्रसाद शेणई, सागर गावकर, गौरव शिर्के, मोरेश्वर सावंत, नितीन आशयेकर, उदय राणे कोनसकर, केशव खांबल अशी किती तरी नावे सिंधुदुर्गात आणि गोव्यात सुपरिचित आहेत. त्यांचे नाट्यप्रयोग ही जिज्ञासूंसाठी पर्वणी असते. दशावतारातील हे व्यासंगाचे अंग चित्रपटात दिसण्याची अपेक्षा होती, जी पूर्ण झाली नाही. असो. ते दिग्दर्शकाचे स्वातंत्र्य.
चित्रपटातील एका दृश्यात बाबुली मेस्त्री (दिलीप प्रभावळकर) यांना काही लहान मुले ‘ए हाफमॅड बाबुली’ असे हिणवत पळून जातात. हे पाहून तर आम्हा दशावतार कलाप्रेमींना धक्काच बसला. बुजुर्ग दशावतारी कलाकारांना एखाद्या ऋषीप्रमाणे मानसन्मान दिला जातो. त्यांच्यावर अशा प्रकारे काेणी शेरेबाजी करण्याचे धाडस मुळीच करणार नाही. त्यांचा अनुभव, कलेवर असणारी हुकूमत आणि कलाकार म्हणून असलेले वलय याचा नेहमीच आदर केला जाताे. अनेक कलाकार वयाची साठी ओलांडली, तरीही त्याच जोषात कलेचे सादरीकरण करतात. अलीकडच्या काही वर्षांत तर दशावतारी नाटकांनी कमाईचे उच्चांक प्रस्थापित केले. केवळ कला म्हणून दशावताराकडे न पाहता त्याला व्यावसायिक स्वरूप दिले. ‘संयुक्त दशावतार’च्या माध्यमातून कलाकार समाधानकारक कमाई करताना दिसतात. नाविन्यपूर्ण, विशेष आख्यान सादर करून त्याला ट्रिक सिनची जोड दिली जाते. अशा नाटकांना प्रेक्षकांचीही पसंती लाभते. शेकडो वर्षे आर्थिक विकलांगतेतून वाटचाल केल्यानंतर आता अनेक दशावतारी कंपन्या आणि कलाकार आर्थिकदृष्ट्या बऱ्यापैकी स्थिर झालेले दिसतात. चित्रपटात दाखविलेली ‘दोन वेळच्या जेवणाची भ्रांत’ ही स्थिती आज तरी दिसून येत नाही. एखादा कलाकार संकटात असेल, तर इतर कलाकार संघटित होऊन आपल्या भाकरीतला चतकोर तुकडा त्याला देतात आणि सावरतात. अनेक कलाप्रेमीही त्यांना साथ देतात. त्याचा कुठेही गाजावाजा केला जात नाही. केवळ कलेच्या, व्यासंगाच्या बाबतीतच सुसंपन्न नव्हे, तर मनाचा मोठेपणा दाखविण्याच्या बाबतीतही दशावतारी कलाकार, कंपन्यांचे मालक-चालक नेहमी पुढे असतात. काही प्रमाणात कलाकारांना मानधन व इतर लाभांच्या बाबतीत मर्यादा आहेत, हे सत्य. पण सगळेच कलाकार तशा प्रकारचे कष्टप्रद जीवन कंठतात, असा समज कोणी करून घेऊ नये. केवळ या कलेच्या जोरावर घर चालवणारेही अनेक कलाकार आहेत.
अर्थात हे वर्णन केवळ सत्यस्थिती दर्शविण्यासाठी. चित्रपटातील चित्रणावर अंगुलीनिर्देश करण्याचा यामागे हेतू नाही. उलट, दशावताराच्या माध्यमातून निसर्ग रक्षणाचा संदेश देत मातीशी इमान राखण्यासाठी प्रवृत्त करण्यात हा चित्रपट पूर्णपणे यशस्वी ठरला आहे. त्याबद्दल दुमत नसावे.
केवळ चित्रपट पाहून ठरवू नका!
व्यासंगाच्या जोडीला लिखित संहितेशिवाय केले जाणारे संस्कृतप्रचुर संभाषण कौशल्य, स्वत: केलेली रंगभूषा आणि वेषभूषा, सुस्पष्ट शब्दफेक, उत्तम गायन, झांज-पखवाद-हार्मोनिअमच्या तालावर नर्तन अशा सालंकृत गुणवैशिष्ट्यांनी दशावतारी नटतात. पुराणांची शब्दश: पारायणे केल्यामुळे पौराणिक संदर्भ बहुतेकांना मुखोद्गत असतात. अन्य धार्मिक ग्रंथांचा अभ्यासही कामी येतो. त्यातूनच २७ नक्षत्रे, युद्धनीती, युद्धाचे प्रकार, पौराणिक संदर्भांची जंत्री, चंद्राच्या कला कोणत्या अादी सर्वसामान्यांना ज्ञात नसणारी माहिती नाट्यप्रयोगांतून मिळते. अशा सादरीकरणावर बेहद्द खूश होणारे रसिक सढळपणे बक्षिसांची खैरात करतात. उदाहरणच द्यायचे झाले, तर एका दशावतार कंपनीचे नाविन्यपूर्ण नाटक गेल्या वर्षी प्रचंड लोकप्रिय झाले. गोव्यातही अनेक प्रयोग पार पडले. या नाटकासाठी २५ हजार ते ३५ हजार रक्कम आकारली गेली. या नाटकाचे शंभरहून अधिक प्रयोग सादर झाले. २५ हजाराला एक नाटक या प्रमाणे १०० नाटकांचे २५ लाख रुपये होतात. हीच गोष्ट अव्वल कलाकारांच्या संचात सादर होणाऱ्या संयुक्त दशावतार नाटकांच्या बाबतीत दिसते. प्रचंड अभ्यास, कलेप्रतीची निष्ठा आणि अपार मेहनत यामुळे असे अनेक कलाकार या सुबत्तेची फळे चाखत आहेत. त्यामुळे केवळ चित्रपट पाहून दशावताराविषयीचा दृष्टिकोन निश्चित करू नये.
सचिन खुटवळकर
(लेखक दै. गोवन वार्ताचे वृत्तसंपादक आहेत.)