चिंतनाचा आनंद देणारा समारोप

आकाशवाणीविषयीचा हा स्तंभ वर्षभरासाठी दर रविवारी लिहिताना मी त्या आठवणीत गुंतत गेलो. क्रमवार व सूत्रबध्दपणे त्या विणत गेलो. मागे वळून पाहताना एक आनंद होता. या माध्यमाच्या भविष्याचा वेध घेताना सुध्दा चिंतनाचा आनंद मिळाला.

Story: ये आकाशवाणी है |
28th September, 12:35 am
चिंतनाचा आनंद देणारा समारोप

धावता धावता थांबायला हवं. चालता चालता थांबायला हवं. हे सदर सुरू केल्यास एक वर्ष कधी उडून गेलं कळलं नाही. आकाशवाणीवर व रेडिओ यंत्रणेवर लिहायची विनंती संपादकांनी केली. त्यावेळी हे पन्नासेक भाग लिहून होतील असं वाटलं नव्हतं. 

पण वर्गीकरण करून एका एका विषयावर, घटकावर, मुद्द्यावर एक प्रकरण लिहिलं. आठवणी, स्मृती खूप असतात. पण त्या आटोपशीर रूपात मांडाव्या लागतात. एक काळ आकाशवाणीचं सुवर्ण युग होतं. टीव्ही नव्हता. स्मार्टफोन नव्हते. फोनच नव्हते मुळी. त्यावेळी आकाशवाणीचं राज्य होतं. सेवेत असलेल्या प्रतिभावान कलाकारांनी ते गाजवलं. नवीन माध्यमे आली. नवे तंत्रज्ञान आले. त्या गडबडीत आणि कोलाहलात आकाशवाणीचा आवाज कमी लोक ऐकू लागले. असं नाही की आज श्रोते नाहीत. पण नवी युवा पिढी, मुलं यांना आकाशवाणीचं आकर्षण नाही. दुकानातही रेडिओचे विविध सेट विकत मिळायचे ते आता फारच दुर्मिळ झालेत.

परंतु,  आज युवा पिढी एफएम रेडिओ मोबाइलवर ऐकताहेत. आकाशवाणीची सर्व केंद्रं मोबाइलवर ऐकायला मिळतात.  आकाशवाणीचं एप आहे. ते डाऊनलोड केलं तर देशभरातील प्राथमिक चॅनलचं केंद्र, एफएम केंद्र, इतर वाहिन्या यांचं प्रसारण ऐकायला मिळतं. चोवीस तास बातम्या देणारा चॅनल आहे. काळाला अनुसरून व नवं तंत्रज्ञान स्वीकारून आकाशवाणी पुढं जात आहे. 

अनुभव संचित फार मोठं आहे. सर्वच पाल्हाळीक स्तरावर कथन करण्यापेक्षा अमूक एक विषय वा संकल्पना धरून मी दर रविवारी त्याच्यावर माहिती देण्याचा प्रयत्न केला. तसा आवाका खूप मोठा ग्रंथाचा. कारण आकाशवाणी माध्यम हे मुळात खूप आधीपासून आहे. विविध भारतीवरून हिंदी गीतं आजही उत्साहाने ऐकणारे श्रोते आहेत. दुर्गम भागात, सुविधांचा अभाव असलेल्या मुलुखात व गावात रेडिओ लोकप्रिय आहे. शिंपी लोक काम करताना रेडिओ ऐकत असतात. गोव्यात पदेर लोक पाव खोर्नांत म्हणजे भट्टीत सोडल्यावर रेडिओवरील बातम्या, कांतारां ऐकतच असतात. चोडण, दिवाडे बेटांवर घराघरांत क्रिस्तांव बांधव व खास करून घरातील वृध्दजन रेडिओवरील कांतांरां, तियात्र ऐकत असतात. रेडिओ रंजन करतो. लोकशिक्षण देतो. 

लोक आकाशवाणीच्या बातम्या विश्वासार्हतेसाठी ऐकतात. कोर्टाच्या निवाड्याच्या बातम्या देतानाही फार काळजी घेतली जाते. त्या बातमीचा काटेकोर अनुवाद करावा लागता. वाक्य वाक्य, शब्द शब्द तपासावं लागतं. राष्ट्रपती, राज्यपाल, प्रधानमंत्री यांच्या बातम्यांविषयीही नितांत काळजी घ्यावी लागते.  

सरकारात फूट पडण्याची शक्यता असेल व काही हालचाली सुरू झाल्या असतील तर ती संभाव्य अंदाज स्वरूपाची बातमी छापील मिडियाला चालते. सरकारी मिडियाला नव्हे. कारण असल्या बातम्यात ठोस तथ्य नसते. 

वृत्तनिवेदकाला प्रसंगावधान, सजगता, सचेत मन, शांतवृत्ती हे गरजेचे घटक असतात. न्यूज रूममध्ये आत शिरताच जगात काय काय घडलेलं आहे, काय काय चाललंय याची माहिती असावी लागते. पुढील कार्यक्रमांची मांडणी काय आहे याचा मागोवा हवा. कारण त्याप्रमाणे आपल्या संध्याकाळच्या बातम्यांचा क्रम व हेडलाइन्स ठरत असतात. वेळ कमीच असतो. एक गतीमानता असते. त्याला जुळवून घ्यावं लागतं.

आकाशवाणीविषयीचा हा स्तंभ वर्षभरासाठी दर रविवारी लिहिताना मी त्या आठवणीत गुंतत गेलो. क्रमवार व सूत्रबध्दपणे त्या विणत गेलो. मागे वळून पाहताना एक आनंद होता. या माध्यमाच्या भविष्याचा वेध घेताना सुध्दा चिंतनाचा आनंद मिळाला. कोंकणीत दवरणें नांवाचा दगडी खांब असतो. वाटसरू डोक्यावर भारवाही वजन घेऊन जाताना तिथं थांबतो. ते वजन दवरण्यावर ठेवतो. विराम घेतो. विसावा घेतो. मी सुध्दा या स्तंभाचा समारोप करून तुमचा निरोप घेतो. देव बरें करूं.


- मुकेश थळी 

(लेखक बहुभाषी साहित्यिक, अनुवादक, कोशकार असून आकाशवाणीचे निवृत्त वृत्तनिवेदक आहेत)