एक ओळ कवितेची

एक ओळ कवितेची हा ललित लेखसंग्रह म्हणजे जीवनातील क्षणोक्षणीच्या अनुभवांची शब्दांनी केलेली उबदार गुंफण आहे. यातून वाचकाला स्वतःच्या भावनांचा नवा शोध लागतो, जुन्या आठवणींना नवे अर्थ मिळतात. कधी डोळे पाणावतात, कधी हसू येतं, तर कधी शांतपणे आत्मपरीक्षण करावंसं वाटतं.

Story: पुस्तक |
28th September, 12:01 am
एक ओळ कवितेची

अंगावरच पांघरूण ओढून काढल्यासारखं वाटतं. खसकन नव्हे, हळूहळू... ऊब संपल्याची जाणीव करून देते! आई जेव्हा फोटोच्या फ्रेममध्ये दिसते भिंतीवरच्या, तेव्हा धुकं पसरत जातं समोर... काहीच दिसेनासं होतं! राधा भावे यांचे हे लेखन वाचून थोडंसं थांबले आणि मी  माझ्या आईला फोन करून या ओळी वाचून दाखवल्या. तेव्हा आमचं संभाषणही थोडं शांत, भावुक झालं.

आपल्या आईच्या भावना काय असतात, हे कदाचित आपल्याला आई झाल्यानंतरच उमजतं किंवा आईचं अस्तित्व एखाद्या जुन्या फोटोत बंदिस्त झाल्यावरच तिचं महत्त्व कळतं. अशा संवेदनशील, अंतर्मुख करणाऱ्या वाक्यांनी हा लेखसंग्रह भरलेला आहे. लेखिकेने आपल्या अनुभवांमधून मांडलेली प्रत्येक ओळ जणू आपल्या मनाचा आरसा बनते. प्रत्येक लेख वाचताना असं वाटतं – हे पुस्तक मी वाचलं नसतं तर काहीतरी महत्त्वाचं हातातून निसटलं असतं.

राधा भावे यांच्या एक ओळ कवितेची या संग्रहातली भाषा अत्यंत प्रभावी आहे. प्रत्येक शब्द विचारपूर्वक निवडलेला असून वाक्यांत एक लय निर्माण करतो. भाषा साधी असली तरी तिच्यातील गहिरेपणा वाचकाला अंतर्मुख करतो. लेखिकेच्या लेखनात नाजूक माधुर्य आणि कवितेची नजाकत जाणवते. त्यांच्या उपमा-प्रतीकांमुळे साध्या भावना देखील नवीन भासतात. प्रत्येक ओळ मनात दीर्घकाळ राहील असा शब्दांचा स्पर्श देऊन जाते. भाषेची प्रवाहीता वाचनाचा अनुभव आनंददायी बनवते. कधी डोळे पाणावतात, कधी हसू येतं — पण भाषा कधीच बोचरी वाटत नाही. लेखिकेचे शब्द म्हणजे भावनांना हळुवार आकार देणारे मऊसे धागे आहेत. या संग्रहातून भाषेचं सौंदर्य आणि ताकद दोन्ही अनुभवायला मिळतं.

संजय चौधरी यांच्या “प्रत्येक वेळी दुःखाने बदललेला असतो त्याचा चेहरा” या ओळीची आठवण करून लेखिका दुःखाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोण देतात. त्या सांगतात की प्रत्येक अडचण हा एक धडा असतो – ती आपल्याला घडवते, आपल्याला परिपक्व करते. त्यामुळे हा संग्रह वाचताना आत्मविश्वास वाढतो.

दुःखाची जाणीव, लहानपणीची धडपड आणि भीती – या साध्या वाटणाऱ्या अनुभवांना लेखिकेने इतक्या हळुवारपणे शब्द दिले आहेत की मुलांना वाटणारी भीती आणि मोठ्यांना वाटणारी सामाजिक भीती दोन्ही समोर उभी राहतात. “मी कुठे घेऊन जाऊ काळजामधले ससे” ही वैशाली शिंदेकर मोडक यांची गझल आठवत भयमुक्त जीवनाची आस निर्माण होते.

स्त्रियांच्या भावविश्वाबद्दल लिहिताना स्वाती शुक्ल यांच्या “मी माझ्या स्त्री असल्याचे पाठांतर इतके केले” या ओळींची आठवण करून त्या वाचकाला विचार करायला भाग पाडतात. मनाच्या चंचलपणाबद्दल बोलताना वैभव देशमुख यांच्या “माझे मन कोठे माझे मन होते” या ओळी जणू या लेखांमध्ये रुजतात आणि आपणही आपल्या मनाचा शोध घेऊ लागतो. त्या म्हणतात – ज्याला स्वतःचं मन ताब्यात ठेवता आलं, तोच खरा विजेता.

नात्यांमधल्या दुराव्याबद्दल बोलताना क्रांती सडेकर यांच्या “आता केवळ दोघांमधली दरी बोलते” या ओळींचा संदर्भ देऊन त्या मानवी नात्यांच्या गुंतागुंती उलगडतात.

“अश्रू” या एका शब्दाभोवती गुंफलेले त्यांचे विचार खूप गहिरे आहेत. रडणं म्हणजे पराभव नव्हे, अश्रू म्हणजे कमकुवतपणा नव्हे – ही त्यांची जाणीव वाचकाच्या मनात नवी समज जागवते. गोव्याची ज्येष्ठ कवयित्री दया मित्रगोत्री यांच्या कवितेतील ओळ – “कविताच निवडली आहे मी जगण्यासाठी” – या ललित लेखनाला अगदी साजेशी वाटते. कारण या संग्रहात कवितेचं खरं सौंदर्य, तिची परिणामकारकता आणि जीवनाला अर्थ देणारी ताकद प्रत्येक पानावर अनुभवता येते. कविता म्हणजे केवळ शब्दांचा खेळ नाही, तर आयुष्याच्या सूक्ष्म भावनांना स्पर्श करणारी कला आहे, हे लेखिका अतिशय प्रभावीपणे सांगतात.

एक ओळ कवितेची हा ललित लेखसंग्रह म्हणजे जीवनातील क्षणोक्षणीच्या अनुभवांची शब्दांनी केलेली उबदार गुंफण आहे. यातून वाचकाला स्वतःच्या भावनांचा नवा शोध लागतो, जुन्या आठवणींना नवे अर्थ मिळतात. कधी डोळे पाणावतात, कधी हसू येतं, तर कधी शांतपणे आत्मपरीक्षण करावंसं वाटतं. हे पुस्तक प्रत्येक संवेदनशील वाचकासाठी आत्मिक अन्न आहे – वाचल्यानंतर मन तृप्त होतं.


-स्नेहा बाबी मळीक