मराठी सिनेसृष्टीचा बोलबाला

दसऱ्याचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. पण मराठी सिनेसृष्टीने मात्र याच महिन्यात प्रेक्षकांसमोर एकापेक्षा एक दर्जेदार कलाकृती सादर करत त्यांना मनोरंजनाचं सोनं लुटण्याचा आनंद मिळवून दिलाय.

Story: मनोरंजन |
28th September, 12:02 am
मराठी सिनेसृष्टीचा बोलबाला

मराठी सिनेसृष्टीने यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यातच दसरा-दिवाळी साजरी केल्याचं आशादायक चित्र सध्या पाहायला मिळतंय. याला कारण आहे गेल्या चार आठवड्यांत रिलीज झालेल्या चार विशेष सिनेमांना लाभलेल्या प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादाचं!

१. दशावतार

कोकणची हिरवीगार पार्श्वभूमी, तिथली ८०० वर्षांची 'दशावतार' ही लोककला आणि पर्यावरणाचा गंभीर विषय घेऊन आलेला हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. हे केवळ व्यावसायिक यश नाही, तर ‘दशावतार’ने मराठी सिनेमाच्या सादरीकरणाचाही दर्जा उंचावलाय, हे निश्चित. वयाच्या या टप्प्यावरही बाबुली मिस्त्री ही व्यक्तिरेखा जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी समरसून साकारलीय. त्यांचा निरागसपणा आणि मालवणी भाषेतला गोडवा कान तृप्त करतो.

२. आरपार

‘दशावतार’सारख्या भव्य सिनेमासोबत प्रदर्शित होऊनही ‘आरपार’ हा सिनेमा प्रेक्षकांना भावला. जनरेशन झेड आणि मिलेनियल्स यांच्या नात्यांमधला गुंता, गोंधळ आणि स्वीकार दर्शवणारा असा तत्त्वज्ञानाने समृद्ध तरीही रोमँटिक सिनेमा बघितल्याचं पुरेपूर सुख ‘आरपार’ देतो. ललित प्रभाकर आणि हृता दुर्गुळे यांनी अमर आणि प्राची ही पात्रं अक्षरशः जिवंत केली आहेत. त्यांचा स्क्रीनवरचा सहजसुंदर वावर छाप पाडतो.

३. कुर्ला टू वेंगुर्ला

कुर्ला टू वेंगुर्ला' हा सिनेमा कोकणच्या 'स्वर्गीय' सौंदर्यासोबत तिथल्या भोळ्या आणि मजेशीर लोकांच्या स्वभावाची एक उत्तम गोष्ट आपल्यासमोर मांडतो. लग्नासाठी मुलांना येणाऱ्या अडचणी, शहराचं आकर्षण आणि गावातच काहीतरी करण्याची धडपड अशा अनेक तरुणांच्या भावना यात अचूक टिपल्या आहेत. विजय कळमकरांचं प्रभावी दिग्दर्शन हे विशेष कौतुकास्पद!

४. साबर बोंडं

साबर बोंडं म्हणजे निवडुंगाला येणारं लालचुटुक, गोड फळ! याच नावाचा हा सिनेमा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या समलैंगिक प्रेमकथेचा विषय घेऊन आलाय. ‘सनडान्स फिल्म फेस्टिवल’मध्ये बहुप्रतिष्ठित असा ‘वर्ल्ड सिनेमा ग्रँड ज्युरी’ पुरस्कार मिळवणारा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे, हे विशेष! रोहन कानवडे यांनी दिग्दर्शित केलेली आनंद (भूषण मनोज) आणि बाळ्या (सूरज सुमन) यांची कथा तरल आणि काव्यात्म वाटते. विशेषतः आनंदची आई (जयश्री जगताप) ज्या पद्धतीने मुलाला समजून घेते आणि स्वीकारते, ते पाहून डोळ्यांत पाणी येतं. या चारही आगळ्यावेगळ्या सिनेमांवर मराठी रसिकप्रेक्षकांनी केलेलं प्रेम हे बॉक्स ऑफिसवरच्या करोडोंच्या कलेक्शनपेक्षाही कैक पटीने वरचढ आहे, हे आवर्जून नमूद करावंसं वाटतं.


प्रथमेश हळंदे