संजू, सुनबाई कधीची थांबलीये. येत नाहीस का जेवायला? दहा वाजून गेले.” आई बाहेर येत म्हणाली. “आई, पारापर्यंत बघून येतो. त्या चेतनच्या लेकीच्या मागोमाग वगैरे गेला असेल तर; संध्याकाळी आली होती ती आपल्या निलुशी खेळायला. हेमंता ओढ्याच्या बाजूला गेलाय.” मी कळवळून म्हणालो. तशी माझी आशा खरी ठरण्याचं चिन्हच नव्हतं कारण ‘सातच्या आत घरात’ हे त्याचं तत्त्व त्याने कालवर पाळलं होतं पण आज मात्र दहा वाजले तरी त्याचा पत्ता नव्हता. त्याला पाहिल्याशिवाय माझ्या गळ्याखाली घास उतरणार नाही हे आईने ताडलं आणि होकारार्थी मान हलवून ती आत गेली. मी पाराच्या दिशेने चालू लागलो आणि माझ्या डोळ्यासमोर त्या निष्पाप जीवाची चिमुकली जिवणी उभी राहिली.
दीड वर्षांपूर्वी आमच्या शेजारच्या चिमीने आमच्या पडवीत दोन पिल्लांना जन्म दिला. अनायसे मी घरीच असल्याने मला आवाज आला आणि माग काढत मी तिथे पोहचलो. चिमीची लेक तिच्यासारखीच पांढरी शुभ्र होती नि निसर्गाने तिच्या उजव्या गालावर नाजूक काळा ठिपका ठेवला होता नजर लागू नये म्हणून; तर बोकोबांची स्वारी पांढऱ्या आणि सोनेरी रंगाचं मिश्रण होती. त्याची पाठ सोनेरी होती अन् पोट पांढरं. त्याच्या पाठीवरच्या रंगावरून पायांच्या अर्ध्यापर्यंत ओघळला होता नि चार पायांचा खालचा भाग पांढरे मोजे घातल्यासारखा पांढरा होता. नुकतीच जन्मलेली ती पिल्लं लालेलाल होती. इवल्या गुलाबी जिभल्या बाहेर काढून आपलेच हात पाय चाटत होती. त्यांची चिमुकली गुलाबी तोंडं किती बघू किती नको असं झालं होतं मला. दोन्ही पिल्लांचे डोळे पंधरा दिवसांनी उघडले. बोकुच्या डोळ्यात पिवळसर काळी रंगाची झाक होती, तर माऊचे डोळे हिरवट काळे होते. दोघांच्या इवलुशा शेपट्याही झुपकेदार.
दिवस कापसासारखे उडून जात होते. पिल्लं तीन महिन्यांची झाली होती. आमच्याच घरात असल्याने आम्हाला ओळखू लागली होती. गुरगुट्या दुधभात खात होती; पायात येत हक्काने आपले लाड करवून घेत होती. निलुने त्यांची हौसेने नावं ठेवली होती; पिंटी आणि गंपू. अचानक चिमी नाहीशी झाली. सगळ्यांनी खूप शोधलं पण सापडली नाही; पिंटी अन् गंपू आमच्याकडे राहिले. एक दिवस हेमंताचा मित्र आपल्या मुलीला घेऊन आला ती तीन चार वर्षाची होती. तिने पिंटीला पाहिलं आणि हीच माऊ आपल्याला हवी म्हणून हट्ट धरून बसली. बालहट्टच तो! माझ्याच्याने मोडवेना. मी पिंटीला देऊन टाकलं आणि त्या रात्री गंपुला कुशीत घेऊन खूप रडलो. आता गंपू महाशय आमच्या घराचे अनभिषिक्त सम्राट होते. तो अगदी लाघवी बोका. त्याला बोललेलं सारं समजे; चिमी येऊन जाऊन असे पण गंपू जन्मल्यानंतर घरात उंदरांचा उत्तम बंदोबस्त झालेला होता. तो निष्णात शिकारी होता; एकदा हेरलेली शिकार पाडायचाच आणि फस्त ही करायचा अशी की तिचा लवलेशही मागे राहायचा नाही. त्यात त्याची विशेषतः अशी की घरात केलेली शिकार तो बाहेर नेऊन खाई म्हणूनच त्याच्या असण्याने घराच्या स्वच्छतेत कधी बाधा आली नाही.
गप्पा मारायला कोणी नसेल तरी गंपू पुरायचा घरातल्या प्रत्येकाला. तो त्याला सारं कळत असल्यागत बघत राहायचा आणि मध्येच म्याँवने प्रतिसाद ही द्यायचा. आमची ही कुणाकडे जायला निघाली की तिच्या पदरामागून जायचा. मी किंवा हेमंता शेताकडे निघालो की आम्हाला सोबत करायचा, आई पुजेला देवासमोर बसली की तिच्यासोबत बसून राहायचा. निलुची शाळेतून यायची वेळ झाली की उंबरठ्यावर बसून बाहेर टकामका बघायचा अन् ती आली की धावत तिच्या दिशेने जायचा. असा इतका समजूतदार बोका ना कुणाच्या अध्यात न मध्यात. आपलं घर नि फार तर चार दोन शेजारी अन् घराभोवतीचं आवार एवढ्यातच त्याचा संचार असायचा. मांजराची जात मुळातच स्वच्छता प्रिय. आमचा गंपूही त्याला अपवाद नव्हता दिवसभर स्वतःला स्वच्छ करायचा. रात्री शी शू लागली तर आमच्यातल्या कुणालातरी विशिष्ट आवाज करत उठवत बाहेर घेऊन जायचा अन् कार्यभाग उरकून स्वतःला स्वच्छ करून पुन्हा अंथरूणाच्या कोपऱ्यात पायाशी मुटकुळं करून झोपी जायचा.
तीन दिवसांपूर्वी मात्र चमत्कारिक गोष्ट घडली. चतुर्थीचा पहिला दिवस होता आम्ही सगळे तयारीत मग्न होतो. सगळी तयारी झाली आणि सगळे देवघरात जमलो. मी आणि हेमंताने बाप्पाची मूर्ती चौरंगावर बसवण्यासाठी उचलली आणि देव्हाऱ्याच्या दिशेने जाणार तोच कुठूनसा एक उंदीर कोपऱ्यातून आत आला. तो यायला आणि गंपू त्याला पाहायला एकच गाठ पडली. तो तीरासारखा त्याच्या दिशेने झेपावला. हातात बाप्पा असल्याने मला त्याच्या दिशेने धावणं शक्य नव्हतं. मी तिथूनच ओरडलो, “गंपू, सोड त्याला. बाप्पाचं वाहन आहे ते. आजच्या दिवशी त्याला इजा करता नये. जाऊ देत त्याला.” माझ्या बोलण्याने गंपुला काय वाटलं कोण जाणे. त्याने दचकून तो उंदीर तिथेच टाकला पण उशीर झाला होता. गंपुचे तीक्ष्ण दात त्याच्या मानेत रुतले होते आणि तो गतप्राण झाला होता. गंपू थोडावेळ तिथे घुटमळला. मी बाप्पा बसवून येईपर्यंत तो उंबरठ्याबाहेर पडला होता. उंदीरही तिथे नव्हता म्हणजे कदाचित सवयीने गंपुने त्याला बाहेर नेऊन खाल्लं असावं. आम्ही दुर्लक्ष केलं आणि गडबडीत घडला प्रसंग विसरूनही गेलो पण गंपू त्या दिवशी जेवला नाही हे आमच्या रात्री लक्षात आलं. पण मग शिकार केली म्हणून नसेल जेवला म्हणून मी स्वतःला समजावलं.
दुसऱ्या दिवशी ही त्याने कशाला तोंड लावलं नाही. मग मी साशंक झालो. त्याला घेऊन डॉक्टरकडे गेलो. त्यांनी काळजी करण्यासारखं काही नाही म्हणून सांगितलं आणि मी निश्चिंत होऊन घरी आलो. संध्याकाळी त्याला औषध दिलं आणि बाहेर गेलो. घरी परतलो तेव्हा गंपू दिसला नाही म्हणून मी आणि हेमंता सगळीकडे त्याची शोधाशोध करत होतो. शेवटी रात्री उशिरापर्यंत तो सापडला नाहीच मग निराश होऊन घरी आलो. रात्रभर माझ्या डोळ्याला डोळा लागला नाही. नाना शंकाकुशंकांनी माझं डोकं बेजारलं. कुठे गेला असेल? की आपल्या आईसारखा निघून गेला असेल? समोर फक्त प्रश्न होते. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा गंपुची शोधमोहीम सुरू करणार तोच ही आतून किंचाळली. सगळे धावत स्वयंपाक घरात आलो. हिने ओट्या समोर फतकल मारली होती. भाजीची टोपली बाजूला विखुरली होती अन् गंपू ओट्याखाली निपचित निजला होता. मी थरथरत जवळ गेलो आणि अलगद त्याला बाहेर काढलं पण शेवटी घडू नये ते घडलं होतं. गंपूने प्रायश्चित घेतलं होतं; आपल्या हातून अजाणतेपणाने झालेली चूक त्या अश्राप प्राण्याच्या जिव्हारी लागली होती आणि त्याने मुषकराजाची क्षमा याचना करत बाप्पा चरणी देह ठेवला होता..!!
अनु देसाई
७७६८९८४००३