झणझणीत मसाल्यांनी मुरवलेले, तव्यावर भाजून कुरकुरीत बाहेरून आणि रसाळ आतून असं तवा चिकन फ्राय खरंच खवय्यांच्या मनाचा ठाव घेतं. ही खास पद्धत करून बघितलीत तर हॉटेलचं चिकनही विसराल!
साहित्य:
• चिकन – १/२ किलो (मध्यम आकाराचे तुकडे)
• आले-लसूण पेस्ट – २ टेबलस्पून
• दही – ३ टेबलस्पून
• हळद – १/२ टीस्पून
• तिखट – २ टीस्पून
• धनेपूड – दीड टीस्पून
• गरम मसाला – १ टीस्पून
• मीठ – चवीनुसार
• लिंबाचा रस – १ टेबलस्पून
• तांदळाचं पीठ – १ टेबलस्पून
• बेसन – १ टेबलस्पून
• तेल – तळण्यासाठी
• सजावटीसाठी – कांदा व लिंबाचे तुकडे, कोथिंबीर
कृती:
चिकनचे तुकडे स्वच्छ धुऊन पाणी निथळू द्या. कोरडं झालं की बाजूला ठेवा. एका खोल भांड्यात आले-लसूण पेस्ट, दही, हळद, तिखट, धनेपूड, गरम मसाला, मीठ आणि लिंबाचा रस टाका. हे सर्व नीट फेटून एकसंध मिक्स्चर तयार करा. या तयार मसाल्यात चिकनचे तुकडे टाका. प्रत्येक तुकड्यावर मसाला नीट लागला पाहिजे. हे भांडे झाकून किमान १ तास ठेवा (४-५ तास ठेवलं तर अजून छान चव येते). मुरलेल्या चिकनमध्ये तांदळाचं पीठ व बेसन टाका. हाताने हलक्या हाताने मिसळा. यामुळे तळल्यावर चिकनला छान कुरकुरीत क्रिस्पी लेयर मिळतो. जाड बुडाचा तवा घ्या आणि त्यावर थोडं तेल सोडा. तेल गरम झालं की गॅस मध्यम आचेवर ठेवा. चिकनचे तुकडे तव्यावर ठेवा. झाकण ठेवून मध्यम आचेवर शिजवा. चिकन एक बाजूने लालसर झालं की दुसऱ्या बाजूला उलटा. असे करत करत चिकन बाहेरून खरपूस आणि आतून रसाळ होईपर्यंत भाजा. तयार चिकनवर थोडी कोथिंबीर शिंपडा. कांद्याचे काप, लिंबाचे तुकडे सोबत द्या. गरमागरम तवा चिकन फ्राय सर्व्ह करा.
खास टिप्स :
• चिकन तव्यावर मंद आचेवर शिजवलं तर मसाल्याची चव आतपर्यंत मुरते.
• मुरवताना दहीऐवजी थोडं नारळाचं दूध घातलं तर फ्लेवर अजून खास लागतो.
• शिजवताना तव्यावर अधूनमधून थोडं तेल शिंपडत जा, म्हणजे चिकन रसाळ राहील.
- शिल्पा रामचंद्र