अटकेवेळी नियमांचे पालन न केल्याबद्दल न्यायालयाने पोलिसांवर ताशेरे ओढले
पणजी: मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाबद्दल 'गोवा का हॉन्टेड एअरपोर्ट' असा दिशाभूल करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी दिल्लीतील यूट्यूबर अक्षय वशिष्ट याला अटक करण्यात आली होती. मात्र, बुधवारी रात्री त्याला प्रथम वर्ग न्यायालयाने जामीन मंजूर केला. यावेळी, अटकेची योग्य प्रक्रिया न केल्याबद्दल न्यायालयाने पोलिसांवर ताशेरे ओढले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'रिअल टॉक क्लिप्स' या फेसबुक पेजवर हा व्हिडिओ अपलोड केला होता. त्यात चुकीचे आणि अंधश्रद्धेवर आधारित दावे करून जनतेमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. गोवा पोलीस मुख्यालयाच्या सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलमध्ये कार्यरत असलेले कॉन्स्टेबल सूरज शिरोडकर यांनी याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक पाळत ठेवून दिल्लीतील द्वारका येथे अक्षय वशिष्टचा शोध घेतला. मोपा विमानतळ पोलीस स्थानकातील पथकाने त्याला दिल्लीतून अटक करून चौकशीसाठी गोव्यात आणले.
मात्र, रात्री ११.११ वाजता पेडणे प्रथमवर्ग न्यायालयाच्या न्यायाधीश शबनम नागवेकर यांनी वशिष्टला जामीन मंजूर केला. अटक करण्यापूर्वी त्याला कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नाही, ज्यामुळे त्याच्या कायदेशीर हक्कांचे उल्लंघन झाले, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू असून, राज्याच्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांबाबत दिशाभूल करणारी माहिती आणि भीती पसरवणाऱ्यांवर पोलीस लक्ष ठेवून असल्याचे सांगण्यात आले आहे.