पार्किंग, सांडपाणी व्यवस्थेची दुरवस्था, डीएलएफ प्रकल्पामुळे भर.
पणजी : गोव्यातील व्यावसायिक आणि प्रशासकीय केंद्र म्हणून ओळखले जाणारे पाटो प्लाझा समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. असे असतानाही ईडीसी पाटो प्लाझाचा विकास वेगाने सुरूच आहे. पार्किंग, रस्ते, सांडपाणी आणि पावसाच्या पाण्याच्या नियोजनाचा अभाव आहे. तरीही डीएलएफचा शॉपिंग मॉल, स्मार्ट सिटीचे मनोरंजन आणि करमणूक पार्क तसेच इतर सरकारी इमारतींसारखे मोठे प्रकल्प येणार आहेत. पाटो येथील सुविधांवर आधीच ताण आलेला असताना त्यात हे प्रकल्प सुरू झाल्यानंतर क्षमतेपेक्षा जास्त भार पडेल.
पणजीमधील ईडीसीचा पाटो प्लाझा हे गोव्याचे प्रमुख व्यावसायिक केंद्र बनले आहे. राजधानीतील बहुतेक सरकारी कार्यालये पाटो येथे स्थलांतरित झाली आहेत. तसेच पासपोर्ट कार्यालय, आयकर खाते, ईडी, रिझर्व्ह बँक, पोस्ट महासंचालक कार्यालयांसारखी केंद्र सरकारची प्रमुख कार्यालये पाटो येथे असल्यामुळे संपूर्ण गोव्यातून लोक आपल्या कामासाठी पाटो येथे गर्दी करतात.
सरकारी कार्यालयांव्यतिरिक्त पाटो येथे आता दोन पंचतारांकित हॉटेल्सही आली आहेत. तसेच एका हॉटेलमध्ये कॅसिनोही सुरू झाला आहे. त्याव्यतिरिक्त या हॉटेलच्या बाजूलाच एका मोठ्या मॉलचे बांधकाम सुरू होत आहे. हा मॉल तयार झाल्यास तो गोव्यातील सर्वात मोठा मॉल ठरेल. पाटो येथे सध्या पार्किंग शोधण्यासाठी धावपळ करावी लागते. विशेषतः कार पार्किंसाठी जागा शोधताना दमछाक होते. जर हा मॉल तयार झाला, तर भविष्यात पार्किंगची मोठी समस्या निर्माण होऊ शकते, अशी भीती लोकांनी व्यक्त केली आहे.
पार्किंगची समस्या
पाटो येथील सरकारी कार्यालयांमध्ये काम करण्यासाठी संपूर्ण गोव्यातून हजारो लोक येतात. पर्यटन खाते, नगर नियोजन खाते, उपनिबंधक कार्यालय, श्रम शक्ती भवन, सेंट्रल लायब्ररी, पासपोर्ट कार्यालय, गोवा किनारा व्यवस्थापन प्राधिकरण, रेरा या कार्यालयांमध्ये शेकडो लोक आपले अर्ज करण्यासाठी येतात. त्याचप्रमाणे इतर इमारतींमधील अनेक खासगी कार्यालयांमध्येही शेकडो लोकांची उपस्थिती असते. पण या शेकडो लोकांसाठी पार्किंग ही एक गंभीर समस्या बनून राहिली आहे.
पाटो येथील पार्किंग सकाळी ९ वाजता पूर्ण भरते आणि ते संध्याकाळी ६ नंतरच रिकामे होते. मोटारी सोडाच, दुचाकी पार्क करायची असेल तरीही धावपळ करावी लागते. दुचाकींसाठीही पार्किंग नसल्यामुळे त्या पदपथावर उभ्या केलेल्या दिसतात. तसेच दुचाकींसाठी नियोजित केलेल्या पार्किंगमध्ये एका दुचाकीच्या जागेवर चार-पाच दुचाकी पार्क केलेल्या दिसतात.
पार्किंग जागेची कमतरता असताना येथे चार मोठे प्रकल्प येत आहेत. त्यात डीएलएफ प्रोमिनाद मॉल, स्मार्ट सिटीचा पेडेस्ट्रियन स्पाइन मनोरंजन आणि करमणूक प्रकल्प, पर्यटन खात्याचे कन्व्हेंशन सेंटर आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या इमारतीचा समावेश आहे. या चार प्रकल्पांमुळे पाटो येथे वाहनांची वाहतूक वाढेल. सध्या पार्किंगच्या जागेची कमतरता आहे. त्यामुळे आगामी काळात येणारी अतिरिक्त वाहने कुठे उभी करणार, हा प्रश्न आहे.
स्मार्ट सिटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्मार्ट पार्किंग यंत्रणेद्वारे पाटो येथे ६२५ चारचाकी वाहने उभी करण्याची व्यवस्था केली जाईल. स्मार्ट सेन्सरमुळे पार्किंगची जागा रिकामी आहे की भरलेली आहे, हे कळेल. पण दुचाकींसाठी स्मार्ट पार्किंग यंत्रणेचा समावेश नाही. त्यामुळे पाटोमध्ये दुचाकी उभ्या करण्याची किती क्षमता आहे, याबाबत माहिती नाही.
डीएलएफ प्रोमिनाद आणि स्मार्ट सिटीचा पेडेस्ट्रियन स्पाइन हे पाटो येथे येणारे सर्वांत मोठे प्रकल्प आहेत. प्रोमिनाद मॉल १८,१२० चौ.मी. जागेत पाटोच्या मध्यभागी येणार आहे, तर पेडेस्ट्रियन स्पाइन कला आणि संस्कृती भवन आणि पर्यटन खाते यांच्या दरम्यान मोठ्या जागेत येणार आहे. एवढ्या मोठ्या प्रकल्पांना पार्किंगची गरज लागेलच.
पेडेस्ट्रियन स्पाइनमध्ये जाणाऱ्या लोकांना गाडी बाहेर लावण्याशिवाय पर्याय नाही. पण प्रस्तावित मॉलमध्ये ८,३७५ चौ.मी. जागा पार्किंगसाठी वापरली जाईल आणि त्यापैकी १,४४० चौ.मी. जागेत खुले पार्किंग बांधले जाईल. खुल्या पार्किंग जागेत १०२ वाहने उभी करण्याची क्षमता आहे, तर इमारतीच्या आतील पार्किंग जागेत ६३४ वाहने उभी करण्याची क्षमता आहे. पण जर मॉलने पार्किंगसाठी जास्त पैसे आकारले, तर लोकांना गाड्या बाहेर लावण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. पार्किंगच्या गोंधळाचा हिशोब एकच राहील.
सांडपाणी आणि पुराची समस्या
रस्त्यावर वाहणारे सांडपाणी आणि पावसात येणारे पूर ही पाटो भागातील मोठी समस्या बनली आहे. संध्याकाळी जेव्हा सांडपाण्याचे पंपिंग होते, तेव्हा संपूर्ण रस्त्यावर सांडपाणी ओव्हरफ्लो होते. पाटो येथे येणाऱ्या लोकांना या पाण्यातून वाट काढण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. याबद्दल अनेक तक्रारी आल्या आहेत, पण हा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. जर मॉल आला, तर या मॉलमधून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता सध्याच्या यंत्रणेत आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे. पावसात पाटो भागात पूर येतो. पाटो प्लाझा सखल भागात असल्यामुळे काही तासांचा पाऊस पाटोवरील रस्त्यांना नदीचे रूप देतो. लोकांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागते. या पावसाच्या पाण्यात सांडपाणी मिसळून पाटो भागात रोगराई पसरण्याचा धोका आहे.
याबद्दल बोलताना स्मार्ट सिटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाटो प्लाझाचा परिसर खाडीच्या पातळीपेक्षा खाली असल्यामुळे पावसात पूर येणे ही नेहमीची बाब आहे. त्याशिवाय, सांडपाण्याचे पाईप्स लहान आकाराचे घातल्यामुळे सांडपाणी ओव्हरफ्लो होते. सांडपाणी आणि पुराचा प्रश्न सोडवणे शक्य आहे. स्मार्ट सिटीकडे हे काम दिल्यास प्रश्न सुटेल. सध्या सांडपाणी, सार्वजनिक बांधकाम खाते आणि इतर एजन्सी हे काम पाहतात.
सत्तेवर असलेल्यांकडून पणजी उद्ध्वस्त
पणजीचे दोन्ही टोक, एक दोनापावल आणि दुसरे पाटो, कोणतेही वैज्ञानिक नियोजन न करता त्यांची कोंडी करून ठेवली आहे. पाटो हा सखल भागात येतो आणि प्रत्येक अभ्यास दाखवतो की पणजी भरतीच्या पाण्याला प्रवृत्त आहे. पण ज्यांच्या हातात सत्ता आहे, असे लोक पणजीला उद्ध्वस्त करायला उठले आहेत. सर्व अभ्यासांकडे दुर्लक्ष करून मोठ्या मोकळ्या जागा विकून टाकल्या आहेत. सरकारने याआधी अनेक अभ्यास केले आहेत, त्यात आयसीएलईआयने केलेल्या शहर शाश्वतता आव्हानांच्या अहवालाचा समावेश आहे. पण पैशांच्या लोभापायी या अहवालांची कोणाला पर्वा नाही.
- एल्विस गोम्स, माजी नागरी अधिकारी
लहान गुंतवणूकदारही कंटाळले
ही जागा मेरशी पंचायतीच्या क्षेत्रातील मोरंबी दे ग्रँड भागात येत होती. पण स्थानिकांना कोणताही फायदा किंवा संधी इथे मिळत नाही. इथे सर्वांत मोठी समस्या पार्किंगची आहे. पणजी महानगरपालिका एका तासासाठी गाड्यांकडून २० रुपये शुल्क घेते. महानगरपालिकेने पार्किंगचे कंत्राट ईडीसीलाच देऊन त्यातून आलेला निधी सुविधा तयार करण्यासाठी वापरावा. रस्ते अजूनही दुरुस्त केलेले नाहीत. तसेच सांडपाणी ओव्हरफ्लो होते, त्याबद्दल मी स्वतः सार्वजनिक बांधकाम खाते आणि महापालिकेकडे तक्रार दाखल केली होती, पण अजूनही तिथे गलिच्छपणा आहे. हा निष्काळजी कारभार पाहून ईडीसी पाटो प्लाझा येथे लहान गुंतवणूकदारही गुंतवणूक करायला कंटाळले आहेत. तसेच पाटो येथे शौचालयाची सुविधा नाही. लोकांना दुसऱ्यांच्या कार्यालयात किंवा रेस्टॉरंटमध्ये जावे लागते.
- तनोज अडवलपालकर, मेरशीतील स्थानिक आणि समाज कार्यकर्ते
नवीन प्रकल्पांना परवानगी नको
आधीचा पाटो आणि आताचा पाटो यामध्ये खूप फरक आहे. दुपारनंतरही गाडी पार्क करायला जागा मिळत नाही. जेव्हा सर्व कार्यालये सुटतात, तेव्हा संध्याकाळी ६.३० नंतरच पार्किंग मिळते. जोपर्यंत पार्किंग आणि सांडपाण्याची समस्या सुटत नाही, तोपर्यंत पाटो येथे नवीन प्रकल्पांना परवानगी देऊ नये.
- उदय मडकईकर, पणजीचे माजी महापौर
मॉल शहराबाहेर हलवा!
पाटोवर आधीच ताण आला आहे आणि गोव्यातील सर्वांत मोठा मॉल येणार असल्यामुळे भविष्यात जागेसाठी भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे. पार्किंगची सुविधाही खराब झाली आहे. मॉल येण्याआधीच चारचाकी आणि दुचाकी पार्क करण्यासाठी खूप धावपळ करावी लागते. इतक्या गाड्या सामावून घेणाऱ्या सुविधेचे नियोजन नसताना मोठ्या इमारती येत आहेत. जर मॉलच्या आत पार्किंग असेल, तर त्यात किती गाड्या मावतील हे माहीत नाही. लोक त्यांच्या गाड्या बाहेरच लावणे पसंत करतील. तसेच गटारांची व्यवस्था खराब झाल्यामुळे पावसाच्या सुरुवातीलाच पाटो भागात पूर येऊन चालणेही कठीण झाले होते. मोठे मॉल प्रकल्प आणण्याआधी या गोष्टींचे नियोजन करायला हवे, अन्यथा हे मॉल शहराबाहेर हलवावेत.
- शाहीन गोम्स, पणजीतील स्थानिक