नगरविकासमंत्र्यांची घोषणा : स्वच्छता कामगारांची मोफत आरोग्य तपासणी
कार्यक्रमात बोलताना नगरविकासमंत्री विश्वजीत राणे.
.....
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गोव्याच्या नगरपालिकांंना स्वच्छतेसाठी नगरविकास खात्यामार्फत बक्षिसे दिली जातील. ३ लाख, ५ लाख आणि १० लाख रुपयांची ही बक्षिसे असतील. स्वच्छता कामगारांंची वर्षातून एकदा मोफत आरोग्य तपासणी केली जाईल, अशी घोषणा नगरविकास मंत्री विश्वजीत राणे यांनी केली.
नगरविकास खात्यामार्फत ‘स्वच्छता ही सेवा’ मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. येथील मिनेझिस ब्रागांझा सभागृृहात झालेल्या कार्यक्रमात नगरविकास मंत्री बोलत होते. व्यासपीठावर खात्याचे सचिव यतींद्र मराळकर, संचालक ब्रिजेश मणेरकर आणि इतर उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांनी हाती झाडू घेऊन स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ केला होता. तेव्हा सर्वजण त्यांची चेष्टा करत होते. या मोहिमेला मोठे यश लाभले आहे. स्वच्छतेचे महत्त्व सर्वांना समजण्यासाठी याची मदत झाली. केंद्र सरकारतर्फे स्वच्छतेसाठी बरीच पारितोषिके आहेत. आता गोवा सरकारतर्फेही स्वच्छतेसाठी पालिकांंना बक्षिसे दिली जातील.
स्वच्छता कामगारांना मान मिळाला पाहिजे. त्यांचे आरोग्य महत्त्वाचे आहे. सर्व पालिकांनी स्वच्छता कामगारांची यादी खात्याला द्यावी. गोमेकॉतर्फे स्वच्छता कामगारांची मोफत आरोग्य तपासणी केली जाईल. स्वच्छतेसाठी गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळ ही मुख्य एजन्सी आहे. कचरा एकत्र करण्यासह तो स्वतंत्र करण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन देण्याची गरज आहे. यासाठी कार्यशाळा होईल. पालिकांना महत्त्वाचा असा प्रकल्प राबवण्यासाठी २ कोटी रुपयांपर्यंत तरतूद करण्याचा प्रस्ताव आहे, असेही मंत्री राणे यांनी सांगितले.
घरी कुत्र्याची विष्ठा मी काढली आहे : विश्वजीत राणे
१८ वर्षांपूर्वी आमच्या घरी कुत्रा होता. त्याची विष्ठा मी काढली आहे. आपण जेव्हा स्वच्छतेचे काम करतो, तेव्हाच अन्य कामगारांना ते कर म्हणून सांगणे शक्य होते, असे नगरविकास मंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.