उड्डाणपुलाच्या कामासाठी प्रशासनाचा निर्णय
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : पर्वरी येथील उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू आहे. केंद्रीय रस्ता, वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या सूचनेनुसार, पणजी ते म्हापसा मार्गावरील वाहतूक १७ सप्टेंबर ते १५ नोव्हेंबर दरम्यान चोगम रस्त्यावरून सांगोल्डामार्गे वळविण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी महामार्गावरील भाग टप्प्याटप्प्याने बंद केला जाणार आहे. फेज २च्या खांब क्रमांक ७ ते खांब क्रमांक १६ पर्यंतची वाहतूक चोगम रस्त्यावरून वळवण्यात आली असली तरी पर्वरी जुना बाजार जंक्शन ते सांगोल्डा बायपास जंक्शनपर्यंत जुना रस्ता खुला असेल.
१०-१५ दिवसांनंतर म्हापसाहून पणजीला येणारी वाहने आराडी, साल्वादोर द मुंद ते होली फेमिली जंक्शनमार्गे वळविली जाणार आहेत. या मार्गावर अवजड वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. फेज १ च्या खांब क्रमांक ५५ ते ७१ चे काम १८ सप्टेंबर ते ३१ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. त्यावेळी ओ कोकेरो जंक्शन ते माॅल दी गोवापर्यंतचा मार्ग बंद राहील. पणजीला येणारी वाहतूक ओ कोकेरोकडून डी. बी. बोरकर मार्गाने वळवण्यात येणार आहे. अवजड वाहने करासवाडा जंक्शनवरून अस्नोडामार्गे वळवली जाणार आहेत. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या गाड्यांना विशिष्ट वेळेत सोडले जाईल. आपत्कालीन सेवा बजावणाऱ्या गाड्या नियमित मार्गाने प्रवास करतील. महामार्ग बंद असलेल्या भागातील स्थानिकांना पास देण्यात येणार आहेत, अशी माहिती पीडब्ल्यूडीचे कार्यकारी अभियंता गजानन देसाई यांनी दिली.