वन संरक्षक नवीन कुमारांची माहिती
हत्ती महामार्गावर येण्याच्या शक्यतेने महामार्गावर तैनात पोलीस. बघ्यांनी केलेली गर्दी. (निवृत्ती शिरोडकर)
प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : सोमवारी मोपा जंगलातून नेतार्डे (सिंधुदुर्ग) जंगलात गेलेला ‘ओंकार’ हत्ती मंगळवारी तोरसे-पेडणे भागात दिसल्याने खळबळ उडाली. ‘ओंकार’ हा सिंधुदुर्गातील सहा हत्तींच्या कळपातील एक आहे. अन्य हत्ती त्याला कळपात घेत नसल्याने तो गोवा, महाराष्ट्र सीमेवरील जंगलात भटकत आहे, अशी माहिती गोव्याचे वन संरक्षक नवीन कुमार यांनी दिली.
दोडामार्ग भागातील जंगलात राहणाऱ्या हत्तींच्या कळपात दोन मादी आहेत. ‘ओंकार’ आता मोठा झाला असल्याने अन्य हत्ती त्याला कळपापासून दूर ठेवतात. जंगलात भटकत असलेला हा हत्ती गोव्यात येत आहे. सोमवारी त्याला गोवाबाहेर हुसकावून लावण्यात यश मिळाले होते. मंगळवारी पुन्हा तो गोव्याच्या जंगलात दिसला आहे. हत्तीला अन्न आणि पाणी भरपूर लागते. त्यामुळे तो अन्न, पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी राहू शकतो, असेही नवीन कुमार म्हणाले.
ड्रोन सिग्नलद्वारे त्याच्या हालचालींवर वन खात्याने नजर ठेवली आहे. मंगळवारी पावसामुळे सिग्नल मिळत नसल्यामुळे नजर ठेवणे कठीण जात आहे. सध्या वन खात्याचे ३० जवान त्याच्या हालचालीवर नजर ठेवून आहेत. बॉम्ब लावून वा धमाकेदार आवाजाद्वारे त्याला हुसकावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सिंधुदुर्ग वन खात्याची मदत आम्ही घेत आहोत. तोरसे, मोपा भागातील लोकांना सतर्कता बाळगण्याच्या सूचना केल्या आहेत. लोकांची गर्दी दिसली तर तो घाबरून महामार्गावर जाऊ शकतो. पेडणे भागातील शेतात तो जाण्याची शक्यता आहे. लोकांनी सतर्क राहावे, असे आवाहनही नवीन कुमार यांनी केले.
हत्तीला पाहण्यासाठी महामार्गावर गर्दी
आेंकार हत्ती महामार्गावर येण्याची शक्यता लक्षात घेऊन काही काळ महामार्गावरील वाहतूक थांबवण्यात आली होती. यावेळी महामार्गावर हत्तीला बघण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. गर्दी कमी करण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांना खूप मेहनत घ्यावी लागली.