आतापर्यंत २५ संशयितांना अटक
मडगाव : मुंगूल येथील गँगवॉरप्रकरणी फातोर्डा पोलिसांनी राजेश हेलमा याला अटक केली आहे. या प्रकरणी पवन सोळंकी, अमोघ नाईक यासह आणखी काहींचा शोध सुरू आहे. लवकरच आणखी काहींना अटक करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. आतापर्यंत २५ संशयितांना अटक करण्यात आली आहे.
मुंगूल माडेल येथील शगुन हॉटेलनजीक १२ ऑगस्ट रोजी गाडी अडवून तलवार, कोयता, सोडा बॉटल्सचा वापर करत संशयितांनी गोळीबारही केला होता. वॉल्टर गँगचे रफीक ताशान (२४) व युवकेश सिंग बदैला (२०) हे गंभीर जखमी झाले होते. दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक टिकमसिंग वर्मा यांच्या नेतृत्वाखाली विविध पथके तयार करत गँगवॉरमध्ये सहभागी संशयितांना अटक करण्यात येत आहे. आतापर्यंत संशयित विल्सन कार्व्हालो, शाहरुख शेख (रा. दवर्ली), रसूल शेख (मडगाव), मोहम्मद अली (२४), वासू कुमार (२४), सूरज माझी (१९), मलिक शेख (१८), गौरांग कोरगावकर (२४) यांच्यानंतर सुनील बिलावर (२०, रा. घोगळ, मडगाव), जॉयस्टन फर्नांडिस (२०, नेरुल) यांना अटक केली होती. तसेच इम्रान बेपारी (३८, रा. सांताक्रुझ), अक्षय तलवार (२२, रा. ताळसाझर), अविनाश गुंजीकर (३१, रा. नावेली), परशुराम राठोड (३२, रा. बेळगाव), दीपक कट्टीमणी (४७, रा. आके बायश), अमर कुलाल, ताहीर, सलीम त्यानंतर महेंद्र नाईक (२१, रा. चिंबल), लुकआऊट नोटीस जारी केलेला राहुल तलवार व अमोघ नाईक याचा सहकारी मंदार प्रभू गावकर (बोरी) व सूरज नाईक बोरकर यांना फातोर्डा पोलिसांनी अटक केली होती. याचप्रकरणात राजस्थान येथे पथक पाठवून बिश्नोई गँगशी संबंध असलेल्या ओमसा याला अटक केली होती. त्याने बंदूक पुरविण्याचा संशय आहे. यात दीपक कट्टीमणी हा सरकारी कर्मचारी असून त्याला सशर्त जामीन मंजूर झालेला आहे.
आंध्रप्रदेशात लपलेल्या राजेशला गोव्यात आल्यावर अटक
पोलिसांनी याआधी प्रकाश हेलमा याला अटक केली होती. त्यानंतर सोमवारी उशिरा त्याचा भाऊ राजेश हेलमा यालाही अटक करण्यात आली. राजेश हा आंध्रप्रदेशातील मूळ गावी लपून बसला होता. गोव्यातील त्याच्या बेकायदा व्यवसायावर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर तो पुन्हा गोव्यात आला असताना त्याला पकडण्यात आले.
अजून तिघे- चौघे पसार : पोलीस अधीक्षक
संशयित राजेश हेलमा याला सोमवारी अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत मुंगुल गँगवॉर प्रकरणी २५ संशयितांना अटक केली. आणखी तीन ते चार जण पसार आहेत, त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांनी सांगितले.