६० हजारांचे ई-सिगारेट्स जप्त, दोघांना अटक
मडगाव : कोलवा पोलिसांनी ई-सिगारेटची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या तीन दुकानांवर छापे टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ६० हजार रुपयांचे ई-सिगारेट जप्त केले असून, दोन संशयितांवर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.
कोलवा पोलिसांनी बाणावली येथील कादर सुपर मार्केट नजीकच्या अल अब्राह, कोलवा कादर सुपर मार्केटनजिकच्या अल अब्राह व कोलवातील बास्किन्स अँड रॉबिन्स आइस्क्रीम सेंटरनजीकच्या अल अब्राह या तीन दुकानांवर छापा टाकला. या कारवाईमध्ये पोलिसांनी ६० हजार रुपयांच्या इ सिगारेटस जप्त केलेल्या आहेत.
पोलिसांनी इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंधक कायदा, २०१९ नुसार दोघा संशयितांवर गुन्हा नोंदवला असून, त्यांना ताब्यात घेतले आहे. ई-सिगारेटच्या धोक्याला आळा घालण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी गोवा पोलिसांकडून ही मोहीम राबवण्यात येत आहे.
दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांच्या नेतृत्वाखाली, उपअधीक्षक सिद्धांत शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक विक्रम नाईक यांनी शनिवारी रात्री ही कारवाई केली.