कुळदेवीच्या स्थानावरून सुरू झालेल्या कौटुंबिक वादाचा दुर्दैवी अंत
जोयडा : पाच वर्षांपासून सुरू असलेला कौटुंबिक वाद आणि समाजाच्या पंचायत व्यवस्थेचा निर्णय अमान्य केल्याने एका कुटुंबाचा दुर्दैवी शेवट झाला आहे. जादूटोण्याच्या संशयातून एका भावाने आपल्या वहिनीच्या डोक्यात फावड्याने वार करून तिचा खून केला, ज्यामुळे दोन संसार उध्वस्त झाले आणि चार निरागस मुले पोरकी झाली आहेत.
तालुक्यातील शिंगरगाव पंचायत क्षेत्रातील आमशेत- कोळेमाळ येथे ही थरारक घटना घडली. संशयित धोंडू वरक आणि मृत भाग्यश्री सोनू वरक यांच्या कुटुंबात गेल्या पाच वर्षांपासून कुलदैवतावरून वाद सुरू होता. हे कुलदैवत भाग्यश्रीच्या घरी असल्याने आपल्या कुटुंबाला बरे वाटत नाही आणि ते नेहमी आजारी पडतात, असा धोंडूचा संशय होता. या वादातूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले, अशी चर्चा समाजात आहे.
काय आहे समाजाची पंचायत व्यवस्था?
आदिवासी धनगर गवळी समाजात गावाचा कारभार, परंपरा आणि न्यायनिवाड्यासाठी परंपरागत पंचायत व्यवस्था आहे. ही व्यवस्था लिखित कायद्याऐवजी रूढी, परंपरा आणि लोकमतावर आधारित असते. गावातील सरपंच आणि गावातील जुन्या जाणत्या अनुभवी व्यक्तींच्या उपस्थितीत कौटुंबिक वाद, धार्मिक प्रश्न, चोरी अशा विषयांवर निर्णय घेतले जातात. या बैठकीत घेतलेला निर्णय सर्वांना बंधनकारक असतो आणि त्याचे उल्लंघन करणाऱ्यास दंड किंवा सामाजिक शिक्षा दिली जाते.
पंचांचा निर्णय अमान्य
धोंडू आणि भाग्यश्री यांच्यातील हा वाद गेल्या पाच वर्षांत अनेकदा समाजाच्या पंचायत व्यवस्थेत सुनावणीस आला होता. पंचांनी अनेकदा बैठक घेऊन धोंडूची समजूत घातली होती आणि त्याला कोणताही अपाय होत नसल्याचे स्पष्ट सांगितले होते. मात्र, समाजाचा निर्णय त्याला मान्य नव्हता आणि जादूटोण्याच्या संशयाने तो ग्रासला होता. यातूनच त्याने पंचांचे न ऐकता हे भयंकर कृत्य केले, ज्यामुळे समाजाच्या नियमांचे पालन केले असते तर दोन कुटुंबे उद्ध्वस्त झाली नसती, असे आता बोलले जात आहे.
भाग्यश्री यांच्या जाण्याने ४ मुले पोरकी
या दुर्दैवी घटनेत भाग्यश्री यांच्या पश्चात १४ वर्षांखालील दोन मुले व दोन मुली अशी चार लहान मुले पोरकी झाली आहेत. भाग्यश्री यांचा पती सोनू वरक हा गोव्यात हमालीचे काम करून कुटुंबाचे पोट भरतो. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. आईच्या दुर्दैवी मृत्यूमुळे ही मुले आईच्या मायेपासून कायमची दुरावली असून, त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर संशयित धोंडू वरक खून करून जंगलात पळून गेला आहे. रामनगर पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.